अरुण देशपांडे, ज्येष्ठ वैज्ञानिक, विज्ञानग्राम, अंकोली, सोलापूर
आमच्याच शेजारी बार्शी तालुक्यातील गादेगावातील झोपडीला लागलेली १३ फेब्रुवारीची आग व त्यात जिवंत जळून जीव गमावलेले वृद्ध दाम्पत्य ही अत्यंत हृदयदावक घटना होती. असे काही कानावर आले की, वैज्ञानिक किंवा विज्ञानसंवादक म्हणवून घेताना शरम वाटते. येणाऱ्या भीषण उन्हाळ्यात तर या अशा बातम्या रोजच्याच होतील.
कुडाच्या व गवताने शाकारलेल्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांपर्यंत ही माहिती किंवा माध्यमे पोहोचत नाहीत व सत्ताधारी पुढारी किंवा शासकीय कर्मचारी हे काही झोपड्यांमध्ये राहात नाहीत. या आगीची धग, धोक्याची जाणीव त्यांना होणेच शक्य नाही. आपली दुष्काळी गावे सोडून ऊस बागायतीत आलेल्या हजारो ऊसतोड कामगारांच्या झोपड्या जणू आगडोंबाची वाटच पाहत असतात. त्यात खेळणारी मुले, स्वयंपाकात गुंतलेल्या लहान मुली, त्या चुली, शेकोट्या ही दृश्ये साखरसम्राटांना व ग्रामपंचायतींना दिसत नसतील का? उसाच्या फडांवरून गेलेल्या ओघळलेल्या विजेच्या तारा, विजेचे आकडे, त्यातून उडणाऱ्या ठिणग्यांमुळे लागणाऱ्या आगी या नियमित घटना आहेत. कुरणांना व वनक्षेत्रांना लागणारे व मुद्दाम लावलेल्या वणव्यातून होणारी पर्यावरणीय हानी व वन्यजीवांची होरपळ नित्याचीच आहे.
पन्नास वर्षे झाली. बाबा आमटेंच्या सोमनाथ प्रकल्पावरील श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठात प्रशिक्षण घेत असताना तेथील बैलगोठ्याला लागलेली भीषण आग व चौदा बैलांचा मृत्यू अनुभवला आणि या आगप्रतिबंधक तंत्रज्ञानाचा शोध सुरू झाला. पूर्वी मी स्वत:च एका इटालियन खत कंपनीत संशोधक, निर्देशक म्हणून काम करत असताना मोनोअमोनियम व डायअमोनियम फॉस्फेट या संयुक्त रासायनिक खतांच्या चाचण्या घेत असताना त्या रसायनातील अग्निप्रतिबंधक गुणधर्म लक्षात आले होतेच. रूडकीच्या संस्थेनेही प्रयोग सुरू केले होते. आमच्या ‘जनविज्ञान केंद्र, सोमनाथ (जि. चंद्रपूर) प्रकल्पात कोंबडा जाळीचा प्रयोग करून हे सहजसोपे समुचित तंत्रज्ञान विकसित झाले.
हे तंत्रज्ञान सोपे आहे. शेतकऱ्यांना माहीत असणारे, लोकप्रिय व सहज किंवा काळ्या बाजारात उपलब्ध असणारे - डायअमोनियम फॉस्फेट - डीएपी - म्हणजेच १८:४६ रासायनिक खताच्या पाण्यातील १४ टक्के द्रावण (१०० लि. पाण्यात १४ किलो डीएपी) हौदात, पिंपात किंवा प्लास्टिक शीट अंथरलेल्या जलाभेद्य केलेल्या खड्ड्यात चांगले काठीने ढवळून तयार करावे. त्यात गवत, तुराट्या, उसाचे पाचट यांच्या पेंड्या तसेच दोऱ्या, तट्ट्या, बांबू हे साहित्य दोन दिवस बुडवून भिजत ठेवावे. नंतर वाळवून त्या साहित्याने झोपडी शाकारावी. आधीच बांधलेली झोपडी असेल तर हे द्रावण गाळून त्याची छपरावर आतून-बाहेरून तीनदा दाट फवारणी करावी. या छपरावर बारीक कोंबडा जाळी चापून चोपून ताणून बांधावी. झोपड्यांजवळ पडलेल्या, वाढलेल्या गवतावर किंवा पाचटावरही फवारणी करून घ्यावी. चाऱ्याच्या कडब्याच्या गंजी रचताना शेवटच्या वरच्या थरावरच फवारणी करावी. (मात्र तो थर जनावरांना खाऊ घालू नये) विजेच्या तारांखाली असणाऱ्या पिकांच्या पट्ट्यावर व त्यात पडलेल्या वाळलेल्या पाचटावर हे द्रावण फवारून ठेवावे.
वनक्षेत्रात कुरणात फायर लाइन्सना लागून दोन फूट पट्ट्यांवर फवारणी करावी. तसेच झाडांच्या खाली असलेल्या गवतावर किंवा केलेल्या जैविक आच्छादनांवरही फवारणी करावी. झोपडीला दरवर्षी पावसाळ्यानंतर फक्त बाहेरूनच फवारणी करावी लागते. झोपडीला सहसा आतूनच चुलीमुळे, दिव्यामुळे किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागते. शेजारी आग लागली किंवा कुणी खोडसाळपणाने लावली तरच बाहेरून आग लागते. कोणत्याही कारणांमुळे आग लागली तरी वाढलेल्या तापमानामुळे वरच्या थरात फॉस्फरिक ॲसिड व अमोनिया तयार होतो व पॉलिमेरिक चारचे जणू पातळ पण अभेद्य रासायनिक थराचे कवच निर्माण होते. त्यातून हवेतील प्राणवायू आत पोहोचू शकत नाही व आग लागू शकत नाही. वर बांधलेल्या कोंबडा जाळीमुळे उष्णतेचे चटके वेगाने वहन होऊन गवताच्या ज्वलनांकापर्यंत तापमान जातच नाही. त्यामुळे आगीच्या ज्वाळा तयार होत नाहीत किंवा बाहेरचे आगीचे लोळ आतपर्यंत पोहोचू शकत नाहीत. तसेच छप्पर पेटून खाली न कोसळल्यामुळे आतल्या माणसांना चीजवस्तू घेऊन जनावरांचे कासरे, साखळ्या सोडवून बाहेर सुरक्षित पळता येते.
गंजीवरच्या चारा थराचे किंवा वनक्षेत्रात फवारणी केलेल्या गवत व काड्यांचे पावसाळ्यानंतर उत्कृष्ट खतच होते. या समुचित तंत्रज्ञानाची जाहीर प्रात्यक्षिके आयोजित व्हावीत. प्रत्येक झोपडी, गोठा, गंज मंडप, ढाबा किमान आगप्रतिबंधक करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने, साखर कारखान्याने मोहीम राबवावी. एरव्ही राजकीय, धार्मिक अंधश्रद्धांच्या मोहिमा आखून अफवांचे वणवे लावणाऱ्या समाजमाध्यमविरांनी अशा वैज्ञानिक प्रात्यक्षिकांचे व्हिडीओज् काढून ते व्हायरल करावेत, हे कळकळीचे आवाहन. ही प्रात्यक्षिके म्हणजेच आगीमुळे मृत्युमुखी पडलेल्या जीवांना खरी श्रद्धांजली ठरेल. arundeshpande@icloud.com