- विजय दर्डा
उत्तर प्रदेशात योगींचे सरकार पुन्हा येते आहे, भाजपला २५० च्या घरात जागा मिळतील, असे एक्झिट पोलच्या कितीतरी आधी मी माझ्या सहकाऱ्यांना म्हटले होते. अनेकजण माझ्याशी असहमत झाले. कारण हवा सपाची वाहते आहे, अशा बातम्या येत होत्या...पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशवर पूर्ण लक्ष केंद्रित केलेले गृहमंत्री अमित शहा आणि आदित्यनाथ काय करत आहेत याकडे माझे बारकाईने लक्ष होते.
उत्तर प्रदेशातल्या यशाचे श्रेय या तिघांना जाते. पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या समाजकल्याण योजना आणि सोशल इंजिनिअरिंग यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. अमित शहा यांनी व्यूहरचना केली. योगी यांनी कायदा-सुव्यवस्था ठीक करून भयमुक्त उत्तर प्रदेशाची प्रतिमा निर्माण केली. यातून भाजपचा विजयपथ मोकळा झाला. अखिलेश यादव यांनी पूर्ण ताकद लावली. हवा आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला, पण खुर्ची त्यांच्याकडे आली नाही. याचे कारण मोदी, अमित शाह, योगी हे लोक वर्षाचे ३६५ दिवस स्वत: मैदानात पाय रोवून उभे असतात आणि ते आपल्या कार्यकर्त्यांनाही स्वस्थ बसू देत नाहीत.
कोविड भरात असताना रा. स्व. संघ आणि भाजपचे कार्यकर्ते लोकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर होते. अन्य पक्षांचे लोक तेव्हा घरात बसले होते. निवडणुकांच्या काही महिने आधी इतर पक्ष कामाला लागतात. भाजप मात्र तिथे आधीपासूनच पाय रोवून उभा असतो. या सगळ्यांचा खूप परिणाम होतो. लोकांना नेता कोण, अभिनेता कोण हे सगळे बरोबर कळते.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जाती-धर्माचा पत्ता चालला नाही, असे बहुधा पहिल्यांदा झाले. मुस्लिमांनी काँग्रेस, ओवैसींना मते दिली नाहीत. यांना मत देणे म्हणजे ते वाया घालवणे आहे हे लोक ओळखून होते. वारे सपाच्या बाजूने आहे हे जाणून लोकांनी त्या पक्षाला मते दिली. शेतकऱ्यांनीही सपाला साथ दिली. दुसरीकडे विविध खटल्यांच्या दडपणाखाली मायावती निवडणुकीच्या आधीच रण सोडून गेल्या. त्यांना आशा असावी की, २०-२५ जागा आल्या तरी राजकीय पोळी भाजून घेण्याची सोय कदाचित होईल, पण मतदारांनी त्यांचाही भ्रम तोडला. मते भाजपला दिली. या सगळ्या उत्तर प्रदेशात पहिल्यांदा असे झाले की, पाच वर्षे काम केल्यानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आले.
कोणत्याही परिस्थितीकडे मी कधी केवळ राजकीय चष्म्यातून पाहत नाही. वस्तुनिष्ठतेच्या आधारे विश्लेषण करतो. अशक्य ते शक्य करून दाखविण्याची क्षमता असल्यानेच नरेंद्र मोदी भारतीय राजकारणाचे शंकराचार्य झाले आहेत. राजकीय नेत्याच्या पलीकडे जाऊन त्यांची प्रतिमा साधुतुल्य मुत्सद्द्याची झाली आहे. ‘हे गुजरातचे शेर आणि राजकीय संत आहेत’ असे मी त्यांच्याबद्दल म्हटले तेव्हा मोठा गोंधळ उडाला होता. कार्यक्रमाला उपस्थित मोदी मला म्हणाले, ‘आपण मला शेर, संत म्हटले आपल्याला याचा खूपच त्रास होईल.’ आणि तसा तो झालाही.
असो. मी निवडणुकीबद्दल बोलत होतो. आदित्य ठाकरेही उत्तर प्रदेशात गेले होते. १०० जागा लढवण्याची घोषणा त्यांनी केली होती. लढवल्या फक्त ३७ आणि सर्व जागांवर अनामत जप्त झाली. शिवसेनेचे असेच हाल गोव्यातही झाले. आणि आता काँग्रेसच्या दुर्दैवाचे दशावतार! उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी तर आघाडीवर जाऊन खेळत होत्या. काय झाले? काँग्रेसचा सुपडा साफ झाला. हाथरस, लखीमपूर खेरीत त्यांनी आंदोलन केले होते. त्या जागाही भाजपच्या झोळीत पडल्या. काँग्रेस आपली जहागीर समजतो त्या अमेठीत राहुल आधीच लोकसभा निवडणूक हरले आहेत. विधानसभेत तर पक्षाला रायबरेलीही वाचवता आली नाही. पक्षाने प्रियांका गांधी यांना १०-१२ वर्षे आधीच मैदानात उतरवायला हवे होते. आता त्याला बराच उशीर झाला आहे.
