विश्व हिंदू परिषद या संघाच्या एका शाखेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आपल्या जीवाला ‘दिल्लीकरांकडून’ धोका असल्याचा आरोप केला आहे. याच काळात तोगडिया हे मोदींच्या वै-यांशी हातमिळवणी करीत असल्याचे सांगणारे फलक अहमदाबाद शहरात लागले आहेत. मोदी आणि तोगडिया यांच्यातले भांडण १९९८ पासूनचे, म्हणजे १९ वर्षांएवढे जुने आहे. त्यावेळी तोगडिया यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्याच केशुभाई पटेलांना पाठिंबा दिला होता आणि मोदींचा केशुभार्इंना असलेला विरोधही जुना होता. पुढे मोदीच गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी तोगडियांना आपल्या कुंपणाबाहेर ठेवले. ती तेढ कमी करण्याचे संघाचे प्रयत्न फसले आणि आता तिने कमालीचे धारदार स्वरूप घेतले आहे. दि. १६ जानेवारीला तोगडिया एकाएकी बेपत्ता झाले व पुढे तब्बल २४ तासांनी ते अहमदाबादच्याच एका सडकेच्या बाजूला बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांच्यावरील उपचाराच्यावेळी त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. मात्र तोेगडियांना ते मान्य झाले नाही. ‘माझे अपहरण करण्यात आले आणि ते करण्याचे आदेश दिल्लीहून (?) आले होते’ असे ते जाहीरपणे म्हणाले. पुढे जाऊन ‘आपल्या जीवाला धोका असल्याचेही’ त्यांनी सांगून टाकले. तोगडिया यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा असताना त्यांचे अपहरण कोण व कसे करील असा प्रश्न त्यातून साºयांसमोर उभा राहिला. संघाच्या पदाधिकाºयांनाही तोगडियांचा आरोप मान्य झाला नाही. संघाच्या वरिष्ठ वर्तुळात तोगडिया यांना विहिंपच्या अध्यक्षपदावरून दूर करण्याची चर्चाही याच काळात झाली. मात्र तोगडिया यांनी ‘तसे केल्यास आपण पर्यायी संघटना उभी करू’ अशी धमकी दिल्याने ती कारवाई थांबली. तोगडिया इस्पितळात असताना त्यांना भेटायला भाजप वा संघ यातील कुणी गेले नाही. त्यांची चौकशी करायला जाणाºयात हार्दिक पटेल आणि काँग्रेसचे पूर्व प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधावाडिया यांचा समावेश होता. या सबंध काळात तोगडियांचे मोदी-विरोधी बोलणे सुरू राहिले. परिणामी त्यांच्या विरोधात मोदींची बाजू घेणारे फलकही अहमदाबादेत लागलेले दिसले. विश्व हिंदू परिषद ही संघाची देशव्यापी व मोठी संघटना आहे आणि पंतप्रधानपदावर असणारे मोदीही संघाचेच स्वयंसेवक आहेत. त्या दोघात जुंपलेले हे भांडण संघ परिवारात ‘सारे शांत शांत’ नाही हे सांगणारे आहे. तोगडिया हे वृत्तीने नुसते आक्रमकच नाहीत तर कमालीचे आक्रस्ताळे आहेत. त्यांची भाषणे ज्यांनी ऐकली त्यांना त्यातले एकारलेपण चांगले ठाऊक आहे. शिवाय त्यांच्यावर कुणाला जबाबदार राहण्याचे बंधन नाही. पंतप्रधानांना त्याविषयीची सगळीच नियंत्रणे सांभाळावी लागतात. स्वत:चा संतापही त्यांना दुसºया कुणाकडून वदवून घ्यावा लागतो. शिवाय त्यांना त्यांची प्रतिमाही जपावी लागते. तात्पर्य, एक कमालीचा आक्रस्ताळा व बेजबाबदार पुढारी व दुसरा सगळ्या राजकीय व राष्टÑीय जबाबदाºया सांभाळणारा नेता यांच्यातले हे वादंग आहे. मात्र प्रत्यक्ष ‘जीवाला धोका’ असल्याचा त्यातला तोगडिया यांचा कांगावा हे भांडण लवकर संपणारे नाही हे सांगणारा आहे. त्यांना शांत करण्याचा भाजपच्या स्थानिक पुढाºयांचा प्रयत्न आजवर फसला आहे. त्यामुळे त्यावर संघच कधीतरी तोडगा काढील असे म्हटले जात आहे. यातला निष्कर्ष, ‘तोगडिया ही लढाई हरतील’ एवढाच. कारण उघड आहे. आजच्या घटकेला तोगडियाहून मोदी हे संघ परिवाराला महत्त्वाचे व मोठे वाटणारे आहेत. शिवाय ते तसे आहेतही. मोदींनी मिळविलेल्या एकहाती विजयामुळेच संघ परिवाराला दिल्लीची सत्ता मिळविता आली. नंतरच्या काळात तो परिवार देशातील १९ राज्यात सत्तेवर आला. तोगडिया यांना हे जमणारे नव्हते उलट त्यांची वक्तव्ये संघावर आणि भाजपावर उलटणारीच अधिक होती. त्या परिवारात नेत्यांविरुद्ध बोलणे निषिद्ध असल्याने तोगडियांना आजवर कुणी छेडले नाही एवढेच. मोदींमध्ये ते धाडस आहे आणि त्याचा तोगडियांनी धसका घेतला आहे हे नोंदविणे आवश्यक आहे.
तोगडियांचे बंड फसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:32 AM