काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेने एक नवा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रात २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपने व्होट बँकेच्या राजकारणाला आमचा विरोध आहे, असा प्रचार करीत देशातील बहुसंख्याक असलेल्या हिंदूंच्या एकत्रीकरणाची व्होटबँक नीतीच स्वीकारली. परिणामी, गावोगावी आणि शहरा-शहरांत अल्पसंख्याक समूहाच्या विरोधात बोलण्याची, त्यांना भीती वाटेल असे कार्यक्रम राबविण्याची जणू स्पर्धाच लागली. अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभर प्रचंड हिंसाचार झाला होता. गुजरातमधील गोध्रा हत्याकांडानंतर संपूर्ण गुजरात पेटला होता. तरीही राजकीय सत्तेसाठी धार्मिकतेचा आधार घेणे भाजपने सोडलेले नाही. परिणामी, समाजात हिंदू-मुस्लिम तणाव वाढण्यास अनेक घटना कारणीभूत ठरल्या. अल्पसंख्याकांच्या व्होट बँकेच्या राजकारणाला विरोध करीत बहुसंख्याकांच्या व्होट बँकेचे राजकारण पुढे आले. त्यातून निर्माण झालेली तिरस्काराची भावना, समाजा-समाजामधील तणाव आदीला विरोध करण्यासाठी राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेचे आयोजन केले होते. त्याची सांगता काश्मीरच्या श्रीनगर शहरातील ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकावून केली. याच लाल चौकात भारताचे पहिले पंतप्रधान आणि राहुल गांधींचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधानपदी असताना काश्मीर ताब्यात घेण्यासाठी घुसलेल्या पाकिस्तानी टोळ्यांचा पराभव केल्यानंतर १९४८ मध्ये तिरंगा फडकविण्यात आला होता. त्याचे स्मरण यानिमित्त होते आहे.
कन्याकुमारी ते काश्मीर अशी ४०८० किलोमीटरची पदयात्रा राहुल गांधी यांनी बारा राज्यांतून आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून पूर्ण केली. पदयात्रेत शेकडो, हजारो, काही ठिकाणी लाखो लोकांनी उपस्थिती लावून त्यांना पाठिंबा दिला. भारतभूमीवर हिंदू-मुस्लिम वादाचे संघर्ष जितके झालेत त्याहून जास्त बळकट सार्वजनिक सौहार्दाची परंपरादेखील आहे. असंख्य गावांत आणि शहरांत हे दोन्ही समाज एकत्र येऊन अनेक सणवार साजरे करतात. एकमेकांना मान देतात. राहुल गांधी यांनी त्या सौहार्दाच्या परंपरेला साद घातली. केवळ शेतकरी, शेतमजूर किंवा कामगार नव्हे तर मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि आधुनिक जगात वावरणाऱ्या युवकांनी त्यांना पाठिंबा दिला. कलाकार, लेखक, पत्रकार, कलावंत, गायक आदींनी पदयात्रेत चार पावले राहुल गांधी यांच्याबरोबर चालून पाठबळ दिले. ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाली तेव्हापासून ‘ही यात्रा म्हणजे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी आहे, काँग्रेसच्या या प्रयत्नांना इतर राजकीय पक्ष पाठबळ देणार का, भाजपविरोधी सर्व पक्षांची आघाडी होणार का’, अशी चर्चा सुरू होती. त्याला यात्रेचे प्रमुख प्रवक्ते जयराम रमेश नेहमीच उत्तर देत होते की, ही निवडणुकीची तयारी नाही. आघाडी करण्याचा प्रयत्न नाही. असे सांगताना भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला वगळून ते शक्य नाही, असेदेखील ते म्हणत होते. राजकीय पक्षांची कृतीही राजकारणविरहित असणे शक्य नाही. तशी समजूत करून घेणे भाबडेपणाचे होईल. मात्र, या राजकीय लढाईची तयारीच राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष करीत होता, हे निश्चित आहे.
भारतातील सामाजिक वातावरण फारसे समाधानकारक नाही, हे कोणीही मान्य करेल. प्रत्येक वादविवादाला जातीय किंवा धार्मिक रंग कसा देता येईल, हे पाहिले जाते. हे परस्पर अविश्वासाचे आणि तणावाचे वातावरण संपवून सौहार्दाची वाट चोखाळावी, असा या यात्रेतील प्रचार होता. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्या विचाराची बैठक नेमकी समजायला मदत झाली. भाजपच्या आयटी सेलने राहुल गांधी यांना भारतीय राजकारण समजत नाही, त्यांना विकासाचे मुद्दे कळत नाहीत, ते अल्पसंख्याकांच्या व्होट बँकेचे राजकारण करतात, असा खोटा प्रचार अनेक वर्षे चालविला होता. त्यांच्या यात्रेत जे अभ्यासू विचारवंत त्यांना भेटले त्यांनी झालेल्या चर्चेची माहिती दिली, तेव्हा राहुल गांधी हे समाजातील विविध प्रश्न किती समजावून घेतात, याची प्रचिती आली. ते एक गंभीर राजकारणी आहेत. त्यांची प्रतिमा बनविली गेली आहे तशी नाही, हेदेखील सांगण्यास ते विसरले नाहीत. काँग्रेस व पूर्वाश्रमीचा जनसंघ किंवा आताचा भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष वैचारिक आहे. तो कधी कधी हिंसेवर उतरवून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होतो. त्या साऱ्याला भारत जोडो यात्रेने छेद दिला जाईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. यात्रेला मिळालेला प्रतिसाद निश्चितच अपेक्षा वाढविणारा आहे.