राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)राजकीय पक्षांचे मृत्युलेख लिहिणे हे एक मोठे जीवघेणे काम असते. नरेन्द्र मोदी यांनी झंझावात निर्माण करुन देशाची सत्ता काबीज केली आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची केविलवाणी अवस्था करुन टाकली, त्यानंतर जुलै २०१४मध्ये एका विदेशी प्रकाशन संस्थेने मला ‘आप’वर मृत्युलेख लिहिण्यासंबंधी विचारणा केली होती. पण तेव्हां मी एक पुस्तक लिहिण्याच्या कामात व्यग्र असल्याने नकार कळविला होता. पण त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या आतच आपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजय संपादन केला आणि सर्व राजकीय भाष्यकारांचे अंदाज चुकीचे ठरविले. पण आता आपची दुर्दशा लक्षात घेता, तिच्यावर मृत्युलेख लिहिण्याची वेळ खरोखरीच येऊन ठेपली आहे. गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटना लक्षात घेता, आपचा प्रयोग आता पूर्णपणे फसला आहे आणि नव्याने झेप घेण्यासाठी तो पक्ष धडपडतो आहे. अश्लील चित्रफीत प्रकरणी पक्षाचा एक मंत्री पकडला गेल्याने त्याला बळजबरीने राजीनामा द्यावा लागला असून अशा पद्धतीने राजीनामा देण्यास भाग पडलेला तो तिसरा मंत्री ठरला आहे. त्याशिवाय लाभाचे पद प्रकरणी पक्षाच्या २१ आमदारांवर बरखास्तीची तलवार लटकते आहे. पक्षाच्या पंजाब शाखेचा निमंत्रक लाच प्रकरणात अडकला असून, तिथे पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. दिल्लीतील लोकनियुक्त सरकार नव्हे तर नायब राज्यपाल हेच खरे सत्ता आणि शक्तिस्थान असल्याचा निर्वाळा देऊन दिल्ली उच्च न्यायालयाने आप सरकारचे पंख कापले आहेत. तर याच सुमारास नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपसोबत न जाता स्वत:चा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. अरविंद केजरीवाल हे पक्षाचे प्रतीक आणि पक्षाचा एकमात्र चेहरा असताना आता त्यांच्या कारभारावर जबरी टीका होऊ लागली आहे. सिद्धू यांनी आपसोबत न जाण्याचा निर्णय घोषित करताना केजरीवाल यांना एक ‘असुरक्षित वाटणारा हुकूमशाही’ असे शेलके विशेषण बहाल केले आहे. सिद्धू यांची सत्ताकांक्षा किंवा मनोकामना पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी केलेल्या या टीकेला कदाचित अधिक महत्त्व दिले जाणार नाही. पण, त्यांनी जी टीका केली आहे तशीच टीका आपचे सह संस्थापक प्रशांत भूषण आणि योगेद्र यादव यांनीही त्यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर केली होती. केजरीवाल यांच्याभोवती जमा झालेले कोंडाळे आणि त्यांची स्वत:ची ‘हायकमांड’ संस्कृती लक्षात घेता पूर्वी ते याच दोन मुद्यावर देशातील प्रमुख राजकीय पक्षांवर टीका करीत होते, हे लक्षणीय. याचा अर्थ इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत असा दावा जरी केजरीवाल करीत आले असले तरी ते तसे नाहीत. केजरीवालांच्या समर्थकांच्या मते, देशातील सत्ताधारी पक्ष आणि माध्यमे ठरवून केजरीवाल यांना लक्ष्य करीत आहेत व त्यांच्या मागे राजकीय तसेच कॉर्पोरेट लॉबीचे पाठबळ आहे. समर्थकांचा हा दावा पूर्णपणे निराधार म्हणता येणार नाही. पण केजरीवाल सतत केंद्रातील सत्तेशी संघर्षाच्या भूमिकेत जेव्हा वावरतात तेव्हा समर्थकांचे हे म्हणणे हादेखील केवळ योगायोग ठरत नाही. तरीही आपने हे समजून घ्यायला हवे की, अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी झाल्यापासून सतत इतरांवर