‘उद्धवजी, तुमचे थोडे चुकलेच ’, हे यासाठी म्हणावे लागते की, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून कामाचा तोल साधण्याच्या कसरतीत थोडे न्यून राहिले. याला जोडून एक तळटीप अशी की, केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या मदतीने महाराष्ट्र भाजपने तुमच्या शिवसैनिकांना चौकशांच्या पिंजऱ्यात उभे करून हैराण करून सोडले. याला तुम्ही केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा गैरवापर म्हणू शकता. तीन प्रमुख राजकीय पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार चालविणे सोपे नव्हते, याची कबुली तुम्ही फेसबुक लाइव्हवरून महाराष्ट्राशी संवाद साधताना प्रांजळपणाने दिलीच आहे. वास्तविक लोकप्रतिनिधी पदाचा अनुभव नसताना, प्रशासनाची यंत्रणा हाकणे कधी केलेले नसताना आणि सत्तास्थानावरून राजकीय पक्षांशी समन्वयाची वेळच कधी आलेली नसताना भिन्न मत-प्रतिमांच्या पक्षांच्या आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीपद निभावणे कसोटीचे होते खरेच! राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मंत्रिगण तसेच आमदार कसलेले गडी! प्रशासनाला हाताशी धरून काम कसे करून घ्यायचे, याचा त्यांना दांडगा अनुभव! शिवाय त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे पाणी प्यायलेले! असे असताना थेट मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेणे साेपे नव्हते.
माझ्याच माणसांना (आमदार) मी मुख्यमंत्रीपदावर असू नये असे वाटत असेल, तर राजीनामा देण्यास तयार आहे, ही भाषा करण्याची वेळ आपल्यावर आली हे दुर्दैव खरेच ! राजकारणावर बोलणे सोपे असते आणि निडरपणे सारा गाडा पुढे घेऊन जाणे, जनभावना समजून घेणे कठीण असते. कोविड संसर्गाच्या काळात तुम्ही अप्रतिम काम केले. जनतेला आत्मविश्वास देत राहिलात. सर्वांना बरोबर घेऊन काम केलेत. कुटुंबातल्या वडीलधाऱ्या माणसाच्या अधिकाराने आणि काळजीने तुम्ही राज्य सांभाळलेत. हे गुण शिवसैनिकांचे आहेत. शाखेतील सैनिक अशा पद्धतीने मदतीला जातो, म्हणून तर शिवसेनेचा दबदबा महाराष्ट्रभर आहे. गरजवंतांच्या मदतीला धावणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणजे शिवसैनिक! आता दहा हत्तींचे बळ आल्याचा दावा करून तुम्हालाच संपवायला निघालेले एकनाथ शिंदे एकेकाळी रिक्षाचालक होते. शिवसेनेच्या माध्यमातून सामान्य माणसांची कामे करीत करीत मोठे झाले. त्यांचे मोठेपण भाजपच्या मदतीला आले. अन्यथा चार दिवसांनी दीपक केसरकर सावंतवाडीतून गुवाहाटीत पोहोचले नसते. आमदार संजय शिरसाट यांनी थेट निशाणा साधत ‘वर्षा’ बंगल्यावर काय चालत होते, याची पोतडीच उघडून दाखविली आहे. शासकीय निवासस्थानी बसून राज्याचा कारभार हाकता येत नाही, हे कटू वास्तव आपल्या अनुभवाला आलेच.
आपला जनसंपर्क कमी पडला ही सर्वांचीच तक्रार आहे. राज्यातल्या सामान्य माणसांमध्ये मिसळून जाणारा, त्यासाठी धूळभरले रस्ते तुडवणारा नेता जमिनीत रुजतो आणि वाढतो. त्या आघाडीवर न्यून राहिले हे आता तुम्हालाही जाणवत असेलच! आता वेळ निघून गेली, असे सांगण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांना भाजपने दिले आणि पुढले सगळे रणकंदन सुरु झाले. पण, त्यासाठीची वाट तुम्हीच दाखविली आहे. भाजपने या सर्व परिस्थितीचा पुरेपूर वापर करून घेतला. शिवसेनेचे मावळे दुखावले आहेत, ते निराश आहेत, त्यांना आसरा हवा आहे, हे चाणाक्ष भाजपने हेरले. जे निराश नव्हते किंवा राजकीय अडचणीमुळे एकनाथ शिंदे यांना साथ देत नव्हते, त्यांना प्रलोभनांपासून धमकावण्यापर्यंत सत्तेचा वापर केला गेला असणार हे काही गुपित नव्हे. रोज दोन-चारजण निर्णय घेऊन अतिपूर्वेकडील आसाम राज्य गाठताना दिसतात, ते त्यामुळेच ! याचे सर्व नियोजन दिल्लीत होत होते. काँग्रेसचे मुख्यमंत्री दिल्लीकडे पाहत महाराष्ट्राचा कारभार हाकायचे तेव्हा त्यांचे अर्धे लक्ष दिल्लीकडे असे. पक्षश्रेष्ठींना कोण भेटते आहे, महाराष्ट्रातील कोण कोण नेते दिल्लीत वावरत आहेत, याची इत्थंभूत माहिती हे नेते रोज ठेवत असत.
आपल्याच सहकाऱ्याच्या मनात काय शिजते आहे आणि त्या नैराश्याची बेरीज होऊन काय घडू घातले आहे, याचा अंदाज लावण्यातही न्यून राहिले. अगदी आजही तुमच्यावर श्रद्धा असणारा कट्टर शिवसैनिकही याच जाणिवेने विषण्ण होऊन जे चालले आहे, ते पाहातो आहे. ठाकरे घराण्याने आजवर साथीदारांवर भिस्त ठेवून पक्ष वाढवला. आजवर सत्ता चालवून दाखविण्याचा अनुभव नव्हता, आता तोदेखील आला, पण त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते आहे. हे न्यून जे राहिले, ते पुरते करायचे तर या चुकांमध्येच सगळे धडे लपलेले आहेत. ते गिरवावे मात्र लागतील !