शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उद्या तुमचं घर ‘स्मार्ट’ होईल, तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 11:53 AM

तुम्ही ‘स्मार्ट घरी’ याल तेव्हा घरातले दिवे आपोआप चालू होतील, रोबोट तुमच्या आवडीचा स्वयंपाक करेल, टीव्हीवर मॅच दिसायला लागेल!

- अच्युत गोडबोले

१९३३-३४ साली जॉर्ज फ्रेड केक या मॉडर्निस्ट आर्किटेक्टनं एक घर ‘हाऊस ऑफ टुमॉरो’ या शीर्षकाखाली डिझाईन करून शिकागोला भरलेल्या वर्ल्ड फेअरमध्ये प्रदर्शित केलं होतं. त्यात विजेच्या साहाय्यानं गॅरेजचे दरवाजे उघडण्याची व्यवस्था, सेन्ट्रल एअर कंडिशनिंग आणि मंद-तीव्र होऊ शकणारे दिवे अशा अनेक गोष्टी कल्पिल्या होत्या. या कल्पना काळाच्या खूप पुढच्या असल्यामुळे त्या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सगळ्यांना त्या अविश्वसनीय वाटल्या. पण या कल्पना केव्हाच ‘होम ऑटोमेशन’च्या रूपात प्रत्यक्षात उतरल्या आहेत !

‘स्मार्ट होम’ या संकल्पनेमागे ‘होम ऑटोमेशन’चा मोठा हातभार आहे. पूर्वीची अनेक डिव्हायसेस ही ‘डंब’ म्हणजे पूर्णपणे यांत्रिक होती. नंतर त्यात चिप्स बसायला लागल्या आणि त्यांच्यातल्या एम्बेडेड सूचनांप्रमाणे ती उपकरणं वागायला लागली. टीव्हीचं उदाहरण घ्या. पूर्वी आपल्याला टीव्हीचा चॅनेल बदलायचा असेल, तर टीव्हीजवळ जाऊन आपल्याला बटणं फिरवावी लागायची. पण टीव्हीमध्ये चिप्स बसल्या आणि  रिमोटच्या  साहाय्यानं चॅनेल्स बदलणं  शक्य झालं. 

चिप्स बसलेली डिव्हायसेस ‘स्मार्ट’ झाली, पण ती एकमेकांशी संवाद साधत नव्हती. उद्याच्या जगात सगळंच ‘स्मार्ट’ असेल. स्मार्ट दिवे, स्मार्ट टॉयलेट्स, स्मार्ट डायपर्स, स्मार्ट टूथब्रश, स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट रेफ्रिजरेटर्स, स्मार्ट मायक्रोवेव्ह ओव्हन्स आणि स्मार्ट वॉशिंग मशीन्स, स्मार्ट एजन्सीज असं सगळं. म्हणजे त्यात मायक्रोप्रोसेसर्स असतील. ते त्यात  एम्बेडेड सॉफ्टवेअरच्या प्रोग्रॅम्सप्रमाणे चालतील. यातलं जवळपास सगळं आजही होतंच आहे. पण त्यांच्यातली ‘अक्कल’ वाढेल. आज ते आपण सूचना देऊ त्याप्रमाणे काम करतात. उद्या ते बाहेरच्या वातावरणाप्रमाणे किंवा परिस्थितीप्रमाणे (‘डेटा’ प्रमाणे) आपली कृती बदलतील (म्हणजे आपला आतला अल्गॉरिदम बदलतील). आर्टिफिशियल इंटेलिजन्समधल्या मशीन लर्निंगमध्ये नेमकं तेच होतं.

अशी डिव्हायसेस एकमेकांच्या मदतीनं घरं, ऑफिसेस, कारखाने सगळं सांभाळू शकण्यासाठी सक्षम व्हायला लागली आहेत. ही स्मार्ट डिव्हायसेस इंटरनेटला जोडली जाताहेत आणि आपल्याशी तसंच एकमेकांशी वायफायच्या द्वारे इंटरनेटवरून संवाद साधायला लागली आहेत.

यालाच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT)’ असं म्हणतात. अलीकडे आलेल्या अमिताभ बच्चनच्या जाहिरातीत तो घरापासून दूर असतानाही घरातला A.C. कसा हाताळतो ते आपण सगळ्यांनीच बघितलं आहे. हे IOT चं एक उत्तम उदाहरण आहे. शिवाय ‘इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ (ICT) आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ही तंत्रज्ञानं मदतीला आहेतच. अशी डिव्हायसेस घरोघरी दिसायला लागली की ती घरंही ‘स्मार्ट’ होतील.

