सुनील सुकथनकर, ख्यातनाम दिग्दर्शक
सहवेदना-सहभाव-सहविचारसभा.“आले हे ‘फुर्रोगामी’ काय तरी चाळे घेऊन परत...!” “ओ, ‘टुकडे टुकडे गँगचे समर्थक, गप्प बसा..!” “काही नाही, या xxxच्या xxxवर चार रट्टे ठेवून द्यायला हवेत, मग कळेल ‘सहिष्णुता’ म्हणजे काय ते...” “इथे असुरक्षित वाटतंय ना, मग जा ना पाकिस्तानात...” - सद्य परिस्थितीबद्दल सहवेदना मनात असणाऱ्या सहविचारी मंडळींनी १ मे २०२२ रोजी आपापल्या गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकमेकांबरोबर केवळ एकत्र जमूया, असं एकमेकांना समाज-माध्यमांवर आवाहन केल्यावर आलेल्या शेलक्या नकारार्थी प्रतिक्रिया वर निर्देशित केल्या आहेत. लिहिला नाही तो सकारात्मक आणि सहभाव व्यक्त करणारा अपरिमित प्रतिसाद. एक म्हणजे त्याला जागा पुरणार नाही. दुसरं कारण म्हणजे कोणीतरी कोणाला तरी धोपटतं आहे म्हटल्यावर वाचकवर्ग पुढे नक्की वाचेल, म्हणून ही नकारात्मक सुरुवात !
आम्ही काही कवी, लेखक, दिग्दर्शक, गायक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार, अभिनेते असे अनेकजण आज अस्वस्थ आहोत. ‘सहिष्णुता’ या बदनाम शब्दाविषयी आम्हाला जिव्हाळा आहे. आज देशातली सहिष्णू भावना रसातळाला पोचली आहे का, असा प्रश्न उपस्थित करताच जल्पकांचे तांडे आणि प्रत्यक्ष समोरचे अनेकजण इतक्या हिरीरीने तुटून पडतात की, त्या भरात ‘हीच का ती असहिष्णुता’ हे त्यांच्या ध्यानातही येत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मोकळेपणाने परस्पर-विरोधी विचार व्यक्त करण्याची मुभा. तंत्रज्ञानाच्या कक्षा पराकोटीपर्यंत रुंदावल्यावर त्यातून खरंतर जग जवळ यायला हवं होतं, माणसांनी एकमेकांना अधिक समजून घ्यायला हवं होतं. आपण सर्वांनी प्रेम आणि करुणेच्या नव्या वाटा शोधायला हव्या होत्या. पण झालं विपरितच. आज जागतिक चित्र आहे ते युद्धजन्य आक्रमक वृत्ती बळावल्याचं आणि बेगडी राष्ट्रवादातून हिंसेबद्दल आकर्षण निर्माण होण्याचं. मानवी सभ्यता ही या विश्वातल्या जल-जंगल-जमीन यांची वाटणी करत करत, जगण्याच्या पद्धती, रीतीरिवाज यांनाच ‘धर्म’ हे नामाभिधान देत, कधी भाषा, कधी संस्कृती यांच्या अस्मिता तयार करत करत एकमेकांना तोडत तोडत गेली. आपण त्या न दिसणाऱ्या रेघांना ‘सीमा’ हे नाव दिलं आणि भूभागांना ‘देश’ म्हणू लागलो. मी, माझं, आमचं यापलीकडे ‘आपलं’ असं काहीतरी असतं, हे माणूस विसरत जाऊ लागला.
या सगळ्या वाटचालीत प्रत्येक काळात काही ‘वेडे’ असे होतेच जे तत्कालीन परिस्थितीला शरण न जाता प्रश्न विचारत होते. कोत्या दुराभिमानाच्या आणि तोपर्यंत प्रस्थापित झालेल्या अज्ञानाच्या पलीकडे पाहू इच्छित होते. यांना कधी कारागृहात टाकलं गेलं, कधी हद्दपार केलं गेलं, बऱ्याचदा ठार करण्यात आलं. असं काय करत होते हे ‘वेडे’? ते चिकित्सा करत होते. माणसाने माणसाशी वागण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रेम असं सांगू पाहात होते. लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर त्यांचा प्रगाढ विश्वास होता. मग त्यात कुणी वैज्ञानिक होते, कुणी कलावंत, कुणी तत्त्वज्ञ तर कुणी संत. - आज एकत्र येणारे आम्ही सगळे यांना विनम्रपणे आमचे पूर्वज मानतो. देशा-देशांचे इतिहास सपाट आणि एकरंगी नसतात. लिहिणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनाच्या मर्यादा, पूर्वग्रहांची झापडं आणि अज्ञानातून आलेले मापदंड पुढच्या पिढ्यांना ‘खरा’ इतिहास कसा देऊ शकणार ? म्हणून नव्यानव्या विचारसरणीतून इतिहास आणि वर्तमान यांचा अभ्यास सतत चालू ठेवला तरच भविष्याकडे पाहण्याची स्वच्छ नजर तयार होणार.
एकवीसावं शतक मात्र जुन्या अनेक प्रगल्भ विचार-प्रणाली मोडीत काढत खोट्या अस्मितांचा बाजार मांडणारं होत चाललं आहे. नवं तंत्रज्ञान या बाजार-कुशल मंडळींनी दावणीला बांधलं आहे. ज्ञानातून नवा विचार शोधताना शंका-कुशंका गोंधळ निर्माण होऊ शकतो. पण जुनाट झापडबंद मतांची गोळी चढवली की एका नशिल्या समूहात सामील होणं सोपं जातं. हे होताना पाहून स्वतंत्र विचारांच्या माणसांच्या काळजात दुखतं. एकमेकांना हे सांगायला हवं, एकत्र यायला हवं, कळप म्हणून नव्हे तर स्वाभिमानी, स्वयंभू मित्रांचा निखळ समुदाय म्हणून जमायला हवं, असं वाटू लागतं.
कलावंत म्हणून होणारी घुसमट शांत, संयमी पद्धतीनं व्यक्त करायला हवी असं वाटतं. म्हणून असे आम्ही काही उद्या, १ मे रोजी आपापल्या गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमणार आहोत. पांढरा पोशाख किंवा पांढरा कपडा किंवा कागद घेऊन. सामील व्हा हे ‘आवाहन’ आहे, ‘आव्हान’ नव्हे ! १ मेच का? - कारण तो महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिनसुद्धा. महाराजांच्या पुतळ्याजवळच का?- कारण महाराष्ट्राच्या इतिहासातले, त्यांच्या युगातले स्वातंत्र्य, समता, लोकशाहीचे उद्गाते महापुरुष तेच होते. पांढरा रंगच का? - तर तो शांतीचा आणि प्रेमाचा रंग आहे. हा कार्यक्रम खोटा आहे, किरकोळ आहे, असल्या फालतूगिरीतून काय होणार, मूठभर लोकांचा थिल्लरपणा, निरुद्योगी अहंकारी लोकांची जत्रा- अशा अनेक आक्षेपांना आम्ही कुणीच उत्तर देणार नाही. समाज-माध्यमांवरही नाही आणि प्रत्यक्षही नाही. कारण? - या कार्यक्रमाचा हेतूच प्रेम आणि शांती यांची आठवण करून देणे हा आहे. स्वतःला, तिथे जमलेल्या सर्वांना आणि न जमलेल्या सर्वांनाही. जय जगत !