हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरतो. या पावसाळ्यात याचा प्रत्यय वारंवार आला. देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली तर शरद पवार यांनी अंदाज खरा ठरला म्हणून बारामतीची साखर पाठवली. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव यांची अविनाश थोरात यांनी घेतलेली मुलाखत...यावर्षी तुमचा अंदाज अनेकदा चुकला म्हणून सर्वत्र कठोर टीका होत आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात अत्याधुनिक मॉडेलच्या मदतीनेही तीन दिवसांपेक्षा जास्त काळाच्या हवामानाचा अंदाज करता येणे शक्य नसते. मुंबई महापालिका आणि राज्य शासन यांना पावसाचा इशारा वेळोवेळी दिला जातो. यंदाही तो दिला होता. १९५० ते २०१६ या काळात ५१ वेळा २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. मुंबईच्या दृष्टीने हा पाऊस सामान्यच होता. मुख्य प्रश्न उद्भवला होता तो पाण्याचा निचरा न होण्याच्या घटनांमुळे.यंदाच्या पावसात काहीवेळा हवामान विभागाच्या मॉडेलनुसार जास्त पाऊस दर्शविला होता, परंतु तो अंदाज खरा ठरला नाही. हा मान्सून संपल्यावर याबाबत हवामान विभागाकडून या सगळ्यांचे विश्लेषण केले जाईल.भारतीय हवामान विभागाकडे अचूक अंदाजासाठी पुरेशी यंत्रणा आहे का?अमेरिकेत विकसित झालेले अत्याधुनिक मॉडेल आपण वापरत आहोत. पूर्वी वापरत असलेल्या रडारमुळे केवळ ढगांची माहिती मिळत होती. आता आपण डॉपलर रडार वापरत असून, त्यामुळे ढगांची उंची, हवेचा वेग, दिशा समजणे शक्य होते. याच्या मदतीने आपण तीन तास अगोदर इशारा देऊ शकतो.अत्याधुनिक यंत्रणा असूनही हवामानाचे अंदाज अनेकदा का चुकतात?बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले की पाऊस पडतो. हवामान विभाग १ हजार ते १० हजार किलोमीटरच्या क्षेत्रातून विविध घटकांच्या आधारे माहिती गोळा करतो. यात चूक झाली, तर अंदाज चुकतात.सध्या देशात १,३५० पर्जन्यमापक केंद्रे आणि ७५० स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. त्यांच्याकडून आलेल्या माहितीचे पृथक्करण करून अंदाज वर्तविले जातात. पण कधी कधी ही माहिती अचूक मिळत नाही. त्यामुळे अंदाजही खरे ठरत नाहीत.अशा चुका टाळण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करीत आहात?मान्सून मिशनअंतर्गत ‘क्लायमेट फोरकास्ट सोल्युशन्स’ हे मॉडेल वापरले जात आहे. पुण्यातील उष्णकटिबंधीय हवामान अभ्यास केंद्रात संशोधन केले आहे. या मॉडेलच्या आधारे अचूक अंदाज वर्तविणे शक्य होईल. आपल्याकडे फक्त तालुकापातळीवर केंद्रांमध्ये केवळ पाऊस मोजला जातो.तापमान व आर्द्रता मोजली गेली, तर पूर्वानुमानाची चांगली माहिती उपलब्ध होईल. यामुळे तालुकापातळीवर पावसाचा अंदाज वर्तविणे सोपे जाईल.शरद पवार यांची पाठवलेली साखर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी यावर काय सांगाल?अधिकाºयांनी राजकीय वादात पडू नये. सगळी परिस्थिती, यंत्रणा वरिष्ठांना माहीत आहे. कामाची व अस्तित्वात असलेल्या यंत्रणेची माहिती त्यांना आहे. यापेक्षा मी यावर जास्त बोलणार नाही.
तीन दिवस अगोदर अचूक अंदाज देणे शक्य, हवामान खात्याचा अंदाज ठरतो खोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:58 AM