जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वेस्थानकानजीक बुधवारी घडलेल्या भीषण रेल्वे अपघातासअपघात म्हणावे, की भारतीय मानसिकता आणि सामुदायिक बेजबाबदारीचे आणखी एक उदाहरण म्हणावे, हा प्रश्न पडला आहे. पुष्पक एक्स्प्रेसच्या एका डब्यात एक चहा विक्रेता गाडीत आग लागल्याचे सांगतो काय, त्याची शहानिशा न करता आपत्कालीन साखळी ओढली जाते काय, गाडी थांबताच काही प्रवासी दुसऱ्या बाजूच्या रेल्वेमार्गावर उड्या घेतात काय अन् तेवढ्यातच विरुद्ध दिशेने भरधाव येणारी कर्नाटक एक्स्प्रेस १३ जणांना चिरडते काय, सारेच अनाकलनीय आहे. एका डब्याखालून ठिणग्या उडाल्यामुळे आग लागल्याची अफवा पसरली, असे सांगण्यात येत आहे. रेल्वेच्या परिभाषेत ज्याला ‘हॉट ॲक्सल’ किंवा ‘ब्रेक-बाइंडिंग’ म्हणतात, त्यामुळे ठिणग्या उडाल्या असाव्यात, असा जाणकारांचा अंदाज आहे. भारतीय रेल्वेगाड्यांमध्ये ब्रेक लावत असताना घर्षणामुळे ठिणग्या उडणे किंवा जळल्याचा वास येणे, हे नेहमीचेच आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्येही तसेच घडले असावे; पण त्यानंतर चहा विक्रेत्याने आग लागल्याचे सांगितल्याने प्रवासी घाबरले असावे आणि त्यांनी आपत्कालीन साखळी ओढून गाडी थांबताच रुळांवर उड्या मारल्या असाव्या.
यानिमित्ताने भारतीय रेल्वेगाड्यांची दयनीय स्थिती, रेल्वेतील सुरक्षेचे प्रश्न आणि समुदाय म्हणून भारतीयांची बेजबाबदार वर्तणूक पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. या दुर्दैवी अपघातास यांत्रिक दोष जेवढा कारणीभूत आहे, तेवढीच अफवा पसरविण्याची, तिला बळी पडण्याची भारतीय मानसिकता आणि आपत्कालीन स्थितीत कसे वागावे यासंदर्भातील घोर अज्ञानदेखील जबाबदार आहे. भारतात अफवा पसरण्याचे आणि त्यावर विश्वास ठेवण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत बरेच मोठे असल्याचे वेळोवेळी समोर येतच असते. शिवाय आणीबाणीच्या परिस्थितीत भारतीय लोक विचार न करता घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेतात, हेदेखील वारंवार सिद्ध झाले आहे. संस्कार होण्याच्या वयात आवश्यक प्रशिक्षणच आपल्या देशात दिले जात नाही, हे त्यामागचे कारण. विकसित देशांमध्ये लहानपणीच बाळकडू मिळाल्याने पुढील जीवनातही नागरिक तशाच शिस्तीचे आणि जबाबदार वर्तणुकीचे प्रदर्शन करतात. आपल्याला मात्र केवळ ‘विकसित देश’ म्हणवून घेण्याची घाई झाली आहे. त्यासाठी जी पूर्वतयारी करायला हवी, त्याची पुरती वानवा आहे. वस्तुत: नागरिकशास्त्र हा विषय शाळांमध्ये सर्वांत महत्त्वाचा विषय असायला हवा; परंतु आपल्या देशात तो सर्वांत दुर्लक्षित विषय आहे. आपत्कालीन परिस्थितीत कसे वागायचे, आपत्कालीन साधनांचा वापर कसा करायचा, याबाबत बहुतांश भारतीय अनभिज्ञ असतात.
जळगावनजीकच्या रेल्वे अपघातात त्याचे पुन्हा एकदा प्रदर्शन झाले. वस्तुतः आग लागल्याची अफवा जरी पसरली असली, तरी कोठेही आगीच्या ज्वाळा दिसत नव्हत्या. गाडीही थांबली होती. त्यामुळे प्रवाशांनी शिस्तीचे प्रदर्शन करीत, गोंधळ न माजवता, केवळ विरुद्ध बाजूने खाली उतरण्याचे ठरविले असते, तर १३ जणांना हकनाक जीव गमवावा लागला नसता आणि २५ जणांना अपंग बनून उर्वरित आयुष्य काढावे लागले नसते. आपल्या देशात अगदी अशाच प्रकारचे अपघात यापूर्वीही घडले आहेत; पण चुकांपासून धडा घेऊन पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करणे, हे आपल्या गावीच नाही. वस्तुतः प्रवाशांना सातत्याने गाडीतील आपत्कालीन साधने, साखळी ओढण्याचे नियम, तसेच शिस्त पाळण्याचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. प्रत्येक डब्यात आपत्कालीन सूचनांचे फलक असायला हवेत. गाड्यांमध्ये सीसीटीव्ही आणि सेन्सरचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायला हवा. प्रत्येक रेल्वेगाडीत प्रवाशांना सूचना देण्यासाठी ‘पब्लिक अड्रेस सिस्टम’ असायला हवी. त्याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांना अशा अपघातांच्या परिस्थितीत अधिक चपळतेने काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाणेही आवश्यक आहे. जळगावनजीकच्या अपघातास फक्त तांत्रिक बिघाड कारणीभूत नाही, तर प्रवाशांच्या मानसिकतेचे आणि प्रशासनाच्या ढिसाळपणाचे ते दुर्दैवी उदाहरण आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सजगपणे वापर करणे, हेच या समस्येवरील दीर्घकालीन उपाय ठरू शकतील.