ज्या प्रकारच्या विचारांतून समस्या उत्पन्न होतात, त्याच प्रकारे विचार केल्याने त्यांचे निराकरण होऊ शकत नाही! थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचे हे विधान आंतरराष्ट्रीय संबंधांनाही चपखल लागू पडते. अलीकडेच मध्यपूर्व आशियातील तणावाच्या निमित्ताने उभ्या जगाने त्याचा अनुभव घेतला आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर हे मात्र आइनस्टाइन यांच्या त्या विधानाशी सहमत नसावेत, असे त्यांच्या पाकिस्तानसंदर्भातील ताज्या विधानावरून वाटते. पाकिस्तानसोबत अखंड वाटाघाटींचे युग संपुष्टात आले आहे, असे वक्तव्य जयशंकर यांनी नुकतेच केले. शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच एससीओची शिखर परिषद यावर्षी पाकिस्तानात होणार आहे. त्या परिषदेचे निमंत्रण पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना धाडले आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्या अनुषंगाने भाष्य करताना जयशंकर यांनी जे वक्तव्य केले, त्यामध्ये वस्तुतः नवीन असे काहीच नाही. भारतात मोदी युगाचा प्रारंभ झाल्यापासून पाकिस्तानसोबतचे संबंध गोठलेलेच आहेत. असे असताना वाटाघाटींचे युग संपुष्टात आले असल्याचे जाहीर वक्तव्य कशासाठी, हे जयशंकर यांनाच ठाऊक! त्यामुळे पाकिस्तानला मात्र भारताकडे बोट दाखवण्याची आयती संधी उपलब्ध झाली आहे.
मुत्सद्देगिरी ही एक अशी कला आहे, ज्यामध्ये ‘होय’ हा शब्द अशाप्रकारे उच्चारायचा असतो की, ऐकणाऱ्याला तो ‘कदाचित’ असा ऐकू यावा, असे विन्स्टन चर्चिल एकदा म्हणाले होते. गत काही वर्षांत जयशंकर यांनी मुत्सद्दी म्हणून छाप निर्माण केली आहे. सोबतच स्पष्टवक्ता अशीही त्यांची प्रतिमा आहे. पाकिस्तानसंदर्भात वक्तव्य करताना मात्र त्यांच्यातील स्पष्टवक्त्याने मुत्सद्यावर मात केल्याचे स्पष्टपणे दृग्गोचर झाले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांतील तणाव ही काही नवी बाब नाही. जन्मापासूनच त्या देशाने भारतासोबत उभा दावा मांडला आहे. त्यामुळेच उभय देशांदरम्यान तीन युद्धे झाली. युद्धात निभाव लागत नाही, हे बघून पाकिस्तानने चक्क दहशतवाद प्रायोजित करण्यास प्रारंभ केला. आज तो भस्मासुर त्या देशावरच उलटला आहे. पाकचा हा भेसूर चेहरा समोर आल्याने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चात्य जगच नव्हे, तर अनेक इस्लामी देशांनीही त्या देशाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या हाती भिकेचा कटोरा आला आहे. मोदी सरकारचे परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून जयशंकर यांचाही त्यामध्ये वाटा आहेच; पण अति स्पष्टवक्तेपणा नेहमीच कामाचा नसतो, याचे भान त्यांनी बाळगायला हवे होते. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करणे, हा जयशंकर यांचा त्या वक्तव्यामागील हेतू असू शकतो; पण त्यामुळे आम्ही संबंध सामान्य करायला उत्सुक असताना, भारतच अकारण आडमुठेपणा करत असल्याचा आरोप करण्याची आयती संधी पाकिस्तानला उपलब्ध झाली आहे.
गत काही काळात भारत आणि चिमुकल्या भूतानचा अपवाद वगळता संपूर्ण दक्षिण आशिया क्षेत्र अस्थिर बनले आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका, मालदिव पाठोपाठ नुकताच बांगलादेशही त्याच वाटेने निघाला आहे. भारतातील जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातही दहशतवाद नव्याने डोके वर काढू लागला आहे. त्यामागे पाकचा हात आहे, हे उघड आहे. जयशंकर यांच्या वक्तव्यामुळे चिडून तो देश आगीत नव्याने तेल ओतायला कमी करणार नाही आणि त्यामुळे अस्थिरता वाढीस लागू शकते. तिकडे चीन परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी टपून बसलेलाच आहे. या परिस्थितीचे विपरीत सामाजिक परिणामही संभवू शकतात. भारत आणि पाकिस्तानदरम्यान संवाद बंद असल्याने उभय देशांदरम्यानचा व्यापार तर रसातळाला गेला आहेच; पण जनतेदरम्यानचा संपर्कही मोठ्या प्रमाणात तुटला आहे. सात दशकांपूर्वी दोन्ही देश एकत्रच होते आणि आजही हजारो कुटुंबांचे सीमापार नातेवाईक, मित्र आहेत, ही वस्तुस्थिती नजरेआड करता येणार नाही. जेव्हा एक देश यापुढे वाटाघाटी नाहीतच, असे ठणकावून सांगतो, तेव्हा जनतेतही अस्वस्थता वाढणारच! शिवाय या भूमिकेमुळे जागतिक पटलावरही भारताची कुचंबणा होऊ शकते. अनेक प्रमुख देश भारत आणि पाकिस्तानदरम्यान संवाद सुरू व्हावा, वाढावा, या मताचे आहेत. जयशंकर यांच्या विधानामुळे त्यांची नाराजी ओढवू शकते. भारतच शांततेच्या मार्गात बाधा उत्पन्न करत आहे, असा त्यांचा ग्रह होऊ शकतो. त्याचे परिणाम इतरत्र समोर येऊ शकतात. त्यामुळे जयशंकर यांचा करारीपणा भारताच्या वाढत्या शक्तीचे प्रतीक म्हणून स्वागतार्ह असला, तरी त्याचे प्रदर्शन कोठे करावे, याचे भान राखलेलेच बरे!