- वसंत भोसले
ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील राष्ट्राच्या हौशी खेळाडूंच्या मित्रत्वाच्या स्पर्धा म्हणजे आता पूर्णत: स्पर्धात्मक क्रीडा महोत्सव झालेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा! १९३० मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदाचे बाविसावे वर्षे! यावर्षीच्या स्पर्धेत भारताच्या २१५ खेळाडूंनी पदकतालिकेत देशाला चौथे स्थान मिळवून दिले असले तरी काही वैशिष्ट्ये मुद्दाम नोंदविली पाहिजेत. यावर्षी खरी कमाल केली ती भारताच्या ग्रामीण भागातून अखंड कष्टाने वर आलेल्या एकांड्या शिलेदारांनीच!
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा अविनाश साबळे याने तीन हजार मीटर अडथळ्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले तेव्हा सारा भारत अचंबित झाला. भारताला पहिले पदक सांगलीच्या संकेत सरगर याने स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच मिळवून दिले. तेव्हापासून आपल्या खेळाडूंच्या सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीची चर्चा सुरू झाली. संकेत पानटपरी चालविणाऱ्यांचा मुलगा. वडिलांनीच त्याला आणि त्याची बहीण काजोल या दोघांनाही वजन उचलण्याच्या स्पर्धेत उतरविले. वेटलिफ्टिंग हा क्रीडा प्रकार दूरवरच्या गावामध्ये सुविधांमुळे शक्य होत नाही. मात्र सामान्य माणसांनी अशा प्रकारच्या मर्दानी खेळांना जवळ केले आहे. अगदी सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या आणि सामाजिक अडथळ्यांची शर्यत कायमची नशिबी असलेल्या भारतीय तरुण-तरुणींमध्ये कष्ट करण्याची तयारी आणि चिकाटी किती पराकोटीची आहे, हे या स्पर्धेत दिसले.
अविनाश साबळे, संकेत सरगर यांच्यासह बॉक्सिंगसारख्या क्रीडा प्रकारात मुलींनी सुवर्णपदके लुटली. हैदराबादची निखत झरीन, हरयाणातील भिवानीजवळच्या धनाना गावची नीतू घनसास हिची कामगिरी अभिमानास्पद आहे. हरयाणाच्या नीतूचे वडील जय भगवान हरयाणा सरकारच्या सेवेत कारकून होते. मुलीच्या तयारीसाठी त्यांनी तीन वर्षे विनापगारी रजा घेतली. बॉक्सिंगमध्ये मुली आणि मुलांनी सात पदके पटकाविली आहेत. ॲथलेटिक्ससारख्या क्रीडा प्रकारात देखील प्रथमच नजरेत भरेल, अशी कामगिरी भारतीय खेळाडूंनी केली, याचे खरे श्रेय भारताचा जागतिक अजिंक्यवीर भालाफेकपटू नीरज चोप्रा याला जाते. हा वैयक्तिक क्रीडा प्रकार असल्याने सांघिक कामगिरीवर अवलंबून रहावे लागत नाही. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश असता, तर भारताच्या पदकांची संख्या वाढली असती.
यावर्षीच्या राष्ट्रकुल संघात हरयाणाचेच ४३ खेळाडू होते. त्यांनीच एकूण पदकांपैकी वीस पदके जिंकली आहेत. हरयाणा, पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या पाच राज्यांचे निम्मे खेळाडू होते. केंद्र सरकारने या पाच राज्यांना मिळून पावणेपाचशे कोटी रुपयांचे क्रीडा अनुदान दिले आहे. याउलट एकट्या गुजरातला ६०० आणि एकट्या उत्तर प्रदेशला ५५० कोटी रुपये मिळाले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत गुजरातचे केवळ पाच खेळाडू होते. हा प्रादेशिक असमतोलही योग्य नाही. हरयाणा किंवा महाराष्ट्राची मुले अधिक कष्ट घेत असतील, त्या राज्यात अधिक चांगल्या पायाभूत सुविधा तसेच प्रशिक्षक असतील तर या राज्यांना अधिक निधी मिळाला पाहिजे.
भारतात एकूणच सरकारच्या तोंडाकडे बघत राहण्याची एक सार्वत्रिक वृत्ती दिसते. सरकारने अमुक केले नाही म्हणून तमुक झाले नाही, असे म्हणून अपयशाचे ओझे सरकारच्या खांद्यावर ढकलून देणे, ही खास भारतीय वृत्ती ! सरकारी दुर्लक्षाचे रडे नेहमीचेच म्हणून ते धकूनही जाते. मात्र याला लखलखित अपवाद दिसतो तो क्रीडा क्षेत्राचा ! कुणी आपल्यासाठी काही करो न करो, ग्रामीण भागातले खेळाडू आपल्या स्वप्नामागे धावताना शब्दश: रक्ताचे पाणी करतात.
आपल्या गुणी मुलांना त्यांच्या स्वप्नांना गवसणी घालता यावी म्हणून आधीच पोटाला हजार चिमटे असलेले पालक आणखी पदरमोड करतात आणि अशा घरामध्ये अचानक एके दिवशी रौप्य नाहीतर सुवर्ण कौतुकाची झळाळी येते, ही कहाणी आता आपल्या परिचयाची झाली आहे. पंचाहत्तर वर्षांच्या तरुण भारताची रसरशीत जिद्द आहे ती ही! राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने ती पुन्हा झळाळून उठली. आता सरकारनेही “खेलो इंडिया” ची हाक कानाकोपऱ्यात कशी ऐकू जाईल, हे पाहिले पाहिजे!बॉक्सिंगचे सुवर्णपदक जिंकल्यावर राष्ट्रगीताचे स्वर निनादू लागले, तेव्हा निखत झरीनचे डोळे अश्रूंनी डबडबले होतेे... तीच या देशाची नवी आशा आहे!