- डॉ. एस.एस. मंठानवे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. आजच्या विद्यार्थ्यांची शिक्षणापासून काय अपेक्षा असते? एकूण व्यवस्था त्यास काय देत असते? आणि मालकांना आपल्या कर्मचाऱ्यांकडून कोणती अपेक्षा असते? सध्या रोजगाराचे क्षेत्र इतक्या झपाट्याने विस्तारत आहे की तीन चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमातून मिळणारे कौशल्य केव्हाच निरुपयोगी होते. ज्या क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या विश्लेषण करण्याच्या आणि युक्तिवाद करण्याच्या क्षमतांना वाव मिळतो तेवढीच क्षेत्रे कार्यक्षम राहतात. विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयात शिकत असतो तेव्हा भविष्यात आपल्याला कोणता रोजगार मिळणार आहे आणि त्यासाठी कोणते कौशल्य अपेक्षित आहे याची त्याला कल्पनाच नसते. तुम्ही कॉलेजमध्ये ज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि चांगला नागरिक बनण्यासाठी जात असता, असा उपदेश त्याच्या कानी कपाळी पडत असतो पण विद्यार्थ्याला हवा असतो चांगला पगार देणारा रोजगार. त्यासाठी प्रत्येक आव्हानाचे रूपांतर त्याला संधीत करायचे असते. असे असले तरी प्रत्येक आव्हानातून चांगल्या संधी मिळतात का? आज उच्च शिक्षणासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. हुशार विद्यार्थ्यांसमोर जशी अव्हाने उभी आहेत तशीच ती हुशार नसलेल्या विद्यार्थ्यांसमोरही आहेत. शिक्षण महाग झाले असून ड्रॉपआऊटसाठी तेच एक कारण प्रभावी ठरते. त्यामुळे महाविद्यालयेविद्यार्थी टिकवून ठेवण्यासाठी नव्या योजना आखत असतात आणि त्यातूनच महाविद्यालयांमध्ये स्पर्धा सुरू होते.उत्तम शिक्षण कशास म्हणावे असा प्रश्न त्यातूनच निर्माण होतो. चांगला रोजगार ज्यामुळे मिळतो ते शिक्षण चांगले म्हणायचे का? की युवकात चांगली मूल्ये ज्यामुळे जोपासली जातात ते शिक्षण चांगले म्हणायचे? या प्रश्नांची उत्तरे उच्च शिक्षण क्षेत्रातील नेत्यांनी द्यायला हवीत. शिक्षणाच्या क्षेत्रातील व्यक्तींच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीविषयीच्या अपेक्षा या शिक्षण क्षेत्राबाहेरच्या व्यक्तीच्या अपेक्षांपेक्षा निराळ्या असतात. त्यांच्यात सांधे जुळू न शकल्याने नैराश्य येते. शिक्षण क्षेत्राबाहेरच्या लोकांना वाटते की, महाविद्यालयांनी काही नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. पण असे नावीन्यपूर्ण उपक्रम बाजारात मिळत नसतात. याशिवाय राज्य आणि केंद्र सरकारकडून शिक्षणसंस्थांना मिळणारा निधी पारंपरिक पद्धतीने मिळत असतो. संस्थांच्या कामगिरीवर हा निधी दिला जावा असे अनेक राज्य सरकारांना वाटते. त्यामुळे उच्च शिक्षण अधिक कार्यक्षम होईल व त्यातून अधिक चांगले पदवीधर निर्माण होतील असा त्यांचा समज असतो.१५ वर्षापूर्वी, नोकरीसाठी येणाºया पदवीधर तरुणाला पुढे काय मिळणार, पूर्वीच्या परीक्षेत कोणती ग्रेड मिळली होती आणि त्यास अन्य कोणत्या गोष्टींची आवड आहे अशा तºहेचे प्रश्न विचारले जायचे. आताच्या काळात वेगळे प्रश्न विचारण्यात येतात. जसे, विदेशी संस्थेत काम करण्याचा अनुभव आहे का असे त्याला विचारले जाते, पण असे काम केल्याने त्यांच्या गुणवत्तेत कोणती वाढ होते? या प्रश्नांशिवाय त्याची कलचाचणी देखील घेण्यात येते. पण त्या ऐवजी १ ते ३ लहान कोर्सेसमध्ये त्यांना भाग घ्यायला लावणे अधिक योग्य ठरेल. एकूणच योग्य उमेदवाराचा शोध लागेपर्यंत त्यांना अनेक चाचण्या पार कराव्या लागतील.