जोडा... आणि तोडा!
सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची महत्त्वाकांक्षी ‘भारत जोडो यात्रा’ सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने या यात्रेचा धसका घेतल्याची चर्चाही देशात जोर धरते आहे. नेमका हाच मुहूर्त साधून गोव्याच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षात मोठी फूट पडली. भाजपच्या बड्या नेत्यांशी गोवा काँग्रेसच्या आठ आमदारांची व विशेषत: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची बोलणी गेले काही महिने सुरू होती. त्यामुळे गोव्यात काँग्रेस फुटणार, हे नक्की होते. नेमकी ‘भारत जोडो यात्रा’ ऐन बहरात येत असतानाच या आमदारांना फोडून भाजपने मोठा डाव टाकला आहे. काँग्रेसजनांच्या मनोधैर्यावर आणखी एक आघात! काँग्रेसमुक्त भारतची घोषणा भाजपने २०१४ मध्ये दिली. तेव्हापासून त्या दिशेने सातत्याने पावले पडतच आहेत.
गोव्यासारख्या छोट्या राज्यांना प्रारंभी काँग्रेसमुक्त करावे, हे भाजपचे धोरण फार गुलदस्त्यात राहिलेले नाही. गोव्यातल्या काँग्रेसच्या आठ आमदारांनी काल पक्षापासून फारकत घेतली. विरोधी पक्षनेत्यानेच अन्य आमदारांना घेऊन फुटावे, हे गोव्यासारख्या राज्याला नवे नाही. यापूर्वी दोनवेळा असे घडलेले आहे. दिगंबर कामत यांना काँग्रेस पक्षानेच २००७ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री केले होते. तत्पूर्वी त्यांना एवढे मोठे पद कधी मिळाले नव्हते. स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे कामत हे क्रमांक एकचे शत्रू! पस्तीस हजार कोटी रुपयांच्या कथित खाण घोटाळाप्रकरणी भाजपने कामत यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न मोठ्या शर्थीने चालवला होता. कामत यांच्यावर ईडीचे व पोलिसांचे छापेही पडले होते. पर्रीकर यांच्या निधनानंतर आता कामत पुन्हा भाजपवासी होत आहेत. एकुणातच ‘सबका साथ, सबका विकास’ हा भाजपचा मंत्र देशभरातील काँग्रेस आमदारांनाही ‘पटला’ असावा आणि सोयीचाही वाटत असावा, असे दिसते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला आहे. नितीशकुमार यांच्या दिल्लीतील गाठीभेटींची गेल्या आठवड्यात देशभर चर्चा झाली. राहुल गांधी यांच्या यात्रेतूनही भाजपविरोधातल्या सर्वांनीच एकत्र यायला हवे, असा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र केंद्रातील सत्ताधारी भाजप हे धूर्त व चाणाक्ष राजकारणाचे मूर्तीमंत रूपच म्हटले पाहिजे. विरोधकांनी एकत्र येण्यापूर्वीच विरोधकांची शक्य तेवढी शकले पडण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जात आहे. काहीजण ईडीच्या छाप्यांमुळे व पोलीस चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे घाबरून शरण येतात. काहीजण आपल्याला मंत्रीपद मिळेल, या आशेपोटी शरण येतात. काहीजण ‘काँग्रेसमध्ये काय भवितव्य आहे?’ असा विचार करतात. २०२४ च्या निवडणुकीनंतर पुन्हा देशात भाजपचीच सत्ता आली, तर आपले काही खरे नाही, असाही विचार देशातील अनेकांच्या मनात येतच नसेल, असे नाही.
राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नितीशकुमार, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन असे काही नेते सध्या भाजपविरोधात ठाम संघर्षाची भूमिका घेऊन उभे ठाकले आहेत. विरोधकांमध्ये सर्व बाजूने दहशत असल्याची चर्चा देशभरात चालू असते. कधी पंजाब, तर कधी दिल्लीत हालचाली करून आम आदमी पक्ष फोडण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतेच केले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. जनतेसाठी मात्र आता हे आरोप-प्रत्यारोप व आमदारांची पक्षांतरे रोजचीच झाली आहेत. आपचे नेते राघव चड्डा यांनी काल सूचक प्रतिक्रिया दिली. ऑपरेशन लोटस दिल्ली व पंजाबमध्ये फसले; पण गोव्यात यशस्वी झाले, असे ते म्हणाले. गोव्याची विधानसभा ही फक्त चाळीस आमदारांची. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा वीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला अकरा जागांवर समाधान मानावे लागले होते.
सत्ताधारी भाजपने अपक्ष व अन्य छोट्या पक्षांच्या पाच आमदारांचा पाठिंबा मिळवून सरकार स्थापन केले. पंचवीस आमदारांचे संख्याबळ हाताशी असताना, आता आणखी काँग्रेसच्या आमदारांची आयात भाजपमध्ये केली जाऊ नये, असा मुद्दा भाजपचेच काही मंत्री व आमदार खासगीत पत्रकारांपाशी मांडत होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोव्यात भाजपला अधिक बळकट करण्यासाठी आमदारांची आयात करण्याच्या भूमिकेवर पक्ष ठाम राहिला. या पडझडीतून पक्षाला सावरण्यासाठी काँग्रेसला कदाचित ‘काँग्रेस जोडो’सारखे एखादे अभियान राबवावे लागेल.