सिनेमाचे नावच मुळी रोटी कपडा और मकान! सिनेमाची मर्यादा सिनेमाच्या नावातूनच कळून येते़ ही सिनेमाची नव्हे तर आपल्या जीवनाचीच मर्यादा आहे़ जगण्यासाठी काय लागते रोटी कपडा मकान. या तीन गोष्टी जीवनात प्राप्त झाल्या की जीवनाचा हेतू साध्य झाला़ मनुष्य जीवनाचे ईप्सित एवढेच? सुधारलेल्या जगाने ही भाषा बोलावी आणि सिनेमाला गर्दी करावी़ माणसाला मन आणि बुद्धी आहे याचाच अर्थ त्याला भावना आहे आणि विचाऱ विचाराशिवाय जगणे ही कल्पना शक्य आहे का? रामायण हे आदिकाव्य आहे़ राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे़ रामाचे गुरू वसिष्ठ ऋषी आहेत़ राजर्षी ब्रह्मर्षी नव्हे तर त्यांचा परिचय ज्ञानर्षी म्हणून आहे़ समाधान हरवून बसलेल्या रामाला ज्ञानर्षी म्हणतात,‘विचारो हि महौषधम्।शरीराची जखम, शारीरिक व्याधी औषधाने बरी करता येईल, परंतु मनाचे नि बुद्धीचे दु:ख, त्रास कसा दूर करायचा? त्यासाठीच तर विचार हवा़ विचार हेच महान औषध आहे़ योगवासिष्ठामध्ये वसिष्ठांनी केलेला हा रामाला उपदेश़ हजारो वर्षांपूर्वी़ प्राथमिक गरजा भागल्या म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता झाली असे समजण्याचे कारण नाही़ त्या तर क्षर आहेत़ माणसाला अक्षराची भूक आहे़ अमरत्वाची ओढ आहे़ कीर्तीरूपे उरावे अशी त्याची मनीषा आहे़ तुकोबा काय विद्यापीठाचे पदवीधर होते काय? पण काय लिहिते झाले़ ‘आम्हा घरी धन-शब्दाचीच रत्ने’एकदा काढून तर बघा आपले संस्कृत साहित्य, प्राचीन साहित्य, मध्ययुगीन साहित्य, संत साहित्य, सगळीकडे अक्षराचीच पूजा, माणूस क्षर असला तरी त्याला अक्षराचे महत्त्व कळायला हवे़ पाच पन्नास वर्षांपूर्वी शालेय पाठ्यपुस्तकांतसुद्धा आम्ही अक्षरेच गिरविली़ इंग्रजीचा गंध नसलेल्या आणि धोतरटोपी मध्ये वावरणाऱ्या मास्तरांनी सुद्धा अक्षर महतीच सांगितली होती़ आचार्य परंपरा लुप्त झाली तशी मास्तर परंपराही मोडीत निघाली़ मास्तरांनी सांगितलेली लाकुडतोड्याची गोष्ट आजही लक्षात आहे़ यंत्रयुगात लाकूडतोड्या गेला म्हणून त्याचे दु:ख करण्याचे कारण नाही, प्रामाणिकपणा संपला याचे अपार दु:ख आहे़ तो रोटी कपडा और मकान एवढाच आवश्यक आहे़ खुलभर दुधाच्या कहाणीमध्ये राजाने सांगितलेला हौद दुधाने भरत नाही़ सारी प्रजा आपल्याकडील दुधाचा सर्व साठा हौदात आणून ओतते़ हौद भरत नाही़ सरतेशेवटी गावातील एक म्हातारी खुलभर दूध हौदात ओतते हौद भरून जातो़ म्हातारीच्या दुधालाच हे यश का बरे मिळावे? कारण ती घरातल्या सर्वांना दूध देऊन, थोरा लेकरांची भूक शांत करून उरलेले दूध आणून ओतते़ राजाज्ञा झाली म्हणून काय झाले? तिने राजाज्ञाही पाळली आणि मानवधर्माचेही पालन केले़ माणुसकीचा पहिला पाठ शालेय जीवनातूनच मिळत होता़ -डॉ. गोविंद काळे
विचारो हि महौषधम्
By admin | Published: January 18, 2017 12:50 AM