उद्याच्या स्मार्ट घरांकडे तुम्ही तुमच्या मोटारगाडीतून याल तेव्हा तिचं गॅरेज आपोआप उघडेल; घरातले दिवे चालू होतील, फेस रेकग्निशन किंवा कुठलंतरी बायोमेट्रिक तंत्रज्ञान वापरून तुम्हीच आला आहात हे ते ‘स्मार्ट होम’ ओळखेल आणि तुमचा दरवाजा आपोआप उघडेल. तुम्हाला कुठल्या वेळी कुठलं तापमान आवडतं हे तिथल्या सेन्सर्सवरून माहीत असल्यामुळे तिथलं तापमान सेट केलं जाईल. तुम्ही टीव्हीसमोर बसलात की त्या स्मार्ट टीव्हीला लगेच ते समजेल आणि तो तुमचं ‘वेलकम’ म्हणून स्वागत करेल. आदल्या दिवशीची आयपीएल मॅच तुम्ही बघू शकला नाहीयेत आणि तुम्ही नेहमी त्या मॅचेस बघता याचं ‘ज्ञान’ त्या स्मार्ट टीव्हीला असल्यामुळे तो त्यावर रेकॉर्ड केलेली काल झालेली आयपीएलची मॅच तुम्हाला दाखवायला सुरुवात करेल. तुम्ही टीव्हीसमोर बसला आहात हे त्या टीव्हीला सेन्सरकडून कळल्यावर टीव्ही तो प्रोग्रॅम त्या वेळेपुरता सुरू करेल. उद्याच्या जगात रोबोट्सच स्वयंपाकही करतील. त्यांना शेकडो रेसिपीज माहीत असतील. तुम्ही जेवत असताना तुमच्या आवडीची रविशंकरची सतार घरातल्या म्युझिक सिस्टिमवर आपोआप मागे वाजायला लागेल. असं अनेक डिव्हायसेसबाबत सांगता येईल. अर्थात यात सेन्सर्सचा फार मोठा सहभाग असणार आहे.

उद्या प्रत्येक डिव्हाईस अल्गॉरिदम्स वापरून स्वत:पुढे काही ध्येयंही नक्की करेल. उदाहरणार्थ रेफ्रिजरेटरमधला ‘कुठलाही नेहमी लागणारा पदार्थ ‘आउट ऑफ स्टॉक’ होणार नाही, तसंच उगाचंच एखादा पदार्थ गरजेपेक्षा जास्तही फ्रीजमध्ये स्टॉक करणार नाही’ वगैरे. काही वेळा या ध्येयांमध्ये काही परस्परविरोधही निर्माण  होऊ शकतील. मग कुठल्या स्मार्ट डिव्हायसेसना प्राधान्य द्यायचं ते ठरवलं जाईल. ‘स्मार्ट कपाटं’ आपली नियमित औषधं संपत आल्यास आपलं प्रिस्क्रिप्शन औषधांच्या दुकानात पाठवूनही देतील! या डिव्हायसेसवर आपण घरी नसतानाही नियंत्रण ठेवण्यासाठी ॲमेझॉनची ‘ॲलेक्सा’ किंवा गुगल होम सारख्या उपकरणांचा वापर करता येऊ शकेल.

या सगळ्यांसाठी अतिशय वेगवान इंटरनेट आणि वीज पुरवठ्यात सातत्य राहील, अशा सोयी मात्र आवश्यक असतील. पण समजा कोणी वायफाय हॅक केलं तर सगळं घरच जवळपास त्या हॅकरच्या हातात जाईल किंवा आपण बाहेर गेलो आणि सर्व्हर बंद पडला तर आपल्यासाठी घराचा दरवाजा उघडणारा सेन्सरही बंद पडेल. मग आपल्याला आपल्याच घरात शिरता येणार नाही! या सगळ्याच अडचणी विचारात घेऊन आता ‘सेफ अँड स्मार्ट’ होम कसं करता येईल, यावर संशोधक काम करताहेत. आज अनेक IOT कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लवकरच या अडचणीही दूर होतील आणि आपली घरं स्मार्ट होतील, अशी आशा आहे. godbole.nifadkar@gmail.com 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान