आजचा अग्रलेख - काँग्रेसच्या बळावर रयतवारी करणारे शरद पवार ‘जमीनदार’ही झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 11:47 AM2021-09-11T11:47:49+5:302021-09-11T11:49:36+5:30

शरद पवार यांना अशी अप्रत्यक्ष बोचरी टीका करण्याची सवय आहे. त्यांचा अर्थ काढण्यात अनेक प्रसारमाध्यमे वेळ घालवितात.  मराठी सिनेमामध्ये विनोद म्हणजे द्विअर्थी शब्द किंवा वाक्याचा वापर करण्याचा प्रघात पडला होता.

Today's front page article - Sharad Pawar became a 'zamindar' on the strength of the Congress | आजचा अग्रलेख - काँग्रेसच्या बळावर रयतवारी करणारे शरद पवार ‘जमीनदार’ही झाले

आजचा अग्रलेख - काँग्रेसच्या बळावर रयतवारी करणारे शरद पवार ‘जमीनदार’ही झाले

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जे धाडस केले, ते करण्याची तयारी किती राजकीय पक्षांची आहे? शरद पवार यांनी उत्तर प्रदेशातील जमीनदाराचे दिलेले उदाहरण सध्याच्या काँग्रेस अवस्थेला चपखल लागू व्हावे असेच आहे

काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. अशा मानसिकतेमुळे काँग्रेसची अवस्था रया गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे,’  असे आज ज्या अवस्थेत काँग्रेस पक्ष आहे त्याचे वर्णन शरद पवार यांनी केेले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी केलेले वर्णन किंवा दिलेले उदाहरण वास्तवाशी जुळणारे असले तरी त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत दोन वेळा काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी वेगळी भूमिका घेतली आणि पुन्हा बदललीदेखील. शिवाय काँग्रेसच्या बळावर रयतवारी करणारे शरद पवार ‘जमीनदार’ही झाले. त्यांची रया गेली नसेल; पण वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या राजकारणाचा पट आकसला गेला हे मान्य करावे लागेल. काँग्रेस नेतृत्वाविषयी अनेकांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. कदाचित सध्याच्या परिस्थितीविषयी अर्थात श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेसमध्ये नवे नेतृत्व पुढे आले पाहिजे, असे त्यांना वाटत असावे. भाजपविरोधी देशव्यापी विरोधकांची आघाडी करण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घ्यायला हवा. रया गेली असली तरी काँग्रेसमध्येच ती ताकद आहे, असेही अप्रत्यक्ष ते मान्य करतात.

शरद पवार यांना अशी अप्रत्यक्ष बोचरी टीका करण्याची सवय आहे. त्यांचा अर्थ काढण्यात अनेक प्रसारमाध्यमे वेळ घालवितात.  मराठी सिनेमामध्ये विनोद म्हणजे द्विअर्थी शब्द किंवा वाक्याचा वापर करण्याचा प्रघात पडला होता. तसे अनेक अर्थाने शरद पवार बोलत असतात, त्यांचा राजकारणाचा अनुभव मोठा आहे, पण काँग्रेसच्या नेतृत्वाविरुद्ध वेगळी भूमिका घेण्याची मन:स्थिती नसते, हे त्यांचे म्हणणे योग्य नाही. अनेकांनी आपली राजकीय कारकीर्द  अडचणीत येणार असताना वैचारिक पातळीवर आणि राजनैतिक सिद्धांतावर वेगळी भूमिका घेऊन संघर्ष केला आहे. त्यांनी स्वत:ही १९७८ आणि १९९९ मध्ये वेगळी भूमिका घेतली. मात्र, कालांतराने त्याच काँग्रेस पक्षाशी तडजोड करून सत्तेतही सहभागी झाले आहेत. वास्तव असे आहे की, काँग्रेसने आपला जनाधार गमावता कामा नये, हे खरे असले तरी वेगळी भूमिका घेऊन पक्षातील लोकशाही संपुष्टात आणून चालेल का? शिवाय त्या ताकदीचे नेतृत्व आज त्या पक्षात कोठे आहे? पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते के. कामराज यांनी काँग्रेसला नवे वळण घेण्याचे आवाहन करताना मंत्र्यांनी सत्तापदे सोडून पक्षाच्या कामाला वाहून घ्यावे, असे म्हटले होते. त्याला कामराज योजना म्हटले जात असे. मोरारजी देसाई, लालबहादूर शास्त्री, आदी ज्येष्ठ नेत्यांनी आणि सहा मोठ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पदांचे राजीनामे दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छोटा असूनही आजच्या स्थितीत हा प्रयोग करता येत नाही. शरद पवार यांच्यामुळे अजित पवार यांना महाराष्ट्र ओळखतो. ते अजित पवारही न सांगता काय करू शकतात किंबहुना पक्ष नेतृत्वाविषयी वेगळी भूमिका घेऊ शकतात. जी भूमिका शरद पवार यांना पटणारी नाही हे माहीत असूनही त्यांनी ती घेण्याचे धाडस केले. हा काळाचा महिमा आहे. त्याऐवजी भाजपविरोधी यूपीएचा प्रयोग पुन्हा झाला पाहिजे अशी ठाम भूमिका घेऊन संघर्षाची तयारी आहे, असे शरद पवार उघड कधी बोलणार आहेत?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जे धाडस केले, ते करण्याची तयारी किती राजकीय पक्षांची आहे? शरद पवार यांनी उत्तर प्रदेशातील जमीनदाराचे दिलेले उदाहरण सध्याच्या काँग्रेस अवस्थेला चपखल लागू व्हावे असेच आहे. उत्तर प्रदेशातून काँग्रेस पक्ष १९८९ मध्ये सत्तेबाहेर फेकला गेला. त्याला आता तेहतीस वर्षे झाली. अनेक निवडणुका लढविल्या. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव उतरत्या क्रमानेच झाला आहे. गत लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचाही पराभव अमेठी मतदारसंघातून झाला. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसला जनाधार होता; पण त्याचवेळी अनेकांची सत्तेची महत्त्वाकांक्षा सतत जागृत होती. रामजन्मभूमी-बाबरी मशीदसारख्या किंवा धर्मनिरपेक्षतेविषयी स्पष्ट भूमिका घेण्याचे धाडस अनेकांकडे नव्हते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसेल; पण विविध प्रश्नांवर ते भाजपवर तुटून पडतात. त्याचवेळी शरद पवार यांचे अनुयायी किंवा त्यांच्यामुळे ज्यांची राजकीय कारकीर्द घडली असे राष्ट्रवादीचे नेते भाजपला जवळ करतात, याचाही विचार व्हायला हवा. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, बंगालमध्ये ममता बॅनर्जी आदींनी पुढाकार घेतला तसा पुढाकार शरद पवार यांनीदेखील अखिल भारतीय पातळीवर घ्यायला हरकत नाही. त्यांच्या अनुभवाचा लाभ होईल. काँग्रेसच्या नेतृत्वाच्या आणि नेत्यांच्या मर्यादा त्यांनाही माहीत आहेत.

Web Title: Today's front page article - Sharad Pawar became a 'zamindar' on the strength of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.