अमेरिकेतील एक संशोधक कार्लिन बोरिसेन्को यांच्या ‘फाईव्ह क्रिटिकल इश्यूज फेसिंग हायर एज्युकेशन लीडर्स आॅफ २०१४’ या पुस्तकात त्यांनी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची सखोल चौकशी करण्यात येते असे नमूद केले आहे. तेथील प्राध्यापकांचे म्हणणे आहे की, शिक्षणावर होणारा खर्च हा त्यातून मिळणाºया फायद्यापेक्षा खूप जास्त असतो. एकूणच शिक्षणात केलेल्या गुंतवणुकीपासून अपेक्षित लाभ मिळत नाहीत असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. विद्यार्थ्यांना मात्र त्या गुंतवणुकीतून लगेच लाभ मिळवा असे वाटत असते. ही स्थिती अमेरिकेतील निष्कर्षावर आधारित असली तरी भारतातील स्थिती फारशी भिन्न नाही. तांत्रिक क्षेत्रातील ९० टक्के तरुण हे खासगी क्षेत्रात रोजगार करीत असतात. हे सर्व पाहता महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात मोठे बदल होण्याची गरज आहे. तांत्रिक कौशल्यामुळे रोजगार मिळतो, ही वस्तुस्थिती आहे. उद्योगांना लागणाºया कौशल्यासाठी अनेक कार्यक्रम आखण्यात येतात. फॅकल्टीतसुद्धा बदल घडून येत आहे. उद्योगाशी जुळलेल्या फॅकल्टीजची अलीकडे गरज भासू लागली आहे. तेव्हा बदलाची सुरुवात सूक्ष्म पातळीपासूनच व्हायला हवी. जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांकडून दर्जेदार अभ्यासक्रम तयार करून त्याला योग्य साधनांची जोड दिल्यास त्यातून चांगली फलनिष्पत्ती होऊ शकेल.जागतिकीकरण्याचा धक्का आपण सहन करीत आहोत. त्यातून शिक्षण हे सुद्धा आपल्या सीमा ओलांडण्याच्या स्थितीत पोचले आहे. डिजिटल नेटवर्कमुळे संशोधकांनी एकाच वातावरणात राहण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे फॅकल्टीज या अधिक मोबाईल होतील. परिणामी पारंपरिक विद्यापीठाचे मॉडेल संपेल आणि त्यातूनच अदृश्य विद्यापीठे उदयास येतील. अनेक उद्योगातील माणसं घरी बसूनच त्या उद्योगासाठी काम करू लागतील. विद्यार्थ्यांनीसुद्धा घरबसल्या शिक्षण घ्यावे असे त्यांना सांगण्यात येईल. परस्पर संपर्कापुरतेच क्लासरुम मॉडेल अस्तित्वात असेल. आॅटोमिशनमुळे ‘एन्ट्रीकेव्हल जॉब’ हा प्रकार संपल्याच्या मार्गावर आहे. त्याची भरपाई करण्यासाठी मधल्या पातळीची कौशल्ये विकसित करावी लागतील. अशा कौशल्यांसाठी वाव असेल असे गृहित धरावे लागेल. पण त्यासाठी पदवीधरच हवेत ही शक्यता कमी राहील. फक्त योग्य ते कौशल्य प्राप्त करण्याची गरज राहील. हे कौशल्य देण्याची व्यवस्था शैक्षणिक संस्थांमध्ये करणे हे महत्त्वाचे असेल. उच्च शिक्षणाविषयी अविश्वासाचे वातावरण असणे आणि पदवीला महत्त्व न उरणे या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे.औद्योगिक प्रतिष्ठाने उमेदवारांकडून कौशल्याची अपेक्षा करू लागली आहेत. तुमच्या बायोडाटात काय लिहिले आहे हे त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. उलट उमेदवारांचे जागच्या जागी मूल्यांकन करण्याचा कल वाढतो आहे. त्यातून निवडले जाणारे उमेदवार हे काम करण्यास अधिक लायक असतील मग उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची गरजच उरणार नाही. उच्च शिक्षणासमोर उभी होणारी ही आव्हाने यापूर्वी अपेक्षिली नव्हती. उच्च शिक्षणातून सर्व प्रश्नांची सोडवणूक होईल असे राजकीय नेत्यांना वाटते. याशिवाय रोजगाराच्या बाजारपेठेवर जागतिकीकरण्याचा दबावही आहे. तेव्हा शिक्षणावरील खर्च कमी करून विद्यार्थ्यांना टिकवून ठेवण्याचे आव्हान शिक्षणसंस्थांना स्वीकारावे लागणार आहे. सध्याचे वातावरण एकूणच आव्हानात्मक असून भविष्याविषयीची दूरदृष्टी असणाºयांसाठी या वातावरणात भरपूर संधी उपलब्ध राहणार आहेत, एवढे मात्र खरे!
(लेखक एआयसीटीईचे माजी चेअरमन आणि एनआयएएस बंगळुरूत एडीजे प्रोफेसर आहेत)