- अ. पां. देशपांडे लेखमालेचे शीर्षक जरी तंत्रभाषा असले तरी मराठी विज्ञान परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या परिभाषा संचालनालयाच्या सर्व विषयांच्या समित्यांवर प्रतिनिधी पाठवावा अशी शासनाची विनंती असते. शिवाय विज्ञान व्यक्त करण्यासाठी केवळ वैज्ञानिक संज्ञा येऊन उपयोगाचे नसून साहित्यिक मराठी भाषाही यायला हवी.वाङ्मय समीक्षा समितीवर मराठी विज्ञान परिषदेचे सभासद आणि प्रसिद्ध साहित्यिक प्रा. रा.भि. जोशी यांना पाठविण्यात आले होते. या समितीच्या कामकाजावर त्यांनी परिषदेला पाठविलेल्या अहवालात म्हटले होते, की वाङ्मय समीक्षा समितीत ‘मूड’ या शब्दावर चर्चा चालू होती. मूड हा शब्द दिसायला साधा आहे. मन:स्थिती, मनोवस्था, भावस्थिती, भाववृत्ती असे या शब्दाचे मराठी पर्याय वापरले जातात आणि ते स्वीकारलेही जातात. पण दिवसाच्या व रात्रीच्या प्रहराचे, वर्षाच्या वेगवेगळ्या ऋतूंचे, निसर्गाच्या वेगवेगळ्या दृश्यांचे मूड्स असतात. असे आत्मसापेक्ष, स्वच्छंदतावादी लेखनात नेहमी प्रत्ययाला येते, पण निर्जीव प्रहरांना, ऋतूंना, दृश्यांना भाववृत्ती, मनोवृत्ती कशा असतील? का ते आपल्या मन:स्थितीचे निसर्गावर प्रक्षेपण आहे? इंग्रजीतही असेच आहे. अशा निर्जीव वस्तूंच्या संदर्भात मन:स्थिती, भाववृत्ती हे शब्द वापरले जाऊ शकतील का? कोणी सांगावे? कदाचित जातीलही किंवा इतर अनेक शब्दांप्रमाणे मूड हाच एक शब्द मराठीत रुळून मराठीच होईल आणि इंग्रजीतील सर्व अर्थांनी वापरला जाईल. प्रा. रा.भि. जोशींचे हे उद्गार किती दूरदर्शी होते पाहा. आज शाळेत जाणारा तिसऱ्या - चौथ्या इयत्तेतील मुलगाही शाळेला जायचे नसेल तर आपल्या आईला म्हणतो, ‘‘आज माझा शाळेत जायचा मूड नाही.’’मराठी भाषेचा विज्ञान व्यक्त करण्यासाठी किती समर्थपणे उपयोग होतो हे आपण काही उदाहरणांवरून पाहू या. प्राचार्य गो. रा. परांजपे यांनी ७५ वर्षांपूर्वी ‘सृष्टिज्ञान’ मासिकात लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे, की हिरवे पान हा अन्नाचा कारखाना आहे. अन्न खाल्ल्यावर शरीरात बिनज्योतीचा जाळ पेटतो. शरीरात हालचाल सुरू होऊन शरीराला ऊबही मिळते. हालचाल म्हणजे जीवाची क्रिया. जीव हे सूर्यप्रकाश साठविल्याचे द्योतक. म्हणून जीव व अन्न एक आहेत. दुसरे उदाहरण पाहा, ध्वनी लहरी म्हणतात, मला बोलता येते पण चालता येत नाही, तर विद्युत लहरी म्हणतात, मला लांब चालता येते पण बोलता येत नाही. ध्वनी लहरी विद्युतलहरींच्या पाठीवर बसून आकाशातून हजारो मैल जाऊ शकतात. या अशक्त ध्वनी लहरी मोठ्या मनुष्याच्या खांद्यावर बसविलेल्या मुलाप्रमाणे जर दुसऱ्या कसल्यातरी जास्त ताकदवान व वेगवान अशा वाहकाच्या खांद्यावर चढवल्या तर... द्रवांवर दाब दिला असता त्याच्या प्रवाहीपणात होणारे बदल याविषयी डॉ. माशेलकरांनी संशोधन केले. हे फुगणाऱ्या आणि आक्रसणाऱ्या बहुवारीकांच्या (पॉलिमर) उष्मागतिकी आणि वहन पद्धतीचे संशोधन आहे. जेव्हा एखादा पदार्थ विद्र्रावकात विरघळतो तेव्हा त्या द्रावणाचे तापमान, दाब, त्यातील क्षारांचे प्रमाण वेगवेगळ्या परिस्थितीत बदलू शकतात. एखाद्या विशिष्ट पदार्थाचे प्रवाहीतेच्या संबंधीचे काही आगळेवेगळे गुणधर्म असतात, जे औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाचे ठरतात. काही द्रावावरील दाब जसा वाढतो तसतशी त्याची वाहकता किंवा प्रवाहीपणा वाढत जातो. रंगारी जेव्हा रंगामध्ये ब्रश बुडवतो तेव्हा डब्यातील रंग घट्ट असतो. पण जेव्हा रंगारी भिंतीवर ब्रश दाबून रंग देतो तेवढ्या क्षणी रंग काहीसा पातळ होतो. येथे ब्रशने दाब दिल्यावर तो दाब असेपर्यंत रंगाचा प्रवाहीपणा वाढतो. चॉकलेट तोंडात टाकल्यावर आपण ते जिभेने टाळूवर दाबतो तेव्हा ते काहीसे विरघळते. पण, जिभेवर नुसते चॉकलेट ठेवले तर ते हळूहळू विरघळते.जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी १९९० साली दिलेल्या भाषणात पाण्यावर विवेचन करताना म्हटले होते, ‘पावसातील, जमिनीतील ओलाव्याची आणि भूजलपातळीची मोजणी तुलनेने सोपी असली, तरी पूर अवस्थेतील वेगवान पाण्याची, उतरणीवरील खळाळत्या प्रवाहाची अथवा भुसभुशीत पोवळ्याप्रमाणे साठणाऱ्या बर्फाची अचूक मोजणी अवघड आहे. कारण ही मंदगती पाणी मोजणाऱ्या यंत्रांच्या पात्यांना हलवू शकत नाही. म्हणून अति जलद किंवा प्रक्षुब्ध प्रवाहांच्या मोजणीची बिनचूक उपकरणे तयार करण्यासाठी विद्र्राव्य रंग, समस्थानिके (आयसोटोप्स), ध्वनितरंग, लेझर अशा अन्य साधनांचा उपयोग करण्याच्या दिशेने शास्त्रज्ञाचे प्रयत्न सुरू आहेत.