जानेवारी महिन्याचा शेवट जवळ आला की वेध लागतात, ते देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांचे आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार जाहीर झाले, की सुरू होते त्यांचे कवित्व! चौदाव्या शतकात इंग्लंडमध्ये होऊन गेलेला कवी जॉन लिडगेट यांचे एक वचन सुप्रसिद्ध आहे. तुम्ही काही लोकांना सर्वकाळ समाधानी ठेवू शकता किंवा सर्व लोकांना काही काळ समाधानी ठेवू शकता; परंतु तुम्ही सर्व लोकांना सर्वकाळ समाधानी ठेवू शकत नाही! ते वचन पद्म पुरस्कारांनाही लागू पडते. दरवर्षी पुरस्कार जाहीर झाले, की यादीतील काही नावांमुळे काहीजण खूश होतात, तर काहीजण नाराज होतात. जे काही नावांवरून खूश होतात, ते इतर काही नावांबाबत मात्र नाराजी व्यक्त करतात. क्वचितप्रसंगी एखादा पुरस्कार्थी किंवा त्याच्या निकटची एखादी व्यक्तीही नाराजी बोलून दाखविते. यावर्षीही तो परिपाठ कायम राहिला आहे.
मरणोपरांत पद्मश्री पुरस्कार घोषित झालेल्या आचार्य किशोर कुणाल यांच्या अर्धांगिनी अनिता कुणाल यांनी, त्यांना पद्मश्रीपेक्षा बडा पुरस्कार मिळायला हवा होता, अशी खंत व्यक्त केली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनीही, सार्वकालिक श्रेष्ठ पार्श्वगायकांमध्ये गणना होणारे किशोर कुमार, तसेच सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना अद्याप पद्म पुरस्कार न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याशिवाय काही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या पुरस्कार्थीवरूनही कुजबुज सुरू झाली आहे. त्यांना घोषित झालेल्या पुरस्कारांएवढे मोठे त्यांचे कर्तृत्व होते, की केवळ भविष्यकालीन राजकारणावर नजर ठेवून त्यांना पुरस्कार घोषित झाले, अशी चर्चा होत आहे. काही पुरस्कार्थींच्या वादग्रस्त भूतकाळामुळे त्यांना पुरस्कार देणे योग्य आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. अशी चर्चा प्रथमच होत आहे, असे अजिबात नाही; पण पूर्वी समाज माध्यमांचा उदय झालेला नसल्याने चर्चा एखाद्या कोंडाळ्यापुरतीच मर्यादित असे. हल्ली मात्र अशी चर्चा अल्पावधीतच राष्ट्रीय पातळीवरही पोहोचते.
राजकीय लाभासाठी पुरस्कार देण्याचे आरोप पूर्वीपासून होत आले आहेत. राजकीय मंडळीच्या कोणत्याही कृतीमागे राजकीय लाभतोट्याचा विचार असतोच! त्यामुळे विद्यमान राज्यकर्त्यांनी तसा तो केला असल्यास, केवळ त्यांनाच दोष देता येणार नाही. एक बाब मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांशी टोकाचे मतभेद असलेल्या मंडळीलाही मान्य करावी लागेल. पद्म पुरस्कार तळागाळापर्यंत नेण्याचे श्रेय त्यांनाच जाते. पूर्वी पद्म पुरस्कारांवर, उपहासाने ल्युटेन्स दिल्ली किंवा खान मार्केट म्हणून उल्लेख होणाऱ्या कोंडाळ्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत असे; पण गत काही वर्षांपासून, कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तळमळीने एखाद्या विषयाला वाहून घेतलेल्या, प्रसिद्धीच्या झोतापासून कोसो दूर असलेल्या, तळागाळातील लोकांसाठी जीवन वेचणाऱ्या व्यक्तींनाही पद्म पुरस्कार मिळू लागले आहेत. मंजम्मा जोगती, राहीबाई पोपेरे, हनुमानथप्पा, हसिना बानो, हिरेमथ यल्लपा, सिंधुताई सपकाळ, तुलसी गौडा, छुटनी देवी, शंकरबाबा पापळकर, उदय देशपांडे अशी काही नावे त्यासंदर्भात वानगीदाखल घेता येतील. यावर्षीही ही परंपरा कायम राखण्यात आली असून, आदिवासी क्षेत्रात जल व्यवस्थापन क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी बजावणारे चैतराम पवार, गोरगरीब रुग्णांवर उपचारांसाठी जीवन समर्पित केलेले डॉ. विलास डांगरे, वयाची शंभरी गाठलेल्या स्वातंत्र्य सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, कठपुतळी कलेच्या जादूगार ९६ वर्षीय भीमव्वा, ३०० वर्षे जुन्या माहेश्वरी हातमाग कलेला पुनरुज्जीवित करणाऱ्या सॅली होळकर, गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील उपचारांसाठी काम करणाऱ्या डॉ. नीरजा भटला, अशा नररत्नांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पद्म पुरस्कार्थींच्या निवडीत झालेला हा बदल स्तुत्य असून, राजकीय अथवा वैचारिक मतभेद बाजूला सारून त्याचे स्वागतच करायला हवे, अन्यथा तो कोतेपणा ठरेल.
दुसरीकडे राज्यकर्त्यांनीही केवळ राजकीय लाभ नजरेसमोर ठेवून पुरस्कार घोषित करू नयेत. त्यामुळे पुरस्कारांचे अवमूल्यन आणि त्या पुरस्कारांसाठी सर्वार्थाने पात्र असलेल्या पुरस्कारार्थीवर अन्याय होईल. इतर अनेक बाबतीत खूप अवमूल्यन झाले आहेच; किमान सर्वोच्च नागरी पुरस्कारांना तरी त्यापासून वेगळे ठेवायला हवे!