‘येस वी कॅन’, असा विश्वास देत, सामंजस्य, सहिष्णुता आणि समतेची वाट बराक ओबामांनी अमेरिकेला दाखवली. त्याच अमेरिकेत ओबामांनंतर डोनाल्ड ट्रम्प येणे हे घड्याळाचे काटे उलट्या दिशेने फिरवण्यासारखे होते. मात्र, अमेरिकेने ही चूक सुधारली आणि पुढच्या निवडणुकीत ट्रम्प पराभूत झाले. पराभवानंतर ट्रम्प यांनी ज्या प्रकारचा हिंसाचार घडवला, त्यानंतर तर ट्रम्प आता कधीच अध्यक्ष होऊ शकणार नाहीत, असे खात्रीने सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पराभूत करून ट्रम्प विजयी झाले आहेत. थापा मारण्यात वाकबगार असलेल्या, विखाराची मातृभाषा अमेरिकेला शिकवणाऱ्या ट्रम्प यांचे पुन्हा ‘व्हाइट हाऊस’मध्ये येणे जगाला काळजीत पाडणारे आहे. रशियात पुतिन, चीनमध्ये जिनपिंग, उत्तर कोरियात किम जोंग, इस्रायलमध्ये बेंजामिन नेत्यानाहू, अशा या यादीत आता डोनाल्ड ट्रम्प दाखल झाले आहेत! ट्रम्प यांची जनमानसातील प्रतिमा, त्यांचे खासगी आणि सार्वजनिक जीवनातील वर्तन वादग्रस्त असले, तरी अमेरिकी मतदारांनी त्यांना पुन्हा संधी देणे याचा अर्थ काय काढायचा? स्थलांतरितांना विरोध करताना, कमला हॅरिस यांचे ‘बाहेरचे’ असणे, तर अधोरेखित केले गेलेच, पण महिला अध्यक्षासाठी अमेरिका अद्यापही तयार नसल्याचेही त्यामुळे पुन्हा स्पष्ट झाले!
‘भूमिपुत्र’ हा मुद्दा अमेरिकेच्या निवडणुकीत चालावा, यांसारखा दैवदुर्विलास नाही. स्थलांतरितांनी ज्या अमेरिकेला घडवले, त्याच अमेरिकेचे हे असे होणे क्लेशकारक आहे. कोरोनापश्चात काळात सावरणारी जागतिक व्यवस्था, तिला धक्के देणारे अडीच वर्षांपासून चाललेले रशिया-युक्रेन युद्ध, तेलसमृद्ध पश्चिम आशियात वर्षभर सुरू असलेले आणि चिघळत जाणारे हमास-इस्रायल युद्ध अशा अनेक घटनांची पार्श्वभूमी यंदाच्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीला होती. अमेरिका जगातील प्रमुख महासत्ता असली, तरी जगात निर्माण झालेल्या अनिश्चिततेचे सावट तेथील नागरिकांवर आहे. भाववाढ, नोकरी-व्यवसायात भरून राहिलेली अशाश्वत अवस्था, जगभरातून वाढत्या संख्येने येणारे स्थलांतरित, त्यामुळे स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम, जगात दूरवर चाललेल्या संघर्षांमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप आणि त्याने सरकारी तिजोरीवर येणारा ताण असे अनेक मुद्दे अमेरिकी मतदारांसाठी महत्त्वाचे होते. त्यावर ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका मतदारांना आश्वासक वाटली, असेच आता म्हणायला हवे.
ट्रम्प यांच्या यापूर्वीच्या अध्यक्षीय कार्यकाळात त्यांनी अमेरिकेच्या हिताला अधिक प्राधान्य दिल्याने जागतिक स्तरावर नाराजी होती. मुक्त व्यापारविषयक काही जागतिक करार, इराणबरोबर झालेला बहुराष्ट्रीय अणुकरार यातून ट्रम्प यांनी माघार घेतली होती. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) या लष्करी संघटनेतून बाहेर पडण्याचा विचार, अनेक मुस्लीम देशांतून येणाऱ्या नागरिकांवर बंदी, अशा निर्णयांचे फारसे स्वागत झाले नव्हते. पण ट्रम्प यांना देशांतर्गत पाठिंबा वाढत होता. स्थलांतरितांबाबतच्या कठोर भूमिकेच्या आधारावर आपण पुन्हा निवडून येऊ शकू, असा त्यांचा अंदाज पुढील निवडणुकीत फोल ठरला. जो बायडेन यांचा विजय झाला. पराभवानंतर ट्रम्प यांनी जो थयथयाट केला आणि त्यांच्या समर्थकांनी जो धिंगाणा घातला, ते जगाला आणि अमेरिकेलाही रुचले नव्हते. त्यामुळे ट्रम्प यांना यंदा पुन्हा उमेदवारी मिळाल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्यावर जो हल्ला झाला, त्यातून त्यांची खंबीर नेत्याची प्रतिमा अधिक ठामपणे ठसवली गेली. गर्भपातासारख्या मुद्द्यावर कमला हॅरिस यांची भूमिका अमेरिकी महिला मतदारांना आश्वासक वाटत होती. पण, त्या विजयी होऊ शकल्या नाहीत.
ट्रम्प यांच्या निवडीने अमेरिकेसह भारतीय शेअर बाजारात उसळी दिसली. याचा अर्थ बाजाराने आता निवडणूक काळातील अनिश्चितता संपून ठाम नेतृत्व मिळण्याचे स्वागत केले आहे. केवळ एक अध्यक्ष बदलण्याने भारताविषयी अमेरिकेची एकंदर भूमिका बदलण्याची शक्यता नाही. दोन्ही देशांची आर्थिक, व्यापार, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत मोठी भागीदारी आहे. अमेरिकेत तब्बल २.९ दशलक्ष म्हणजे सहा टक्के भारतीय वंशाचे नागरिक आहेत. दरवर्षी सुमारे अडीच लाख भारतीय विद्यार्थी तेथे शिक्षणासाठी जातात. एच १बी व्हिसाबाबतचे धोरण महत्त्वाचे ठरणार आहे. आता ट्रम्प हेच अमेरिकेचे अध्यक्ष असतील, हे वास्तवही स्वीकारावे लागणार आहे! जागतिकीकरणानंतरच्या जगातला हा नवा संकुचित ‘देशीवाद’ मानवी समुदायाला कोणत्या वळणावर घेऊन जाणार आहे, हे सांगणे मात्र कठीण आहे !