शहरं
Join us  
Trending Stories
1
१०-१५ दिवसांत आचारसंहिता? जागावाटपावर सलग ३ दिवस मविआची बैठक; महायुतीही एक्टिव्ह मोडवर
2
केंद्राकडून संवेदनशील सूचना, तीन मुख्य न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांच्या शिफारशीमध्ये मोठा बदल
3
...तर 'या' दिवशी केजरीवाल सरकारी बंगला रिकामा करतील, सुरक्षाही घेणार नाहीत, संजय सिंहांनी दिली संपूर्ण माहिती...
4
बांगलादेश होणार मालामाल, आधी अमेरिका मग जागतिक बँक देणार २ अब्ज डॉलर्सची मदत
5
तीन वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री बेरोजगार; म्हणाली, "घर चालवायचं आहे, बिलं भरायची आहेत..."
6
पितृपक्ष: दत्तगुरु उपासनेने लाभ, पितृदोषावर ‘हा’ मंत्र अत्यंत प्रभावी; जप करा, कृपा मिळवा
7
जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान
8
२ लाखांचा DD घेऊन मोहन चव्हाण 'मातोश्री'वर पोहचले; पोलिसांनी गेटवरच अडवले, काय आहे प्रकरण?
9
Modi Familyच्या वादावर अखेर तोडगा निघाला! आईचं भावनिक वक्तव्य; म्हणाल्या, "वडिलांचा वारसा..."
10
किंग कोहलीनं 'त्या' ट्विटसह चाहत्यांना टाकलं कोड्यात; मग काही वेळात स्वत:च सोडवलं कोडं
11
पितृपक्ष: प्रारंभी चंद्रग्रहण, समाप्तीला सूर्यग्रहण; ६ राशींना शुभ-लाभ, ६ राशींना खडतर काळ!
12
Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय?
13
अंत्यसंस्कारासाठी एक मिनिटही नव्हतं का?; कामाच्या ताणामुळे मुलीचा मृत्यू, आईने कंपनीला लिहीलं पत्र
14
गणपतीला अर्पण केलेला लाडू १ कोटी ८७ लाखांना विकला; दरवर्षी होतो लिलाव
15
हिजबुल्लाहसाठी पेजर बनवणारी तैवानी कंपनीचा खुलासा; युरोपियन कनेक्शन जोडले
16
महागड्या रिचार्जपासून होणार सुटका! सरकार ५ कोटी Wi-Fi हॉटस्पॉट बसवणार, स्वस्तात मस्त Unlimited इंटरनेट मिळणार!
17
Reliance Jio चा धमाका; Jio 91 Recharge मध्ये संपूर्ण महिन्यासाठी मिळणार Unlimited Calling, Data
18
'तुंबाड' फेम सोहम शाहने केलं अनिता दातेचं कौतुक, म्हणाला- "सिनेमात तिच्याबरोबर काम करताना..."
19
PItru paksha 2024: एरव्ही न केली जाणारी आमसुलाची चटणी श्राद्धाच्या नैवेद्याचा मुख्य जीवच; वाचा कृती!
20
Pitru Paksha 2024: लक्षात ठेवा! 'या' पाच चुका करत असाल तर पिंडाला कधीही शिवणार नाही कावळा!

आजचा अग्रलेख: आधी मुलगा सुधारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 7:37 AM

लिंगभेदाची मानसिकता खोलवर रुजलेल्या समाजाला न्यायालयाने काही मूलभूत प्रश्न विचारले आहेत. आपण सगळी बंधने महिलांवरच का टाकतो, हा त्यातील मुख्य प्रश्न आहे.

मुली व महिलांच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर चिंतन करणाऱ्या महिलांच्या एका मेळाव्यात मुलींच्या माता पोटतिडकीने बोलत असताना मध्येच अन्य एका मातेने ‘बोलायचे आहे’ म्हणून हात वर केला. थोडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून ती उठली व थेट ध्वनिक्षेपकाजवळ येत म्हणाली, ‘मला मुलगी नाही; पण हेच इथे अधिक महत्त्वाचे आहे. कारण, माझा मुलगा चांगला वागला तरच तुमच्या मुली सुरक्षित राहतील!’ मेळाव्यात क्षणभर गूढ शांतता पसरली आणि त्या माउलीला काय म्हणायचे आहे, हे लक्षात येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. अगदी याच व अशाच गंभीर भावना मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बदलापूर येथील दोन बालिकांच्या लैंगिक छळप्रकरणी सुनावणीदरम्यान व्यक्त केल्या आहेत.

