यमुनेच्या खोऱ्यात हस्तीनापूर व आवतीभोवती घडलेल्या महाभारताचा छोटा नागपूर पठाराशी काही संबंध होता का हे माहिती नाही. कदाचित अठरा दिवसांच्या महाभारत युद्धात कौरव किंवा पांडवांच्या बाजूने झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल अथवा छत्तीसगडचा काही भाग असलेल्या त्या पठारावरचा एखादा राजा लढलाही असेल. आता हे आठवायचे कारण लोकसभा निवडणूक तोंडावर असताना झारखंडमध्ये जे घडते आहे ते सारे आधुनिक महाभारताचा अनुभव देणारे आहे. सत्तास्पर्धा, त्यासाठी यंत्रणांचा वापर, सत्ताधाऱ्यांना सत्ताच्यूत करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब, रांची ते दिल्लीदरम्यान सुरू असलेले भले-बुरे राजकारण, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध लष्कराच्या साडेचार एकर जमिनीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीकडून गुन्हा, चौकशी टाळताना त्यांचे दिल्लीतून गायब होणे आणि कथितरीत्या रस्ते मार्गाने लपूनछपून तेराशे किलोमीटर अंतरावरील रांची गाठणे, तिथे पुन्हा चौकशी व अटक, दरम्यान सत्ता टिकविण्याची धडपड आणि सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न, असे आधुनिक महाभारत रंगले आहे.
मूळ महाभारतात सुईच्या टोकावर मावेल इतकीही जमीन देणार नाही, असा कौरवांचा हट्ट होता, तर झारखंडच्या या भानगडीच्या मुळाशी लष्कराची नऊ बिघे जमीन आहे. ती हडपणाऱ्या भूमाफियांना हेमंत सोरेन यांचे संरक्षण असल्याचा, त्या माध्यमातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. अटक होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे पदावर असताना अटकेची नामुष्की टळली इतकेच. त्यानंतर चंपई सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यांना सरकार बनविण्यासाठी पाचारण करण्यासाठी राज्यपाल राधाकृष्णन यांनी चोवीस तासांहून अधिक वेळ घेतला. बिहारमध्ये बारा तासात नितीशकुमार यांचा राजीनामा, राजकीय कोलांटउडी व पुन्हा शपथविधी अशा वाऱ्याच्या वेगाने हालचाली व विरोधकांची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये मात्र राज्यपालच गायब, असे चित्र दिसले. सगळीकडून टीका होऊ लागली. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल या महाआघाडीच्या आमदारांनी व्हिडीओवर आमदारांची शिरगणती करून घेतली. सत्ताधारी आघाडी फुटत नाही, असे स्पष्ट झाले तेव्हा राज्यपालांनी स्थापनेला जेमतेम चोवीस वर्षे होत असलेल्या झारखंडचे बारावे मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांना शपथ दिली.
या साऱ्या घडामोडींमध्ये खास मूळ महाभारताचे कथानक शोभावे, अशा भाऊबंदकीचाही एक रंजक अंक आहे. निर्वाणीच्या क्षणी सत्ता आपल्या कुटुंबाबाहेर जाऊ नये, असाच सगळ्या राजकारण्यांचा प्रयत्न असतो. तसाच विचार हेमंत सोरेन यांनीही केला असावा. म्हणूनच त्यांच्या पत्नी कल्पना यांचे नाव संभाव्य मुख्यमंत्री म्हणून समोर आले होते. काही महत्त्वाच्या प्रशासकीय तसेच आमदारांच्या बैठकांना त्या उपस्थित राहिल्या होत्या. पर्यायाने कधीकाळी बिहारचाच भाग असलेल्या या राज्यात राबडीदेवी प्रयोग होणार अशी चर्चा सुरू झाली. लालूप्रसाद यादव यांना अशाच न्यायालयीन लढ्यात मुख्यमंत्रिपद सोडावे लागले तेव्हा त्यांनी राबडीदेवींना त्या पदावर बसवले होते. अर्थात, निरक्षर राबडीदेवी व उच्च शिक्षित कल्पना सोरेन यांची तुलना होऊ शकत नव्हती. तथापि, मुद्दा होता विधानसभेच्या सदस्य नसलेल्या पत्नीला मुख्यमंत्री बनविण्याचा.
शिबू सोरेन आता सक्रिय राजकारणातून बाजूला झाले असले तरी त्यांची हेमंत व वसंत ही दोन मुले आणि दिवंगत दुर्गा सोरेन यांच्या पत्नी सीता मुर्मू - सोरेन ही थोरली सून असे तीन आमदार आहेत. कल्पना सोरेन यांचे नाव व पुढे येताच वि पुढ वसंत व सीता सोरेन यांनाही मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडू लागली. आपण घरातील थोरली जाऊ असल्यामुळे मुख्यमंत्रिपदावर पहिला हक्क धाकट्या जावेचा नव्हे, तर आपलाच, असे सीता सोरेन यांचे म्हणणे होते. यामुळे कौटुंबिक कलहाची स्थिती निर्माण झाली. परिणामी, तो कलह टाळला जावा तसेच भाजपकडून घराणेशाहीच्या मुद्द्यावर अधिक हल्ले होऊ नयेत म्हणून हेमंत सोरेन यांना पत्नीला मुख्यमंत्री बनविण्याचा विचार सोडून द्यावा लागला. मंत्रिमंडळात परिवहन तसेच आदिवासी कल्याण खाते सांभाळणारे चंपई सोरेन यांना विधिमंडळ पक्षनेते बनविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अटक टाळता आली नसली तरी हेमंत सोरेन यांनी तूर्त सरकार टिकविले आहे. बिरसा मुंडांच्या भूमीत ईडीच्या रूपाने दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध संघर्षाचा 'उलगुलान' त्यांनी पुकारला आहे. आदिवासी अस्मितेला हाक देण्यात आली आहे. लढाईला तोंड फुटले आहे.