आंतरराष्ट्रीय संबंधात तर्क-वितर्क आणि भाबड्या आशा-आकांक्षेला काही स्थान नसते. जेव्हा दोन राष्ट्रांत युद्ध छेडलेले असेल आणि समोर राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणारा रशियासारखा बलाढ्य देश असेल, तर ‘खयाली पुलाव’ पकविण्यात तसा काही अर्थ नसतो. एखाद्या तिसऱ्या शक्तीची मध्यस्थी फळाला येऊन रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम मिळेल, ही आकांक्षा बाळगून बसलेल्यांच्या स्वप्नरंजनावर काल रशियाने पाणी फेरले. संपूर्ण युरोप साखरझोपेत असताना, सोमवारच्या पहाटे रशियाने युक्रेनच्या पस्तीस शहरांवर एकाच वेळी बॉम्ब वर्षाव करून ती शहरे बेचिराख करून टाकली.
रशियन बॉम्बवाहक विमानांनी हवाई हद्द ओलांडून युक्रेनवर हल्ले चढविले. एवढे कमी वाटले म्हणून की काय, काळा समुद्र, कॅस्पियन सागर भागातून शंभरावर स्कड क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे बॉम्ब डागले गेले. युक्रेनची राजधानी कीववर सर्वाधिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. रशियाच्या या हल्ल्यात युक्रेनचे १० ऊर्जा प्रकल्प, १५-२० पाणीपुरवठा केंद्रे, दवाखाने, औद्योगिक आस्थापने उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत युक्रेनच्या पूर्व भागातील शहरांवर लक्ष केंद्रित केलेल्या रशियाने अचानक पश्चिम भागातील लुत्सक शहराला लक्ष्य केल्याने अनेक जण अचंबित झाले. या भीषण हल्ल्यात युक्रेनमध्ये झालेल्या नुकसानाचा अंदाज वर्तविणे कठीण आहे. जीवितहानीचा आकडा दहाच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत असले, तरी तो विश्वासार्ह मानता येणार नाही. खरेतर, झोपेत असताना एवढा महाभयंकर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर एखादा देश पार खचून गेला असता अथवा गलितगात्र झाला नसता, तरच नवल! परंतु गेली अडीच वर्षे संपूर्ण जगाला अशाच प्रकारे अचंबित करणाऱ्या युक्रेनने रशियाच्या सारातोव्ह शहरातील एका उंच रहिवासी इमारतीवर ड्रोन हल्ला करून जबरदस्त पलटवार केला. रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यापेक्षा युक्रेनचा हा ड्रोन हल्ला इतका भेदक होता की, अमेरिकेवर झालेल्या ९-११च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण जागी झाली. टीव्हीवर या हल्ल्याचे दृश्य पाहताना ९-११ची पुनरावृत्ती असल्याचा क्षणभर भास झाला. युक्रेनसारखा तुलनेने चिमुकला देश रशियासारख्या महाशक्तीला आतापर्यंत तरी पुरून उरला आहे. आपल्याकडच्या हिंदी चित्रपटाच्या भाषेत सांगायचे तर, ‘झुकेगा नहीं साला!’ एवढी चिवट झुंज युक्रेन देत आहे. वास्तविक, २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनच्या पूर्व भागातील प्रमुख शहरांवर हल्ला केल्यानंतर या दोन देशांतील युद्धाला तोंड फुटले. रशियासमोर युक्रेन टिकणार नाही, युरोपियन राष्ट्रांची मदत पोहोचेपर्यंत युक्रेन पांढरे निशाण फडकावेल, असे अनुमान वर्तविण्यात आले होते. मात्र, युक्रेनने शस्त्रे खाली ठेवली नाहीत.
युद्ध सुरू होऊन अडीच वर्षे म्हणजे जवळपास नऊशे दिवस झाले. लढावू बाण्याचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्या नेतृत्वात युक्रेनियन्स अक्षरश: गनिमी काव्याने लढत आहेत. युद्धाच्या तिसऱ्या दिवशी जेलेन्स्की यांनी केलेले भाषण सर्वांना आठवत असेल. या लढाईचे ‘विध्वंसक शक्ती विरुद्ध मानवतावादी जनता’, अशा शब्दांत त्यांनी वर्णन केले होते आणि याच शब्दांनी त्यांनी उर्वरित जगाची मनेदेखील जिंकली होती. युक्रेनने आजवर दाखविलेल्या या विजिगीषू वृत्तीने रशियाच्या तोंडचे पाणी पळविले आहे. पेंटागॉनने काढलेल्या अनुमानानुसार या युद्धात रशियाची सर्वाधिक हानी झाली आहे. शेकडो रणगाडे, लष्करी वाहने, त्यावरील क्षेपणास्त्रे, सैन्य युक्रेनच्या हाती लागले आहे. सुमारे पाच हजार आण्विक शस्त्रे, अत्याधुनिक रणगाडे, अचूक लक्ष्यभेद करणारी क्षेपणास्त्रे बाळगणाऱ्या आणि जागतिक बाजारपेठेत आपली शस्त्रसामग्री विकणाऱ्या रशियाला युक्रेनचा पाडाव करता न येणे, ही एक प्रकारे नामुश्कीच आहे, म्हणून कदाचित व्लादिमीर पुतीन यांनी रणनीतीत बदल करून युक्रेनवर भीषण हल्ला केल्याचे मानले जात आहे. यातून युक्रेनचा पश्चिमेकडील भाग बळकावण्याचा मनसुबा दिसून येतो. शिवाय, चर्चेसाठी आंतरराष्ट्रीय समुदायावर दबाव आणण्याची खेळीही असू शकते.
अमेरिका, मध्य आशिया आणि युरोपियन देशांनी लादलेले निर्बंध, युद्धामुळे खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कच्चे तेल कुठवर पुरणार, याची जाणीव पुतीन यांना नक्कीच असणार. कदाचित याच विमनस्क अवस्थेतून त्यांनी ही आरपारची लढाई सुरू केली असेल. एकाच वेळी पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंनी हल्ला चढवून युक्रेन नेस्तनाबूत करण्याचे मनसुबे यामागे असू शकतात.