जवळपास अडीच महिन्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी (आभासी माध्यमातून) बोलले. स्वतःच्या मनातील खंत व्यक्त करत असतानाच त्यांनी शिवसेनेने दिल्लीवर स्वारी करण्याची तयारी केली पाहिजे, असे मनोगतही व्यक्त केले. भाजपच्या हिंदुत्वावर टीका करताना शिवसेनेचे हिंदुत्व कसे योग्य आहे हे सांगायला ते विसरले नाहीत. यावरून दुसऱ्या दिवशी राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले नसते, तर नवल. हा विषय पुढचे काही दिवस चालू राहील. उद्धव ठाकरे यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत ते जसे त्यांच्या पक्षातील उणिवांवर बोट ठेवणारे आहेत, तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षालाही बोचरी जाणीव करून देणारे आहेत. त्यांच्या बोलण्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संदर्भ होता. शिवसेना तुलनेने चौथ्या नंबरवर गेली, मात्र आपण या निवडणुका फारशा गांभीर्याने घेतल्या नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले.
सत्तेत असणाऱ्या शिवसेनेपेक्षा विरोधात असणारी शिवसेना कायम इतरांसाठी वरचढ ठरलेली आहे. युतीच्या काळातही भाजप सोबत सरकार मध्ये असतानाही शिवसेनेने पाच वर्ष प्रभावी विरोधकाची भूमिकाही बजावली होती. आम्ही खिशात राजीनामा घेऊन फिरत आहोत, असे शिवसेनेचे मंत्री सतत सांगायचे. त्यावेळी मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. आता स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेला तो आक्रमकपणा जळीस्थळी दाखवता येत नाही. त्यामुळे काहीशी थंडावलेली शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभावीपणे काम करू शकलेली नाही, याची खंत बोलून दाखवताना ठाकरे यांनी टकमक टोकाचे उदाहरण दिले. पक्षात नीट न वागणाऱ्या, काम न करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एवढा इशारा पुरेसा आहे. नीट काम केले नाही तर, पक्षातून हकालपट्टी होऊ शकते, हे उद्धव ठाकरे यांनी सभ्य भाषेत सांगितले आहे. त्यांच्या समोर येणाऱ्या काळात होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका असल्यामुळेच त्यांनी हा इशारा दिला आहे. इतर पक्ष ज्या पद्धतीने साध्या-साध्या निवडणुकाही गंभीरपणे घेतात ते गांभीर्य आपणही ठेवले पाहिजे. गद्दार असतील त्यांनी खुशाल शिवसेना सोडावी. जे उरतील त्या निष्ठावानांना सोबत घेऊन आपण लढू , हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी पक्षातल्या सुंदोपसुंदीवर नेमके बोट ठेवले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी पाठ फिरवली होती. त्यांचा उल्लेख न करता त्यांना फटकारण्याचे कामही या भाषणातून झाले. मात्र शिवसेनेचे मंत्री बाहेर का फिरत नाहीत?, निवडणुका का गांभीर्याने घेत नाहीत?, जिल्ह्या-जिल्ह्यातल्या शाखाप्रमुख, पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांमध्ये का लक्ष देत नाहीत?- हे पाहण्यासाठी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रभर फिरावे लागेल. त्यांना शक्य नसेल तर, आदित्य ठाकरे यांना तरी महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. तसे झाले नाही तर, शिवसेनेचा कागदी वाघ होईल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निवडणुकीमध्ये शंभरच्या आसपास सभा घेतल्या.
काँग्रेसला ज्या ३४४ जागा मिळाल्या त्यात गडचिरोली, चंद्रपूर या दोन जिल्ह्यातल्या ८० ते ९० जागांचा समावेश आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी ज्या गंभीरपणे निवडणुकांकडे पाहते तो गंभीरपणा ना, शिवसेनेकडे उरला ना, काँग्रेसकडे ! शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत जाण्याची मानसिकता का, बनत चालली आहे, यासाठी हा संदर्भही लक्षात घेतला पाहिजे. आपण भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही हे ठाकरे यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. भाजपचे हिंदुत्व कसे बेगडी आहे हे सांगण्याकरिता त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार, जम्मू काश्मीरच्या मेहबूबा मुक्ती, आंध्राचे चंद्राबाबू अशांची उदाहरणे दिली. भाजप देशात गुलामगिरीचे वातावरण तयार करत आहे आणि त्यालाच हिंदुत्वाचा मुलामा देत आहे, असे सांगताना ठाकरे यांनी दिल्ली काबीज करण्याच्या शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नाची आठवण दिली. मात्र दिल्लीकडे कूच करताना शिवसेनेला आपले घर मजबूत करावे लागेल. मरगळ झटकावी लागेल. नेत्यांना विभागवार जबाबदाऱ्या द्याव्या लागतील. शिवसेनेचे मंत्री करतात तरी काय हे तपासावे लागेल. सत्ता मिळाल्यामुळे स्वमग्न झालेल्या काही मंत्र्यांना अंग झाडून कामाला लावावे लागेल ! तरच उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेनेलाही या भाषणाचे अपेक्षित फळ मिळेल !