आजचा अग्रलेख: राजे खुश, राजपुत्रांचे काय? पायलटांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस काय करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 11:32 AM2023-06-30T11:32:45+5:302023-06-30T11:33:15+5:30

Congress: राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत आहेत. भूपेश बघेल यांच्यासारखाच हादेखील ओबीसी चेहरा आहे. त्यामुळेच सचिन पायलट आपल्याच सरकारवर जाहीर टीका करत आहेत. कथित भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत आहेत. टीएस बाबांना दिलासा देण्यात आल्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता पायलटांकडे लागल्या आहेत.

Today's Headline: Happy Kings, What About Princes? What will Congress do to remove the displeasure of the pilots? | आजचा अग्रलेख: राजे खुश, राजपुत्रांचे काय? पायलटांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस काय करणार

आजचा अग्रलेख: राजे खुश, राजपुत्रांचे काय? पायलटांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस काय करणार

googlenewsNext

पाच वर्षांपूर्वी काँग्रेसची सत्ता येण्यापूर्वी छत्तीसगड विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले त्रिभुवनेश्वर सरण सिंग देव म्हणजेच टी. एस. सिंग देव अथवा टीएस बाबा यांचे घोडे अखेर गंगेत न्हाले आहे. सत्तरपैकी तब्बल ५५ जागा काँग्रेसने जिंकल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर खरंतर त्यांचाच दावा किंवा हक्क होता. तथापि, ओबीसी मते डोळ्यासमोर ठेवून भूपेश बघेल यांच्या गळ्यात ती माळ पडली. सरगुजा संस्थानचे राजे टीएस बाबा यांची नाराजी आरोग्य, वैद्यक शिक्षण, ग्रामविकास अशी चार-पाच महत्त्वाची खाती देऊन दूर करण्याचा प्रयत्न झाला. आता चार महिन्यांपुरते का हाेईना त्यांना औटघटकेचे उपमुख्यमंत्री बनविण्यात आले आहे. गेल्या महिन्यात सत्तराव्या वर्षी ऑस्ट्रेलियात स्कायडायव्हिंग करणाऱ्या या राजांना दिलासा मिळाल्यामुळे राजस्थानात राजपुत्रांसारखे वावरणारे सचिन पायलट यांच्या आशा पल्लवित झाल्या असतील. तेे गेली अडीच-तीन वर्षे नाराज आहेत. समर्थक आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत नेत्रपल्लवी खेळूनही झाली आहे. पण, फुटीसाठी आवश्यक तेवढी संख्या जमली नाही. गांधी कुटुंबातून त्यांना थोडेसे समर्थन असले तरी राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत आहेत. भूपेश बघेल यांच्यासारखाच हादेखील ओबीसी चेहरा आहे. त्यामुळेच सचिन पायलट आपल्याच सरकारवर जाहीर टीका करत आहेत. कथित भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत आहेत. टीएस बाबांना दिलासा देण्यात आल्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता पायलटांकडे लागल्या आहेत.

अशा राजकीय घडामोडींना गती येण्याचे कारण तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेआधीची सेमीफायनल काही महिन्यांवर आली आहे. केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे यापैकी मध्य प्रदेश राज्य आहे. मिझोराम या ईशान्य भारतातील छोट्या राज्यात भाजपचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष ‘मिझो नॅशनल फ्रंट’ सत्तेवर आहे. जवळपास चार दशके मिझोरामच्या राजकारणावर प्रभाव ठेवणारे माजी मुख्यमंत्री, राजीव गांधींचे मित्र लल थनहवला यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. तिथे ग्राम समित्या व स्वायत्त जिल्हा समित्यांच्या निवडणुकीत यश मिळविले असल्याने ती निवडणूक भाजपला तितकीशी कठीण नाही. तेलंगणाची सत्ता भारत राष्ट्र समितीकडे आहे आणि तिच्या बळावर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नजर शेजारच्या महाराष्ट्रावर आहे.

छत्तीसगड व राजस्थान ही काँग्रेसची सत्ता असलेल्या, देशातील मोजक्या राज्यांमध्ये प्रमुख आहेत. या सेमी फायनलमध्ये मोठे यश मिळविण्याचे आव्हान भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मादींपुढे आहे. त्यांना मध्य प्रदेशातील सत्ता टिकवायची आहे. तेलंगणामध्ये किमान प्रमुख विरोधी पक्ष बनण्याचे भाजपचे स्वप्न आहे. वसुंधरा राजे शिंदे व अशोक गहलोत यांना आलटून-पालटून सत्ता देणाऱ्या राजस्थानमध्ये यावेळी सहज सत्तांतर होईल, अशी स्थिती नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची ताकद अशोक गहलोत यांना मात देण्यासाठी पुरेशी नाही, हे लक्षात आल्यानंतर सध्या शांत असलेल्या वसुंधराराजेंना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. तथापि  छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांनी राबविलेल्या योजनांचा मुकाबला भाजपला करायचा आहे. गेल्यावेळी भाजपच्या हातून मध्य प्रदेशची सत्ता गेली होती. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडताना सोबत आणलेल्या आमदारांच्या मदतीने ती पुन्हा हस्तगत केली गेली. यावेळीही काँग्रेसचे तगडे आव्हान भाजपपुढे आहे. कमलनाथ यांनी पुन्हा सत्तेवर येण्याचा चंग बांधला आहे.

विशेष म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजप व काँग्रेस असा थेट सामना होणार आहे. या निवडणुकीच्या निकालांवर लोकसभेची वातावरणनिर्मिती अवलंबून आहे. याची पहिली जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थातच आहे. म्हणूनच अमेरिका व इजिप्तचा बहुचर्चित दौरा आटोपून परत आल्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी भोपाळला पोहोचले. ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्याच्या निमित्ताने त्यांनी सभा घेतली आणि आठवडाभरापूर्वी पाटण्यात एकत्र आलेल्या विरोधकांवर अगदी एकेकाचे नाव घेत हल्ला चढविला. जणू पाच विधानसभा व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचाच नारळ मोदींनी भोपाळमध्ये फाेडला आहे. पाठोपाठ काँग्रेस सक्रिय झाली आहे. थोडक्यात, सेमीफायनलची खडाखडी सुरू झाली आहे. सगळेच कामाला लागले आहेत.

Web Title: Today's Headline: Happy Kings, What About Princes? What will Congress do to remove the displeasure of the pilots?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.