बदलापूरच्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने ही याचिका स्वयंप्रज्ञेने दाखल करून घेतली आहे आणि न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने तिच्यावरील सुनावणीदरम्यान संपूर्ण समाजाने विचार करावा असे चिंतन मांडले आहे. आपल्या समाजाची मानसिकताच अशी आहे की, मुली व महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलताना त्यांच्या वागण्यावरच अधिक चर्चा होते. ती कपडे कोणते घालते, कोणत्या वेळी घराबाहेर जाते, घरी किती वाजता परत येते, बाहेर वावरताना तिचे एकंदर वागणे कसे असते, या विषयांवर कोलाहल वाटावा अशी चर्चा आपण करतो खरे. तथापि, हे भान बाळगत नाही की, त्या पीडिता आहेत. त्यांच्याकडे पाहण्याची नजर कशी असावी, हे त्या ठरवू शकत नाहीत. एखादेवेळी मानसिक व शारीरिक हल्ल्याची वेळ आलीच तर ती अगतिक, लाचार असते. मुळात तिची चूक अशी नसतेच. ती कितीही चांगली वागली तरी ते प्रसंग टाळणे तिच्या हाती नसते. तिने संपूर्ण अंग झाकणारे कपडे घातले तरी अवतीभोवतीच्या विखारी नजरा त्या कपड्यांच्या पलीकडे पोहोचलेल्या असतात. कारण, मुळात अशा नजरा व त्यासोबत वासना जाग्या करणारा मेंदू हेच त्या लैंगिक हल्ल्याचे कारण असते. हे भान केवळ सामान्य माणसांनाच नसते असे नाही. काही थोर विचारवंत म्हणविल्या जाणाऱ्या किंवा समाजात पूजनीय मानल्या जाणाऱ्या व्यक्तीदेखील मुलींनी संपूर्ण अंग झाकून घेणारे कपडे घालावेत, फारसा नट्टापट्टा करू नये वगैरे सूचना सतत करत असतात. असेच असेल तर अवघ्या काही महिन्यांची बाळे किंवा चार-दोन वर्षांच्या अबोध बालिका ते साठी ओलांडलेल्या वृद्ध मातांवर देखील नराधम का अत्याचार करतात, या प्रश्नाचे उत्तर या मान्यवरांनी द्यायला हवे; पण ते कधीच मिळणार नाही. कारण मुली-महिलांच्या अत्याचाराचे मूळ स्त्री ही उपभोग्य वस्तूच आहे असे मानणाऱ्या पुरुषी मनोवृत्तीत आहे. या साऱ्यांच्या अनुषंगाने लिंगभेदाची मानसिकता खोलवर रुजलेल्या समाजाला न्यायालयाने काही मूलभूत प्रश्न विचारले आहेत. आपण सगळी बंधने महिलांवरच का टाकतो, हा त्यातील मुख्य प्रश्न आहे.

बिघडलेल्या मुलांमुळे मुली असुरक्षित आहेत, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? बाहेरच्या असुरक्षित वातावरणातून सुटका म्हणून सातच्या आत घरात येण्याचा आग्रह केवळ मुलींनाच का केला जातो? त्या आशयाचे चित्रपट काढताना मुलांवर का बंधने टाकली जात नाहीत?  मुला-मुलींच्या संस्कारक्षम वयात मुलींचा, महिलांचा आदर करण्याचे, त्यांना समान वागणुकीचे संस्कार का केले जात नाहीत? शिक्षणाच्या प्रसारातून समाज लिंगसमानतेविषयी उन्नत होण्याऐवजी अधिक संकुचित बनत चालला आहे. मुले व मुलींना त्यांच्या उमलत्या वयात लैंगिक शिक्षण देणे हा खूप महत्त्वाचा विषय असताना त्याकडे नितळ दृष्टीने पाहिले जात नाही. सहशिक्षणालाही विरोध करणारे अनेकजण आहेत. हीच मंडळी सतत संस्कारांबद्दल बोलत असतात; पण ते संस्कार त्यांना मुलींवरच अभिप्रेत असतात. बदलापूर किंवा इतर ठिकाणी घडली तशी एखादी घटना घडल्यानंतरच आपल्या समाजाला जाग येते. जनता, सरकार, प्रशासन, न्यायव्यवस्था अशा सर्व स्तरांवर तेवढ्यापुरती घनघोर चर्चा होते आणि कालांतराने ती घटना विस्मृतीत जाते. दरम्यान, बिघडलेली मुले रस्त्यावर सावज हेरतच असतात. त्यांना अडविण्याऐवजी, त्यांना सुधरविण्याऐवजी त्यांच्या बिघडलेपणाला बळी पडणाऱ्या मुलींवरच निर्बंधांचे ओझे लादले जाते. ही चुकीची दिशा न्यायालयाने अधोरेखित केली आहे. आता दुरुस्तीची जबाबदारी धोरणकर्त्यांची आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर