सलग सतरा दिवस, सुमारे चारशे तास मृत्यूशी झुंज सुरू होती. खडतर आव्हानांशी सामना सुरू होता. सिलक्यारा बोगद्यातील बचाव मोहिमेला अखेर यश आले आणि साऱ्या देशवासीयांच्या आनंदाला परिसीमा उरली नाही. सुटका केलेल्या ४१ मजुरांसह बचाव मोहिमेतील सर्वांच्या घरी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. या बोगद्याच्या आसपासच्या हॉटेल्समध्ये या मजुरांचे नातेवाईक आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तर अगदी अवर्णनीय आहे. १२ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या बचाव मोहिमेत विविध राज्यांतील आणि परदेशांतील तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. एनडीआरएफसह इतर पाच संस्था बचाव मोहिमेत सहभागी होत्या. लष्करही दाखल झाले होते. बचाव पथकांतील सदस्यांच्या चेहऱ्यावरील आनंद विलोभनीय होता. बोगदातज्ज्ञ ख्रिस कूपर, लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (निवृत्त), ऑस्ट्रेलियाचे मायक्रोटनिंग तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स, रस्ते- वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल.
बोगद्यात अडकलेले मजूरही देशातील विविध राज्यांतील रहिवासी आहेत. भाषा, प्रांत, धर्म, देश वेगवेगळे असतानाही मानव धर्माला जागून सारे एकटवले. त्याचा परिणाम मानवी सहृदयतेच्या विजयात झाला. सारे जग युद्धाच्या बातम्यांनी चिंताक्रांत आहे. अशा वेळी माणुसकीचे आगळे रूप दाखविणाऱ्या घटनेची जगभरातील माध्यमांनी दखल घेतली. पर्वताला हलवून जगण्याची लढाई यशस्वी झाल्याच्या उपमा दिल्या गेल्या. माणूसपण शिल्लक असल्याची झुळूक युद्धांच्या नकारात्मक बातम्यांमध्येही या घटनेने सर्वांना दिली. बचाव पथकासमोर आणि आतील अडकलेल्या मजुरांसमोर अनेक संकटे समोर होती. जीवन-मृत्यूमध्ये चाललेली ही लढाई होती. मजुरांच्या सुटकेची शक्यता दिसत असतानाच जीवनासाठीचा संघर्ष लांबत चालला होता. अखेर ‘रॅट-होल माइनर्स’ अर्थात प्रत्यक्ष माणसानेच आत जाऊन उरलेला मलबा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ५७ मीटर लांब मलबा पडला होता. त्यातील शेवटचा दहा ते बारा मीटर मलबा ‘रॅट-होल माइनर्स’नी काढला आणि दिवाळीचा आनंद देशवासीयांच्या घराघरांत साजरा झाला. ‘मॅन बिहाइंड द मशीन’ महत्त्वाचा असतो, हे पुन्हा अधोरेखित झाले. युद्धामध्ये कुणाकडे कुठली शस्त्रे आहेत, यापेक्षा ती शस्त्रे चालविणारे किती कुशल आहेत, यावर युद्धातील जय-पराजय ठरतो. या संज्ञेची प्रचिती ‘रॅट-होल माइनर्स’मुळे पुन्हा आली. वास्तविक अशा प्रकारच्या माइनिंगला हरित लवादाने बंदी घातली आहे; पण या ठिकाणी अपवादात्मक स्थितीत त्याचा वापर करण्यात आला.
मजुरांच्या यशस्वी सुटकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या भावना जाणून घेतल्या. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही मजुरांची विचारपूस केली. सर्व मजुरांना आता हृषीकेश येथे पुढील उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे. ४१ मजुरांची सुटका हा साऱ्या देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. सर्व यंत्रणा एकत्रित आल्या आणि त्यांच्यात उत्तम समन्वय झाला, तर अशक्यही शक्य होते, हे पुन्हा दिसले. या ठिकाणी मजुरांची यशस्वी सुटका करून आनंदाचा क्षण साजरा करीत असतानाच चार धाम मार्गातील पर्यावरण आणि तेथे होणारा विकास यावरही एक नजर टाकली पाहिजे. चार धाम महामार्ग परियोजनेंतर्गत सिलक्यारा येथे साडेचार किलोमीटर लांबीचा दुहेरी मार्ग असलेला बोगदा तयार करण्यात येत आहे. या बोगद्यामुळे चार धाम यात्रेकरूंचा वेळ वाचणार आहे. गंगोत्री आणि यमुनोत्री अक्ष याद्वारे जोडला जाणार आहे. त्यामुळे बर्फाळ प्रदेशातून पन्नास मिनिटांचे अंतर कापण्याऐवजी यात्रेकरू केवळ पाच मिनिटांत हे अंतर पार करतील. सर्व प्रकारच्या हवामानात ही संपर्क यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प अतिशय आकर्षक असला, तरी पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा विचार पूर्णपणे केला गेल्याचे दिसत नाही.
तसेच, बोगदा बांधताना सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन करण्यात आले होते का, हेदेखील पाहणे गरजेचे आहे. कारण मलबा पडल्यानंतर मजुरांना सुरक्षितस्थळी जाण्याचा मार्गच उपलब्ध नव्हता. साऱ्या देशासाठी अत्यंत पवित्र असलेल्या चार धाम यात्रामार्गाचा विकास हा तेथील भूगोलावर परिणाम करणारा नसावा, अशी रास्त अपेक्षा आहे. जोशीमठ येथील घटना ताजी आहे. तेथील भूमी खचून रस्त्यांसह इमारतींना तडे गेले आहेत. स्थानिक नागरिक विकासकामांना दोष देत आहेत. स्थानिक पातळीवर यात्रेकरूंची सोय करण्याच्या नावाखाली होत असलेले नियमांचे उल्लंघन, यात्रेला पर्यटनाचे आलेले स्वरूप यावरही मंथन होणे गरजेचे आहे.