- प्रा. विजय कोष्टी (कवठेमहांकाळ, जि. सांगली)
स्वामी विवेकानंदांचे नाव घेतले की, डोळ्यासमोर येते ते त्यांचे जागतिक सर्वधर्म परिषदेतील भाषण. या भाषणाने विवेकानंदांबरोबरच भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात “माझ्या बंधू आणि भगिनींनो”, अशी करताच उपस्थितांनी काही मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला. ज्यांनी संपूर्ण जगाला स्त्री आणि पुरुष या दोन वर्गात विभागले होते, त्यांच्यासाठी स्वामीजींचे हे संबोधन आश्चर्यकारक होते.
जगामध्ये कोणतेही असे भाषण नसेल, ज्याचा संबोधन दिवस वाढदिवसासारखा साजरा केला जात असेल; हे भाषण मात्र त्याला अपवाद आहे! शिकागोमधील विवेकानंदांच्या या भाषणाने संपूर्ण जगामध्ये खळबळ उडवून दिली होती, यावरूनच या संस्मरणीय भाषणाचे ऐतिहासिक महत्व सिद्ध होते. संपूर्ण जगाला धर्माचा मार्ग दाखविणाऱ्या, साधू-संतांची प्राचीन परंपरा असलेल्या देवभूमी भारताचे आपण प्रतिनिधित्व करत असल्याचे सांगून विवेकानंदांनी परिषदेत उपस्थित जगातील तमाम विद्वांनांसमोर संस्कृतमधील श्लोकांचा दाखले देऊन त्यांचे अर्थ विषद केले होते.
‘ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असो की वाकडे - तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात.’_ हे सूत्र त्यांनी गीतेतील श्लोकांचा दाखला देऊन समजावले. ‘जो माझ्यापर्यंत येतो, तो कसाही असो, मी त्याचा स्वीकार करतो. कुणी कुठलाही मार्ग निवडो, अखेरीस माझ्यापर्यंतच येतो,’ असे भगवंताचे वचन त्यांनी उच्चारले, तेव्हा धर्मसभेतील वातावरण बदलून गेले.
प्राचीन परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या योगी स्वामी विवेकानंदांनी जगामध्ये शांती आणि विश्वबंधुत्व यांचा प्रसार केला. दया, परोपकार, करुणा, सद्भावना, बंधुत्व आदी सदाचारांना जीवनात उतरविले. त्यांनी कट्टरता, धर्मांधता, जातीयवाद, अस्पृश्यता, अनिष्ट चालीरिती, गुलामगिरीचा नेहमी विरोध केला, देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचे स्वप्न पहिले. हे सारे विवेकानंदांनी केले, त्या काळात एक धर्म दुसऱ्या धर्माला शत्रू समजत असे, एक देश दुसऱ्या देशाकडे संशयाने पाहत असे आणि साम्राज्यवादाचे राजकारण चालत असे. आज स्वामीजींच्या शिकागो येथील भाषणाच्या १३०व्या वर्षानिमित्त जगाला पुन्हा एकदा शांततेची, बंधुत्त्वाची गरज निर्माण झाली असून, कट्टरतावाद संपविण्याचीही निकड भासू लागली आहे. कमीत कमी शब्दांत भारतीय संस्कृती, भारत भूमी, परंपरा, संस्कृती आणि धर्म या गोष्टींचा जगाला परिचय करून देऊन स्वामीजींनी फक्त औषधच सांगितले नाही, तर आजारच न होण्याची उपाययोजनाही सांगितली होती. त्यांनी शिकागोमध्ये स्पष्ट केले की, जगात धर्माच्या नावाखालीच जास्त रक्त सांडले असून, कट्टरता आणि सांप्रदायिकतेमुळेच जास्त रक्तपात झाले आहेत. इतरांचा धर्म नष्ट करून आपल्या धर्माचा प्रचार होऊ शकत नाही. स्वामीजींनी धर्मांधतेला विरोध करण्याचे आणि मानवतेला प्रतिष्ठा देण्याचे आवाहन संपूर्ण जगातील धर्मबांधवांना केले होते. म्हणूनच स्वामीजींचे हे भाषण पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने जगासमोर ठेवण्याची आवश्यकता आहे. आजसुद्धा संपूर्ण जगाने स्वामीजींची शिकवण अवलंबिली पाहिजे, असे वाटते. आज स्वामीजींच्या भाषणाला १३० वर्षे लोटली असली तरी, आजही ते तितकेच मार्गदर्शक असून ते जणू वर्तमानातल्या दुखावलेल्या, रक्तबंबाळ आणि अस्वस्थ जगासाठीच बोलत असावेत, असे वाटते. ही प्रासंगिकताच या भाषणाचे महत्व अधोरेखित करते, त्याला अजरामर करते.