‘आई, मला माफ कर. मी जेईई देऊ शकत नाही’, असे सांगत अठरा वर्षांची कोवळी मुलगी ज्या देशात आत्महत्या करते, त्या देशाचे भवितव्य काय असेल? अशा कोणत्या शर्यतीत मुलांना सक्तीने धावायला भाग पाडले जाते की, ज्यामुळे जगण्यातला आनंदच ही मुले हरवून बसतात! जी शिक्षण व्यवस्था देशाचे भविष्य घडवते, आज त्या व्यवस्थेचा आणि देशाच्या भविष्याचा परस्परसंबंध खरेच उरला आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या त्यांच्या दर वर्षाच्या खास कार्यक्रमात मुलांना यशस्वी होण्याचे धडे दिले. यामध्ये मोबाइलचा स्क्रीनटाइम, आरोग्यदायी आहार, व्यायाम, आवश्यक पुरेशी झोप अशा सर्व मुद्द्यांचा समावेश होता.
आपल्या मुलांची तुलना इतर कोणत्याही मुलाशी करू नका, त्यांच्यावर तुमच्या स्वप्नांचे ओझे लादू नका, मुलांचे ‘रिपोर्ट कार्ड’ हे तुमचे ‘व्हिजिटिंग कार्ड’ समजू नका, असा सल्लाही त्यांनी पालकांना दिला. त्याच वेळी, राजस्थानमधल्या कोचिंगसाठी विख्यात असलेल्या कोटा जिल्ह्यात ‘जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन’ अर्थात ‘जेईई’ उत्तीर्ण होऊ शकत नसल्याने १८ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली. देशातील मुले कुठल्या तणावाच्या वातावरणातून जात आहेत, याचा अंदाज त्यातून यावा. मुलांचे ‘मेरिट’ ओळखण्यासाठी असणारी गुणांची पद्धत आजही बऱ्याच अंशी कायम असल्यामुळे तणावाची ही स्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना ग्रेड देण्याची पद्धत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर राबविली जात आहे. मात्र, उच्च शिक्षणासाठी उत्तम गुणांशिवाय चांगल्या महाविद्यालयांत प्रवेश मिळत नसल्यामुळे येणारा ताण काही मुले सहन करू शकत नाहीत. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम स्तुत्य आहे. मात्र, याच वेळी मुलांवर करिअर कसे लादले जाते, याविषयी बोलायला हवे. सरकारी शाळांच्या दुरवस्थेचीही चर्चा व्हायला हवी.
शिक्षण, आरोग्याचा खर्च सरकारने उचलावा, ही रास्त अपेक्षा आहे. शिक्षण परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी गुणवत्ता असूनही करिअरसाठी विविध पर्याय निवडत राहतात. शिक्षण-रोजगार यांचाही संबंध राहिला नसल्याची भीषण स्थिती अनेक क्षेत्रांत आहे. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आता होत आहे. विद्यार्थ्यांना अनेक पर्याय देण्याचा हा प्रयत्न चांगला असला, तरी भविष्यातील रोजगाराची हमी देणारे शिक्षण जवळपास नसल्याची स्थिती आहे. कॉलेज-विद्यापीठांत होणारे कॅम्पस इंटरव्ह्यू विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहेत. पण असे कॅम्पस इंटरव्ह्यू प्रत्येक कॉलेजमध्ये आणि सर्व प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी होत नाहीत. बेभरवशाचा रोजगार आणि शिक्षणासह सर्वच ठिकाणी झालेले जगणे महाग या कात्रीत आजचे पालक-विद्यार्थी सापडले आहेत. रोजगारासाठी आवश्यक ती क्षेत्रे शोधून त्यांचा शिक्षणाशी संबंध जोडणे आज काळाची गरज आहे. एका गुंठ्याच्या जागेत शेतीमधील प्रयोग करणे, पशुपालन, आपत्कालीन सेवा पुरवणे, घरातील प्लंबिंग, इलेक्ट्रिकसंबंधी साध्या-साध्या गोष्टी येणे, योगा यांसह लक्षावधी छोटे-मोठे व्यवसाय आज असंघटित स्तरावर आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणून शिक्षणाशी त्यांचा संबंध जोडला, तर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.
नव्या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून तसे प्रयत्न करण्याचा मानस दिसत आहे. पण, कुठलेही शिक्षण धोरण यशस्वी तेव्हाच ठरेल, जेव्हा कुठल्याही विद्यार्थ्याला, त्याची जात-धर्म-आर्थिक स्थिती काहीही असली, तरी हवे ते शिक्षण घेता येईल. आज अशी स्थिती नाही. त्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात करावी लागेल. प्रात्यक्षिकांवर आधारित आणि मुलांची खरी गुणवत्ता ओळखून त्याला विविध क्षमतांनी परिपूर्ण करण्याचे शिक्षणाचे उद्दिष्ट हवे. या क्षमतांच्या आधारे विद्यार्थी त्याचे आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल घडवेल. आमीर खानने अभिनय केलेल्या ‘थ्री-इडियट’ चित्रपटातून विद्यार्थी-पालकांना करिअरसंबंधी दिलेला संदेश आजही त्यामुळे महत्त्वाचा. मुलांना ज्या क्षेत्रात गती आहे, त्या क्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले गेले, तर मुले आनंदाने पुढे जातील. ‘गुणांच्या कारखान्या’तून गुणवत्ता जोखली जाऊ शकत नाही. ती अनुभव आणि प्रत्यक्ष मैदानातील लढाईनेच समजते. अशी लढाईतील मैदाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यापासून ते आताच्या नागराज मंजुळेंपर्यंत अनेकानेक दिग्गजांनी गाजवली आहेत. त्यांचे परीक्षेतील गुण कुणीही विचारत नाही. लढाईच्या या मैदानात परीक्षा रोजचीच असते. ती वार्षिक किंवा सहामाही नसते. या ‘परीक्षे’चा खरा अर्थ आपल्याला कधी समजेल?