काँग्रेसने खरेतर आत्मशोध करून नेतृत्वबदल केला पाहिजे. लोकांची तक्रार गांधी परिवाराविरुद्ध नाही. जनाधार असलेल्यांना धक्का लावला जात आहे, जनाधार नसलेल्यांना पक्षाची सरचिटणीसपदे वाटली जात आहेत. पक्षाची हालत पाहून ए. के. अँटनी यांनी निवडणुकीआधीच संन्यास जाहीर केला. मला वाटते, पुढच्या काही दिवसांत आणखी लोक पक्ष सोडतील. सोडून जाणाऱ्यांना “तुम्ही का जात आहात?” असे विचारणारेच कोणी नाही.
भारत काँग्रेसमुक्त झाला पाहिजे या मोदींच्या म्हणण्याशी मात्र मी अजिबात सहमत नाही. लोकशाहीत मजबूत विरोधी पक्ष असला पाहिजे, पण विरोधी पक्ष हे विरोधकासारखे वागतात नसतील, तर हे आव्हान पेलणार कोण? काँग्रेसचे एकूण वर्तन पाहून मला कधी कधी शंका येते, आतून हा पक्ष भाजपाला मिळालेला तर नाही? तसे नसते तर निवडणुकीचे मैदान सहज जिंकू शकतील अशांना बाहेरचा रस्ता का दाखविला गेला? पंजाबचा सत्यानाश तर काँग्रेसने स्वतःच केला. तसा तो केला नसता तर आजची स्थिती ओढवली नसती. अमरिंदर हरले, सिद्धूनांही लोकांनी धूळ चारली.
आता झाला तेवढा तमाश पुरे, असेच लोक म्हणाले असणार ! केजरीवाल यांनी दिल्लीत चांगले सरकार चालवून दाखवले असल्याने लोकांनी पंजाबात त्यांना कौल दिला. दिल्लीकर नागरिकांना केजरीवालांनी दिलेली आश्वासने राजकीय नव्हती, पण जी वचने दिली ती त्यांनी पुरी करून दाखविली. गरिबांना मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक, शाळांच्या स्थितीत सुधारणा, अशी उल्लेखनीय कामे त्यांनी केली आहेत. ममता बॅनर्जी यांनी ज्याप्रकारे स्वतःचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर नेले, तेच केजरीवाल यांनी केले. केजरीवाल स्वतः हिंदी भाषिक पट्ट्यातले आहेत, हेही हे त्यांच्या पथ्यावर पडते.
मणिपूरमध्ये तर भाजपला जिंकायचेच होते. पूर्वेकडील राज्यांवर संघ, भाजपा यांनी झपाट्याने ताबा मिळवला आहे. काँग्रेसने तेथेही स्वत:ला उद्ध्वस्त करून घेतले. उत्तराखंड आणि गोवा ही दोन राज्येही कॉंग्रेसने स्वत:च गमावली. उत्तराखंड काँग्रेसकडे येत होता. पण एका समाजाच्या बाजूने हरीश रावत बोलले, त्याने घात झाला. त्यावेळी मी एका मित्राला म्हटले, ‘झाले, काँग्रेस आता इथूनही जाणार’... तसेच झाले. गोव्यातल्या भाजपा विजयाचे सगळे श्रेय देवेंद्र फडणवीस यांचे आहे. चतुर रणनीती आखून, कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आणि विश्वास जागवून त्यांनी हरलेली बाजी उलटवली.
एक मित्र गमतीत म्हणाले, महाराष्ट्रात जागा रिकामी होत नाही तोवर फडणवीस यांना गोव्याचे मुख्यमंत्री करा...! काँग्रेस स्वत:बरोबर देशाचेही नुकसान करत आहे आणि हे त्या पक्षाला कळत कसे नाही? - असा प्रश्न आता लोक करू लागले आहेत..भाजपाला पर्याय होण्याची शक्यता केवळ काँग्रेसकडेच आहे. प्रादेशिक पक्ष हा भाजपाला पर्याय ठरू शकत नाही. २-२ फुटांचे तीन लोक जोडून आपण ६ फुटी माणूस तयार करू शकतो का? - तसेच आहे हे ! जी-२३ गटातल्या नेत्यांकडे आता गमावण्यासारखे काही उरलेले नाही. त्यांनी पक्ष वाचवण्यासाठी आवाज उठवला पाहिजे.
मनाची समजूत घालायचे ठरवली तर काँग्रेस म्हणू शकते, त्यात काय? भाजपकडेही कधीकाळी दोनच जागा होत्या की! आत्ता पाहा तो पक्ष कुठे आहे! मग आम्ही आलो खाली, तर काय बिघडले? आमचाही पक्ष पुन्हा भरारी घेऊ शकेलच की !! फिलहाल दिल बहलाने के लिए ये ख्याल अच्छा है, गालिब...!