राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकण्याची खात्री कितपत वाटते? मी जिंकण्यासाठीच निवडणूक लढवत आहे.
सध्यातरी मतदारांचे संख्याबळ आपल्या विरोधात आहे; मग जिंकूच, असे कशाच्या आधारे म्हणता?अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी मला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. तूर्तास मी सगळ्यांची नावे घेऊ शकत नाही. पण, या निवडणुकीत सत्याचा विजय होईल इतके नक्की सांगतो.
नवीन पटनायक, जगन मोहन रेड्डी अशा काही मुख्यमंत्र्यांनी एनडीएच्या उमेदवारांना आधीच पाठिंबा दिला आहे. एनडीएत नसलेल्या मायावतींसारख्या व्यक्ती द्रौपदी मुर्मू यांच्याबरोबर आहेत. झारखंड मुक्ती मोर्चासुद्धा..(थोडे नाराज होत) कोणाचा पाठिंबा कोणाला आहे यामुळे मला काही फरक पडत नाही. आपण निकाल काय लागतो तेवढा पाहा.शरद पवार, फारुख अब्दुल्ला आणि गोपाळ कृष्ण गांधी यांच्यासारख्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवायला नकार दिला असताना आपण कसे काय तयार झालात? मग, आपल्याला काय वाटते मीही नकार देईन? मैदान सोडून पळणाऱ्यांतला मी नाही. उमेदवारीसाठी आपल्याशी कोणी - कोणी बोलणे केले होते? राष्ट्रपती निवडणुकीवरून संयुक्त विरोधी पक्षांच्या दोन बैठका झाल्या. दुसऱ्या बैठकीत माझ्या नावाचा प्रस्ताव आला आणि मान्य झाला. शरद पवार यांनी सर्वांत आधी मला फोन केला. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे आणि ममता बॅनर्जी यांनी. मी त्यांचा आग्रह मान्य केला. त्यानंतर मला सातत्याने पाठिंब्याचे फोन येत आहेत. आता मी देशभर फिरून विविध नेत्यांच्या भेटी घेऊन पाठिंबा मागेन. आपण स्वतः आदिवासीबहुल झारखंडचे! पहिल्यांदा राष्ट्रपती होणार असलेल्या एका आदिवासी महिलेच्या मार्गात आपण अडथळा बनू इच्छिता काय? कोणी कुठल्या कुळात जन्माला यावे हे त्याच्या हातात असते का? द्रौपदी मुर्मू या तर ओडिशामध्ये मंत्री होत्या. झारखंडच्या राज्यपाल होत्या. तरी त्यांच्या गावात आजपर्यंत वीज पोहोचलेली नाही. असे असताना त्या देशासाठी काय करतील? आपण कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार आहात? ही काही छोटीमोठी लढाई नाही. ही विचारप्रणालीची लढाई असून, हा राज्यघटना वाचविण्याचा लढा आहे. आपला देश कायमच विविधतापूर्ण आणि समावेशक राहिला. परंतु आज एक विचारधारा सगळ्यांवर लादली जातेय. संघर्ष आणि द्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे. देशाची राज्यघटना पूर्णपणे नष्ट करून आज एका हुकूमशाही आणि एकाधिकारवादी समाजाची स्थापना केली जाते आहे.आपण दीर्घकाळ भाजपमध्ये राहिला आहात. या निवडणुकीकडे भाजप विरुद्ध भाजप लढाई म्हणून पाहिले जाऊ नये, असे नाही वाटत? मी १९९३ मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या भाजपत सामील झालो होतो. तो भाजप आजच्या पक्षापेक्षा एकदम वेगळा होता.१९९८ मध्ये भाजप संसदेत केवळ एका मताने पराभूत झाला आणि अटलजींनी ताबडतोब राजीनामा दिला. आजचा भाजप असे करेल काय? कर्नाटक आणि मध्य प्रदेशात काय झाले? महाराष्ट्रात काय होत आहे? तेथे जनादेशाचा अपमान केला जात आहे. अटलजींचा भाजप केवळ आम सहमतीने काम करीत असे. आजच्या भाजपला केवळ राजकारण आणि समाजातच नाही, सर्वच ठिकाणी फक्त संघर्षच हवा आहे. परंतु राष्ट्रपती तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने निर्णय घेतात. आपण निवडून जरी आलात तरी आपण काम कसे करणार? राष्ट्रपतींचा सल्ला सरकारला गांभीर्याने घ्यावाच लागेल. राष्ट्रपतींकडे सल्ला देण्याव्यतिरिक्त इतरही अधिकार असतात. राष्ट्रपती हा तिन्ही सेनादलांचा प्रमुख असतो.