'अब की बार किसान सरकार' असा नारा देत महाराष्ट्र पादाक्रांत करण्यासाठी सरसावलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आषाढी वारीचा मुहूर्त साधला आणि खास दाक्षिणात्य फिल्मी शैलीत शेकडो गाड्यांचा भव्य ताफा घेऊन विठोबाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले. दर्शनाला आलो असल्याने राजकीय बोलणार नाही, हे केसीआर यांचे म्हणणे खरे नाही. महाराष्ट्रात सत्ता मिळविण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी लपवून ठेवलेली नाहीच. त्यामुळे विठ्ठल दर्शनामागील राजकारण सामान्य जनतेला समजतेच. त्यातही शेकडो गाड्यांचा ताफा, हैदराबादेतून निघण्यापासून सोलापूर मार्गे पंढरपूरला पोहोचेपर्यंत वाटेत जागोजागी इव्हेंट हे सारे राजकारण आहेच. तसेही राजकारणात सारे काही क्षम्य असल्यामुळे ते लपविण्याची गरजही नाही. शिवाय दर्शनाला जोडूनच मेळावा आणि माजी आमदारांच्या पुत्राचा पक्षप्रवेश यातून राजकारण घडलेच.
केसीआर हे नाव गेले काही महिने महाराष्ट्रात चर्चेत आहे. नांदेडातून महाराष्ट्रात एन्ट्री केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरची जाहीर सभा आणि नागपूर येथील कार्यालयाच्या उद्घाटनावेळच्या मेळाव्यानंतरचा केसीआर यांचा पंढरपूर हा तिसरा राजकीय मुक्काम. विदर्भ व मराठवाड्यातील काही शेतकरी नेते, माजी आमदार, केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती, अर्थात बीआरएस पक्षाकडे आकर्षित झाले आहेत. शेतकरी, दलित समाज, महिलांसाठी विविध आकर्षक योजनांचा तेलंगण पॅटर्न हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे. महाराष्ट्रातील आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी शेतकरी वाऱ्यावर सोडला आहे आणि आपणच आता त्यांचे तारणहार आहोत, असा केसीआर यांचा दावा आहे. त्यासाठी आंध्र प्रदेशातून बाहेर पडून स्वतंत्र राज्य बनल्यापासून तेलंगणाने पाटबंधारे, शेती, वीज क्षेत्रात केलेल्या कामगिरीची आकडेवारी दिली जाते. याच बळावर दिल्लीची सत्ता मिळविण्याच्या मोहिमेची सुरुवात केसीआर यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्रापासून केली आहे. या मोहिमेला किती यश मिळेल हे आताच सांगता येणार नाही.
देशाचे व महाराष्ट्राचे राजकारण स्थित्यंतराच्या प्रक्रियेतून जात आहे, युती व आघाडीची नव्याने मांडणी होत आहे. गलितगात्र झालेल्या काँग्रेसला कुठे कुठे यश मिळू लागले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान व नंतर झालेली हिमाचल प्रदेश व कर्नाटकची निवडणूक जिंकल्यामुळे काँग्रेसचा उत्साह दुणावला आहे. आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस या पक्षांना काँग्रेसबद्दल काही आक्षेप असले तरी देशभरातील विरोधकांचे मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाचा सलग तिसरा विजय रोखण्यासाठी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव वारंवार विरोधी नेत्यांकडून बोलून दाखविली जात आहे. उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता, बहुतेक सगळ्या प्रमुख राज्यांमध्ये विरोधकांच्या मशागतीला गती मिळताना दिसत आहे. पण या सगळ्या प्रक्रियेत के. चंद्रशेखर राव व त्यांची भारत राष्ट्र समिती कुठेच नाही. पाटण्यात एकत्र आलेल्या पंधरा विरोधी पक्षांच्या बैठकीत केसीआर यांचा पक्ष सहभागी झाला नाही. उलट तोच मुहूर्त पाहून केसीआर यांचे चिरंजीव व तेलंगणाचे मंत्री के. टी. रामाराव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना भेटले. 'राजकीय गोळाबेरीज नको, तर जनतेच्या प्रश्नांवर एकत्र यायला हवे. कुणाला तरी सत्तेवरून खाली खेचण्यासाठी एकजूट ही संकल्पनाच मान्य नाही,' असे त्यांचे पाटण्यातील गैरहजेरीचे समर्थन करताना म्हणणे आहे. थोडक्यात बीआरएसला काँग्रेस व भाजप या दोघांपासून दूर राहायचे आहे, कारण तेलंगणच्या राजकारणात काँग्रेसच बीआरएसचा मुख्य विरोधक आहे.
उत्तरेकडील पक्ष ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी भाजपला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व मिझोरामसोबत तेलंगणाची तिसरी विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. अशावेळी देशपातळीवरील विरोधकांच्या ऐक्यासाठी काँग्रेसच्या गळ्यात गळा घातला तर राज्याचे राजकारण गळ्याशी येणार याची जाणीव केसीआर यांना आहे. बाजूचे कर्नाटक जिंकल्यानंतर काँग्रेसचे पुढचे लक्ष्य तेलंगणा आहे. म्हणूनच आषाढी वारीच्या वेळी केसीआर पंढरपूरकडे कूच करीत होते, तेव्हाच बीआरएसमधून बाहेर पडलेले डझनभर बडे नेते दिल्लीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत होते. महाराष्ट्र जिंकण्याची स्वप्ने पाहण्याआधी तेलंगणा सांभाळा, हा संदेश त्यातून केसीआर यांना दिला गेला आहे. तेलंगणा पॅटर्नची खरी कसोटी महाराष्ट्रात नव्हे, तर तेलंगणा विधानसभा निवडणुकीतच आहे.