याला पवारनीती असे नाव.! उद्धव ठाकरेंबद्दल तयार झालेल्या सहानुभूतीला टाचणी लावली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 06:08 AM2023-05-06T06:08:46+5:302023-05-06T06:09:17+5:30
राजीनाम्यावेळीच त्यांनी उत्तराधिकाऱ्याच्या निवडीची प्रक्रिया सुचविली होती. त्या समितीच्या बैठकीपूर्वीच नेते, कार्यकर्ते, पाठीराखे, हितचिंतक अशा सगळ्यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्याचे साकडे घातले.
स्वत:चा बळावलेला आजार, पक्षातील काहींच्या महत्त्वाकांक्षांना फुटलेले पंख, सत्तांतरानंतर बदललेली राज्यातील परिस्थिती, देशपातळीवरील विरोधकांच्या ऐक्यामध्ये निर्माण होणारे अहंकाराचे अडथळे असे चहूबाजूंनी घेरलेल्या अवस्थेत अन्य कुणी नेता असता तर त्याने दोनच पर्यायांचा विचार केला असता. पहिला, अधिक आक्रमक होऊन परिस्थितीशी दोन हात करण्याचा व दुसरा, शस्त्रे खाली टाकून परिस्थितीला शरण जाण्याचा. पण, शरद पवार नावाच्या तब्बल सहा दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात प्रत्येक टप्प्यावर प्रासंगिकता साधणाऱ्या जाणत्या नेत्याने वेगळाच पर्याय शोधला. हा पर्याय होता, आपले राष्ट्रवादी काँग्रेस नावाचे घर सावरण्याचा. त्यातून महाविकास आघाडीचा सारीपाट पुन्हा मांडण्याचा आणि झालेच तर राष्ट्रीय पातळीवरही आपले महत्त्व अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. भाकरी फिरवली. या घोषणेने पक्षातल्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अशा सगळ्या फळ्यांमधील एकेकाचे मुखवटे दूर झाले, खरे चेहरे समोर आले. आनंदलेले कोण, हताश व व्याकुळ झालेले कोण, ढसाढसा रडणारे कोण आणि पक्षाचे भविष्य विचारात घेऊन अधिक गंभीरपणे प्रसंगाला सामोरे जाणारे कोण, हे नव्याने कुटुंबप्रमुख या नात्याने पवारांना दिसले.
राजीनाम्यावेळीच त्यांनी उत्तराधिकाऱ्याच्या निवडीची प्रक्रिया सुचविली होती. त्या समितीच्या बैठकीपूर्वीच नेते, कार्यकर्ते, पाठीराखे, हितचिंतक अशा सगळ्यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्याचे साकडे घातले. कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाबाहेर ठाण मांडले. रक्ताने पत्रे लिहिली. तो दबाव समितीवर आला. देशभरातील प्रमुख विरोधी नेत्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली. तिचा दबाव शरद पवारांवर आला. राजीनाम्याच्या निर्णयावर फक्त कुटुंबात चर्चा केली. आपल्यावर विश्वास ठेवणारे कुटुंबाबाहेरचे लोक, नेते, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. पक्षाचा अक्ष पवार कुटुंब असला तरी ती कुटुंबाची मालमत्ता नाही, हे त्यांना जाणवले. चूक दुरुस्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कन्या सुप्रिया सुळे दिल्लीत व पुतणे अजित पवार महाराष्ट्रात हे बहुतेकांनी ठरविलेले जबाबदाऱ्यांचे वाटप मागे पडले. त्याऐवजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व अन्य पदे तयार करून, तसेच सामाजिक व प्रादेशिक समतोल जपून उत्तराधिकारी निवडण्याची ग्वाही देत त्यांनी राजीनामा मागे घेतला. साधारणपणे शंभर तासांचे राजीनामानाट्य ज्याला जे हवे ते देऊन आणि पवारांना जे हवे होते ते सारे घेऊन संपुष्टात आले.
शरद पवार नावाच्या नेत्याचे सार्वजनिक जीवनातील हेच ते वेगळेपण. हीच ती पवारनीती. गेली साठ-बासष्ट वर्षे महाराष्ट्र ती अनुभवतो आहे. यावेळी संपूर्ण देशाने ती अनुभवली. साडेतीन वर्षांपूर्वी अशाच प्रतिकूल परिस्थितीत साताऱ्यात भर पावसात सभा घेऊन शरद पवारांनी लढण्याच्या अदम्य जिद्दीचे उदाहरण समोर ठेवले होते. राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक वयोवृद्ध नेता त्या जिद्दीमुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्या जिद्दीने निवडणुकीची समीकरणे बदलली. आताही जवळपास तसेच घडले. खुंटा हलवून बळकट करण्यासाठी राजीनाम्याचा हा डाव होता. तो मागे घेऊन पवारांनी बरेच काही साधले आहे. राजीनाम्याच्या एका दगडाने त्यांनी अनेक पक्षी किमान घायाळ केले. पक्षाऐवजी स्वत:चा विचार करणाऱ्यांना, विरोधकांच्या वळचणीला जाऊन नेत्रपल्लवी करणाऱ्यांना योग्य तो इशारा दिला. सव्वातीन वर्षांपूर्वी त्यांच्याच पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील काहींच्या महत्त्वाकांक्षांना आळा घातला. उद्धव ठाकरेंबद्दल तयार झालेल्या सहानुभूतीच्या वातावरणाला टाचणी लावली. आपणच आघाडीचे सर्वोच्च नेते असल्याचे दाखवून दिले.
अजित पवारांना सोबत घेऊन नवे डाव मांडू पाहणाऱ्या भाजपलाही योग्य तो संदेश दिला. अर्थात, या राजीनामानाट्याने पवारांपुढील आव्हाने संपलेली नाहीत. उत्तराधिकारी निवडून जबाबदाऱ्यांचे नव्याने वाटप करणे, पक्षाची फेरबांधणी करताना कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणे व पक्षाला ऊर्जितावस्था आणणे या पक्षासंदर्भातील गोष्टी ठीक. पण, त्या पलीकडे देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक भूमिका, पक्षातील अनेक नेत्यांमागे लागलेला ईडी, सीबीआय चौकशीचा फेरा, याचा सामना यापुढे कसा केला जातो, अचानक कमालीचे सक्रिय झालेल्या अजित पवारांचे वारंवार घडणारे रूसवेफुगवे थांबतात का, अजित पवार यांच्या पुढाकाराने सत्तेत सहभागी होण्यासाठी आतूर झालेल्या आमदारांच्या महत्त्वाकांक्षेवर शरद पवार काय तोडगा काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.