बुडत्याचा पाय खोलात, ही मराठी भाषेतील म्हण पाकिस्तानात कुणाला ठाऊक असण्याचे कारण नाही; पण त्या देशात सध्या जे काही सुरू आहे, त्यासाठी ही म्हण अगदी चपखल आहे. ज्याला रसातळालाच जायचे आहे, त्याला कुणीही वाचवू शकत नाही, तो अधिकाधिक खोलातच जाणार, हा त्या म्हणीचा अर्थ! पाकिस्तानचे सध्या नेमके तेच होत आहे. पाकिस्तानचे माजी गृहमंत्री, अवामी मुस्लीम लीग पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटचे सहकारी शेख रशीद अहमद यांना गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. तत्पूर्वी सोमवारी पेशावरमधील एका मशिदीत घडविण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात शंभरपेक्षा जास्त बळी गेले, ज्यामध्ये मोठ्या संख्येने पोलिसांचा समावेश होता. पाकिस्तानात बॉम्बस्फोट तसे नित्याचेच! त्याचप्रमाणे राजकीय नेत्याला अटक होणेही नवे नाही; परंतु शेख अहमद यांना अटक होण्याचे जे कारण सांगण्यात येत आहे, ते पाकिस्तानातील सद्य:स्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देते. पाकिस्तानातील सत्ताधारी युतीमधील पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या पक्षाचे सहअध्यक्ष आणि माजी राष्ट्राध्यक्ष आसीफ अली झरदारी हे इम्रान खान यांची हत्या करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप करून, शेख अहमद यांनी झरदारी व त्यांच्या कुटुंबासाठी 'कायमस्वरूपी धोका' निर्माण केला आहे, असा आरोप अहमद यांच्या विरोधात पोलिसांत दाखल प्राथमिक माहिती अहवालात करण्यात आला आहे.
एकीकडे पाकिस्तानवर हाती कटोरा घेऊन जागतिक वित्तसंस्था आणि विविध देशांच्या प्रमुखांसमोर कर्जासाठी तोंड वेंगाडण्याची नामुष्की आली असताना, दुसरीकडे पाकिस्तानात या दर्जाचे राजकारण सुरू आहे. पाकिस्तान आज जशा अभूतपूर्व आर्थिक संकटास तोंड देत आहे, तशाच संकटास श्रीलंकेनेदेखील अलीकडेच तोंड दिले होते; पण स्थिती जास्तच चिघळली तेव्हा त्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे पायउतार झाले आणि त्यांनी सर्वपक्षीय अंतरिम सरकारच्या गठनाचा मार्ग मोकळा केला. पुढे रानिल विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारचे गठन झाले आणि हळूहळू का होईना तो देश आता बऱ्यापैकी सावरला आहे. अर्थात त्यामध्ये भारत सरकारने केलेल्या मदतीचा मोठा वाटा आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेत जशी स्थिती होती, तशीच स्थिती आज पाकिस्तानात आहे. महागाई प्रचंड भडकली आहे आणि जादा दाम मोजण्याची तयारी असलेल्यांनाही जीवनावश्यक वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. गव्हाच्या पीठासाठी लागलेल्या रांगा, मारामाऱ्या, लहानग्यांची भूक भागवता येत नाही म्हणून हतबल झालेले पालक, हे पाकिस्तानातील चित्र समाजमाध्यमांमधून काही दिवसांपूर्वी जगासमोर आले. विदेशी चलन गंगाजळी रसातळाला गेल्याने, पंतप्रधान शाहबाज शरीफ कर्जासाठी जागतिक वित्तसंस्था, तसेच वेगवेगळ्या देशांचे उंबरठे झिजवीत आहेत; पण अजून तरी कुणीही मदतीसाठी पुढे आलेले नाही. पाकिस्तान ज्यांना घनिष्ठ मित्र संबोधतो, त्या सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या श्रीमंत देशांनीही यावेळी हात आखडता घेतला आहे. उलटपक्षी काश्मीर विसरा आणि भारताशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करा, अशा कानपिचक्याही दिल्या आहेत. अमेरिकेचा वरदहस्त संपुष्टात आल्यावर पाकिस्तान ज्या देशाच्या कच्छपी लागला, त्या चीननेही मदतीचा हात पुढे केलेला नाही. श्रीलंका आणि पाकिस्तानच्या हाती कटोरा देण्याचे श्रेय चीनचेच! उभय देशांना भारताच्या विरोधात भडकवून स्वतःची पोळी भाजून घेण्याची खेळी चीन खेळला आणि जेव्हा त्यांना मदतीची गरज भासली तेव्हा पाठ फिरवली ! नेपाळ, बांगलादेश, मालदीव यासारख्या भारताच्या इतर शेजाऱ्यांच्या बाबतीतही चीन तीच खेळी करीत आहे. श्रीलंका व पाकिस्तानचे उदाहरण समोर असल्याने आता त्यांचे डोळे उघडतात काय, हे बघावे लागेल;
पण पाकिस्तानचे शेपूट सरळ होण्याची शक्यता धूसरच दिसते. भारतविरोधाने अंध झालेल्या त्या देशाने १९७१ मध्ये बांगलादेशाच्या रूपाने मोठा भूभाग गमावला आणि आता सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा हे प्रांतही फुटून निघण्याची भीती निर्माण झाली आहे. भारताला रणांगणावर मात देता येत नाही म्हणून दहशतवाद्यांच्या माध्यमातून छद्म युद्ध लढण्याची रणनीती आता पाकिस्तानच्याच गळ्याचा फास बनली आहे. पाकच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी भस्मासुर सज्ज झाला आहे!