आजचा अग्रलेख: कोल्हापुरी धक्का !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 11:49 AM2024-11-06T11:49:57+5:302024-11-06T11:50:55+5:30

Maharashtra Assembly Election 2024: कोल्हापूर शहर (उत्तर) मतदारसंघातून उमेदवार निवडताना काँग्रेसच्या नेत्यांनाच नामोहरम करणाऱ्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आणि पक्षाची उमेदवारी वाया घालवली.

Today's Editorial: Maharashtra Assembly Election 2024, Kolhapuri shock! | आजचा अग्रलेख: कोल्हापुरी धक्का !

आजचा अग्रलेख: कोल्हापुरी धक्का !

संपूर्ण महाराष्ट्राला कोल्हापूरबद्दल नेहमीच औत्सुक्य वाटत असते. कोल्हापुरी जीवन पद्धतीपासून या शहराची भाषा, कला, खानपान सारेच उत्सुकतेचे विषय. अर्थात, या रांगड्या प्रांतातले राजकारण तरी कसे अपवाद असेल? ईर्ष्या तर कोल्हापुरी माणसाच्या स्वभावातच मुरलेली. हा कुस्तीचा परिणामही असावा. ईर्ष्या करून जिंकण्याच्या आनंदापेक्षा प्रतिस्पर्ध्याना हरविल्याचा आनंद या मातीसाठी फार मोठा! देशाचे किंवा राज्याचे राजकारण कोणतेही वळण घेऊ द्या, कोल्हापूरच्या मातीत ईर्ष्या निर्माण झाली की, प्रतिस्पर्ध्याची पाठ मातीला लावूनच रिकामे होणार! याचा दुष्परिणाम असा की, राजकीय नेत्यांना गल्ली गल्लीतील ईर्ष्या सांभाळून राजकीय नेतृत्व खुलविण्यास पुरेशी उसंतच मिळत नाही. स्थानिक राजकारणातच बहुतांश ऊर्जा खर्ची पडते. कोल्हापूर शहर (उत्तर) मतदारसंघातून उमेदवार निवडताना काँग्रेसच्या नेत्यांनाच नामोहरम करणाऱ्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आणि पक्षाची उमेदवारी वाया घालवली. गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली, तर राजकारणात येण्याची इच्छा शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली होती. राजीं छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांनी निवडणुकीत उतरायचे ठरवल्यावर काँग्रेस, तसेच त्याच्या मित्र पक्षांनी शाहू छत्रपती यांना पायघड्याच घातल्या. अपेक्षेप्रमाणे चांगल्या मताधिक्याने ते विजयी झाले. विधानसभेला कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून याच घराण्यातील स्नुषा मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. सासरच्या राजघराण्याचे वलय असले, तरी मधुरिमाराजे या माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या, खानविलकर यांनी सलग तीस वर्षे करवीर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. सर्वसामान्य माणसात मिळून मिसळून राजकारण करण्याचे बाळकडू त्यांना वडिलांकडूनच मिळालेले. विविध कार्यक्रमांत धडाडीने भाग घेणाऱ्या, अशी त्यांची प्रतिमा आहे. मात्र, एकाच घरात खासदारपद आणि आमदारपद नको, या विचाराने त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. शाहू छत्रपती यांचे ज्येष्ठ चिरंजीव संभाजीराजे वेगळ्याच विचाराने राजकारण करतात. त्यांनी अलीकडेच स्वतंत्र पक्षाची स्थापना करून तिसरी आघाडी उभी केली आहे. कनिष्ठ चिरंजीव मालोजीराजे मात्र काँग्रेसचे काम पाहतात. एकदा आमदारही होते. अशा पार्श्वभूमीवर मधुरिमाराजे यांनी नकार देताच माजी नगरसेवक राजू लाटकर यांचे नाव प्रदेश काँग्रेसने सुचविले. त्यांना उमेदवारी जाहीरही झाली; पण महापालिकेच्या राजकारणातील हेव्यादाव्यातून इतर इच्छुक उमेदवारांनी राजू लाटकर यांना विरोध सुरू केला. राजकारणात संधी यावी लागते, तशी काहीवेळा जबाबदारीदेखील स्वीकारावी लागते. लाटकरांना होणारा विरोध लक्षात घेऊन राजघराण्याने अंतिम क्षणी निर्णय बदलून मधुरिमाराजे यांना उभे करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची अडचण झाली. त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगून केवळ पाच तासांत लाटकर यांचे नाव रद्द करून मधुरिमाराजे यांना उमेदवारी आणली. राजू लाटकर यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतल्याने शाहू छत्रपती यांना पराभवाची भीती वाटू लागली. काँग्रेस एकसंध नसेल, तर निवडणूक न लढविलेली बरी, अशी भूमिका घेत मधुरिमाराजे यांनी अखेरच्या क्षणी आपली उमेदवारीच मागे घेतली. महाआघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला मिळाली होती. आता आघाडीचा उमेदवारच रिंगणात नाही, अशी नामुष्की आली आहे. महायुतीकडून ही जागा शिंदेसेनेला मिळाली आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. बंडखोरी कायम राहावी, यासाठी महायुतीकडूनही प्रयत्न झाले नसतील असे वाटत नाही, कारण राजू लाटकर यांची विविध पक्षांत वावरण्याची जुनी सवय आहे. महाआघाडीला हा कोल्हापूरी दे धक्का मतदारांनी नव्हे, तर कार्यकर्त्यांनीच दिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही आमदार निवडून आणला आला नव्हता. गेली पंचवीस वर्षे काँग्रेसचे खासदार निवडून आले नव्हते. हे सारे चित्र सतेज पाटील यांनी बदलून दाखविले होते. चार आमदार आणि दोन विधान परिषदेचे आमदार असताना खासदारकीही मिळविली. चालू निवडणुकीत जिल्ह्यातील दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटले आहेत. त्यातील एकावर न लढताच पाणी सोडावे लागले, ही पक्षासाठी नामुष्कीच होय । मधुरिमाराजे यांच्या नकार-होकाराच्या नाट्यात राजू लाटकर यांच्यावर अधिकच विश्वास ठेवण्याचाही फटका बसलाच, लढण्याआधीच घडलेले हे माघारीचे 'कोल्हापुरी नाट्य' सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरले, तेही या शहराच्या लौकिकाला साजेसेच!

Web Title: Today's Editorial: Maharashtra Assembly Election 2024, Kolhapuri shock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.