जगाच्या पाठीवरील सर्वात बलाढ्य लोकशाही प्रजासत्ताकाचे प्रमुख बराक ओबामा आजच्या आपल्या सहासष्टाव्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून आले आहेत, हे तर यंदाच्या या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहेच, पण वैशिष्ट्य तेव्हढे एकच आहे, असेही नाही. अमेरिका ही आजच्या विश्वातील एक सर्वात मोठी आणि सर्वव्यापी शक्ती समजली जाते. बव्हंशी आंतरराष्ट्रीय संस्था अमेरिकेच्याच प्रभुत्वाखाली आहेत. साहजिकच राष्ट्र मग कोणतेही असो, त्याला त्या देशाशी जवळीक साधण्यात नेहमीच स्वारस्य वाटत आले आहे. एकेकाळी अमेरिकेच्या जोडीनेच रशिया आणि चीन ही दोन राष्ट्रेही तितकीच बलाढ्य मानली जात. चीन आणि भारत यांच्या दरम्यान प्रेमाचे संबंध तसे फारसे कधी नव्हतेच, पण रशियाशी मात्र निश्चितच प्रेमाचे संबंध होते. मात्र रशियाचे विघटन झाल्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक जवळीकेचे निर्माण होण्यास प्रारंभ झाला आणि म्हणूनच भारताने ओबामा यांना निमंत्रण देणे आणि त्यांनी त्याचा सहर्ष स्वीकार करुन या भेटीविषयी उत्सुकता दाखविणे, याकडे या जवळीकीच्या संबंधांचे द्योतक म्हणूनच पाहिले पाहिजे. तरीही आजच्या या सोहळ्याचे खरे आणि एतद्देशीय कारण वेगळेच आहे. यंदाचा हा प्रजासत्ताकाचा सोहळा प्रथमच पूर्णत: एका बिगर काँग्रेसी सरकारच्या राजवटीत साजरा केला जातो आहे. देशाच्या सत्तेवर प्रदीर्घकाळ असलेली काँग्रेसची पकड ढिली व्हायला सुरुवात झाल्यानंतर जिला खऱ्या अर्थाने बिगर काँग्रेसी सत्ता म्हणता येईल अशी आजच अस्तित्वात आली आहे. दरम्यानच्या काळात बिगर काँग्रेसी राजवटी सत्तेवर येऊन गेल्या खऱ्या, पण त्या आघाड्यांच्या राजवटी होत्या आणि या आघाड्यांचे सुकाणू बव्हंशी पूर्वाश्रमीच्या काँग्रेसजनांकडेच होते. त्यामुळे देशातील पहिल्या बिगर काँग्रेसी सरकारचे प्रमुख म्हणून मोरारजी देसाई यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला जात असला तरी, त्यांची राजकीय मुळे काँग्रेस पक्षातच होती. मोरारजींच्या नंतर बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून ज्यांची नावे घेतली जातात, ते विश्वनाथ प्रतापसिंह असोत, चन्द्रशेखर असोत की इन्द्रकुमार गुजराल असोत, तिघेही मूळचे काँग्रेसजनच. चौधरी चरणसिंह वा देवेगौडा यांचा खरे तर नामोल्लेखही होऊ नये, अशीच त्यांची कारकीर्द. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशातील पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. पण त्यांचे सरकारदेखील आघाडीचे व भाजपाच्या नेतृत्वाखालील या आघाडीची उभारणी तब्बल दोन डझन लहानमोठ्या पक्षांच्या टेकूवर झालेली. या पार्श्वभूमीवर नरेन्द्र दामोदरदास मोदी हे खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारतातील स्वबळावर निवडून्Þा आलेले पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान. त्यामुळे देशात प्रथमच एका बिगर काँग्रेसी राजवटीच्या यजमानत्वाखाली आजचा सोहळा पार पडतो आहे. बरेच भाष्यकार अलीकडे श्रीमती इंदिरा गांधी आणि नरेन्द्र मोदी यांच्यात तुलना करताना त्यांच्यातील साम्यस्थळे शोधत असतात. तसे करणे योग्य की अयोग्य, या वादात येथे पडण्याचे कारण नाही. परंतु एका बाबतीत दोन्ही व्यक्तिमत्वांमध्ये दिसून येणारा सारखेपणा नजरेत भरणारा आहे. सत्त्याहत्तरच्या निवडणुकीत जनता सरकारचे राज्य प्रस्थापित झाले, तेव्हां श्रीमती गांधी या देशाच्या एक क्रमांकावरील शत्रू असल्याचे भ्रामक चित्र उभे करण्यात आले होते. काँग्रेस पक्षाने ज्यांना अनेक वर्षे सोसले आणि झेलले असे लोकही इंदिराजी आणि काँग्रेस यापासून वेगळे झाले आणि वेगळ्या सुरात बोलू लागले. पण त्यांनी सारे घाव सहन केले व दोनच वर्षात देशात असा काही झंझावात निर्माण केला की ज्याचे नाव ते. विशेष म्हणजे तो त्यांनी त्यांच्या एकटीच्या बळावर निर्माण केला. गुजरातच्या जातीय वणव्यानंतर नरेन्द्र मोदी यांची केवळ देशातच नव्हे तर जागतिक स्तरावरही प्रचंड छीथू झाली. इतकेच कशाला, अमेरिकेने त्यांच्यासाठी आपली दारे बंद करुन टाकली. खुद्द त्यांच्या पक्षात म्हणजे भाजपातही त्यांना अनेक शत्रू निर्माण झाले. पण मोदी जरासेही विचलीत झाले नाहीत. कारणे कोणतीही असोत, भाजपाने मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांनी ज्या गतीने, जोषाने आणि अथकपणे संपूर्ण देशात झंझावात निर्माण केला, त्याच्याच परिणामी, भाजपाला एकट्याला स्वबळावर सरकार स्थापन करण्याची संधी प्राप्त झाली. तो विजय नावाला भाजपाचा होता, पण खरा तो विजय मोदींचाच होता. एका वेगळ्या अर्थाने, काळ बदलला की घराचे वासेही बदलतात, ही म्हण वापरावयाची झाली तर, ज्या अमेरिकेने मोदी यांच्यासाठी प्रवेशबंदी लागू केली होती, त्याच अमेरिकेने नंतर पंतप्रधान मोदी यांच्यासाठी त्याच देशात ठायीठायी लाल गालिचे पसरले. आणि त्याच्या पुढे जाऊन त्याच मोदींनी दिलेल्या निमंत्रणाचा ओबामा यांनी सहर्ष स्वीकारही केला. समय बडा बलवान म्हणतात, तेच खरे. आजचा हा सोहळा प्रजासत्ताक दिनाचा आणि प्रजासत्ताकात जितके महत्व सत्ताधारी पक्षाला असते, तितकेच ते विरोधी पक्षालाही असते. उभय सुदृढ असतील तरच लोकशाही सुदृढ बनत असते. पण आज देशातील विरोधी पक्ष काहीसा गोंधळलेला आणि बावरलेला दिसतो आहे. त्याची आजची ही अवस्था यंदाच्या प्रजासत्ताकाने संपविल्यास ते जनतेच्या भल्याचेच ठरु शकेल.
समय बडा बलवान
By admin | Published: January 26, 2015 3:44 AM