मोरू आता जुन्या काळातला येडाबिद्रा राहिलेला नाही. सोशल मीडियावर त्याने आपले `मोरास` असे हायफाय नेम घेतले आहे. मोरूचा बाप आता त्याच्यावर खेकसत नाही, कारण कोविड काळात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मोरू उपाख्य मोरास हा खासगी कंपनीत नोकरीला असून, सध्या वर्क फ्रॉम होम करीत आहे. वडिलांचे निधन झाले असले तरी गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा मोडायची नाही या हेतूने त्याने यंदाही बाप्पांना घरी आणले आहे. दरवर्षी आणतो तशी चार फुटांची गणेशमूर्ती न आणता ती जेमतेम दोन फुटांची (सरकारी निर्देशावरून) आणल्याने मोरूची धाकटी कन्या हिरमुसली आहे. मोरूचे थोरले पुत्ररत्न विसर्जनाला मित्रमंडळींसोबत कंबर मोडेस्तोवर नाचायचे, असा हट्ट धरून बसले आहे. कुटुंबातील अशा जटिल समस्यांवर विचार करीत मोरू झोपी गेला. साखर झोपेत असताना त्याला कुणीतरी गदागदा हलविले. पाहतो तर काय, साक्षात गणराय उभे होते. गणरायांचे ते विशाल रूप पाहून मोरू घाबराघुबरा झाला.
आपण दोन फुटांची मूर्ती आणली होती ती बायको-पोरीने परस्पर जाऊन बदलून तर आणली नाही ना? या कल्पनेने मोरू अस्वस्थ झाला. गणराय म्हणाले की, मोरू, अरे तू तर तुंदिल तनूबाबतीत माझ्याशी स्पर्धा करू लागलायस. वर्क फ्रॉम होममुळे घरात बसून आपण दिवसभर चरत असतो त्याचे दृश्य परिणाम बाप्पांच्या नजरेतून सुटले नाहीत, या कल्पनेने मोरू ओशाळला. बाप्पांसोबत मोरू खरेदीला घराबाहेर पडला. घराबाहेर पडताच बाप्पांनी तोंडावर मास्क चढवला. त्यांच्या मुषकानेही इवलासा मास्क लावला. मोरूचा मास्क हनुवटीवर होता. हे पाहून बाप्पा हसले. मोरू, तुला सतत टोकणारा तुझा बाप गेला तरी तुला अजून सुबुद्धी होत नाही का रे? हा मास्क काय शोभेकरिता लावलायस? मोरूने अनिच्छेने मास्क तोंडावर सरकवल्यासारखे केले. बाप्पा, मोरू व मुषकराज मार्केटकडे रवाना झाले. मोरू मोटारीत पेट्रोल भरण्याकरिता पंपावर गेला तर बऱ्यापैकी रांग होती. अखेर मोरूचा नंबर लागला. मोरूने कार्ड काढून दिल्यावर गाडीत पडलेले पेट्रोल पाहून बाप्पा अवाक झाले. त्यांनी मुषकाला जवळ ओढून मायेने थोपटले. तेवढ्यात मोरू म्हणाला की, पाहिलंत बाप्पा, महागाई किती वाढलीय. बाप्पांनी संमतीदर्शक मान हलवली. मार्केटमध्ये तुफान गर्दी उसळली होती. माणूस माणसाला खेटून चालत होता. फेरीवाल्यांचे हाकारे, मोटारींचे हॉर्न, ग्राहकांचे वादविवाद यांचा एकत्रित कोलाहल सुरू होता. फुले, फळे, भाज्या, मिठाई वगैरेंचे भाव ऐकून बाप्पा अचंबित झाले. मोरू पटापट गुगल पे करत होता आणि बाप्पा हे सारे पाहत होते. मार्केटमधील गर्दी अर्थातच विनामास्क होती. फिजिकल डिस्टन्सिंगवर तुळशीपत्र ठेवलेले होते. मध्येच हा सर्व गोंगाट चिरत एखादी ॲम्ब्युलन्स सायरन वाजवत वाहनांची गर्दी कापत कोविड हॉस्पिटलच्या दिशेने जाताना दिसत होती. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची सूचना देणारी भलीमोठी जाहिरात मार्केटमध्ये बाप्पांनी पाहिली. मोरू, हे संकट दिसत असतानाही तुम्ही सारे इतके बेफिकीर कसे, असा सवाल बाप्पांनी केला. त्यावर मोरू हसला व बाप्पांना घेऊन एका गल्लीत गेला. तेथे एका बंद गणेश मंदिराबाहेर राजकीय कार्यकर्ते गर्दी करून घंटानाद करीत होते. त्यांचा नेता मीडियाला बाइट देत होता.
आमचीच मंदिरे बंद का? त्यांची धर्मस्थळे, उत्सव यावर बंदी नाही मग आम्हालाच नियम का? कार्यकर्ते गणपतीबाप्पा मोरयाचा गजर करीत होते. मोरू बाप्पांना म्हणाला की, तुमच्या भेटीकरिता आमचे नेते आतूर झालेत आणि तुम्ही सांगताय अंतर राखा. तेवढ्यात एक गणेशमूर्ती घेऊन काही कार्यकर्ते आले. तरुण मुले-मुली गाण्यावर अंग मोडून नाचत होते. मंडळाचे कार्यकर्ते दुकानांमध्ये जाऊन देणगीच्या पावत्या फाडण्याचा आग्रह धरत होते. लॉकडाऊनमुळे दीर्घकाळ धंदा बंद असलेले व्यापारी हात जोडून, देतोय ती देणगी स्वीकारण्यास विनवत होते. मोरू, बाप्पा घरी परतले. तेवढ्यात मोरूचा मोबाइल मुषकराजांनी पळविला. वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील चॅट, वादविवाद इतकेच काय विनोदी संवाद वाचून मुषकराज हसून हसून गडबडा लोळू लागले. बाप्पा, येथे वेगळ्याच भक्त-अभक्तांची जुंपलीय, असे मुषकराजांनी बाप्पांना सांगितले. तेवढ्यात मोरूचा मुलगा आला आणि त्याने तो मोबाइल उचलला. तो समोर ठेवून तो ऑनलाइन शिक्षणात तल्लीन झाला. मोरूने बाप्पा व मुषकराजांना मुलाचा ऑनलाइन क्लास संपेपर्यंत तोंड बंद ठेवण्याचा इशारा केला. मोरू बाप्पांकडे काहीतरी मागणार त्यापूर्वी बाप्पा म्हणाले की, बुद्धी तुमच्या सर्वांकडे आहेच. पण तुम्हाला गरज सुबुद्धीची आहे. (तेवढ्यात मोरास... मोरास... वेकअप डार्लिंग म्हणत मोरूला त्याची बायको उठवत होती.)