आरोप करीत राहण्यानेच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातून सर्वसामान्यांच्या मनात सर्वच नेत्यांविषयी घृणा उत्पन्न झाली आहे. आता त्याचाच फटका स्वत: केजरीवाल यांना सहन करावा लागत आहे. आपच्या सुरुवातीच्या काळात ज्या माध्यमांनी केजरीवाल यांना भरभरून समर्थन दिले ती माध्यमे हेसुद्धा एक दुधारी शस्त्र असल्याचे आपने ओळखावयास हवे. त्या काळात ‘आप’ला जशी अतिशयोक्त प्रसिद्धी मिळाली तशी आता अतिशयोक्त कुप्रसिद्धी वा टीका मिळत आहे. सुरुवातीच्या काळात आपने एक भंपक आदर्शवाद समोर ठेऊन लोकांना सतत नीतीशास्त्राचे धडे देण्याचा सपाटा लावला होता. पण आज त्या पक्षाचे अनेक सदस्य अनैतिकतेच्या जाळ्यात अडकले आहेत. जे गैरवर्तनी आढळले त्यांच्यावर आम्ही तत्काळ कारवाई केले असा युक्तिवाद कदाचित आप करेल, पण मुळात जेव्हा तिकीट वाटप केले गेले, तेव्हाच सर्व गोष्टींचा विचार का गेला नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. उच्च कोटीच्या ज्या तात्विक भूमिकेचा अंगिकार करीत असल्याचा आपचा दावा होता, त्या आदर्शवादापासून आता हा पक्ष पूर्णपणे ढळला आहे. त्यातून आपवर विश्वास ठेवणाऱ्या मध्यमवर्गियांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. परिणामी केजरीवाल यांना आपला आदर्श मानणाऱ्या लोकांच्या नजरेत आता ते तसे राहिलेले नाहीत. सर्वसामान्यांचा पक्ष ही परिकल्पना आता पार विरून गेली आहे. कार्यकर्ता ही संस्था नामशेष होत गेल्याने पक्ष संघटना हा विषय बाजूला पडून निवडणुका जिंकणे हाच एकमेव कार्यक्रम पक्षाने आपलासा केला आहे. कदाचित त्यामुळेच समाजातील चांगल्या लोकांना आकर्षित करण्यात आप अयशस्वी ठरत आहे. पण, तरीही समाजातील एक सधन वर्ग आहे अजूनही केजरीवाल आणि आप यांच्याकडे आशेने पाहातो आहे. खालच्या आर्थिक स्तरातील मतदार मात्र अजूनही आपवर विश्वास ठेऊन आहे कारण नरेंद्र मोदी यांनी भले कितीही दावे केले असले तरी या वर्गाच्या पदरात काहीही पडलेले नाही. परिणामीे आप त्यांना जिंकून घेऊ शकेल. विशेषत: दाट लोकसंख्येच्या शहरी भागांमध्ये आपला त्यांचे समर्थन मिळू शकते. त्यापेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचे जे विषय धसास लावण्याचे सर्वच राजकीय पक्ष टाळीत असतात ते विषय आप लावून धरीत असते. त्यामुळे जोपर्यंत केजरीवाल सत्तेच्या वर्तुळाबाहेर म्हणजेच ‘सिस्टीम’च्या बाहेर आहेत तोपर्यंत त्यांना त्यांचा पाया विस्तृत करण्याची पुरेपूर संधी आहे. पण त्याचबरोबर हेही तितकेच खरे सतत भांडकुदळपणा करून यापुढे केजरीवाल यांना निवडणुका जिंकता येणार नाहीत. त्यासाठी लोकांसमोर सुशासनचा आदर्श निर्माण करावा लागेल व आपण पर्यायी सरकार देऊन यशस्वीरीत्या चालवू शकतो याची खात्री पटवून द्यावी लागेल. या दृष्टीने विचार करता, सत्तेसाठी सतत नायब राज्यपालांशी झगडत राहण्यापेक्षा राजधानी दिल्लीला सध्या छळणाऱ्या डेंग्यू आणि चिकून गुनिया यांच्याशी लढा देणे कसे राहील? ताजा कलम: गेल्या काही दिवसात केजरीवाल त्यांच्या सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना ट्विट करुन दलाल आणि मोदींचे प्रवक्ते अशी शेलकी कुशेषणे बहाल करीत आहेत. केजरीवाल यांचा माध्यमांवरील हा संताप समजण्यासारखा आहे. पण जेव्हा संतापाचे खुळेपणात रुपांतर होते, तेव्हा तोच मार्ग आत्मनाशाकडे घेऊन जात असतो.
‘आप’वर मृत्युलेख लिहिण्याची वेळ आली आहे?
By admin | Published: September 14, 2016 11:09 PM