समाज किंवा समूह संसर्गाच्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी रुग्णालये पुरेशी पडणार नाहीत. त्यासाठी सामुदायिक प्रयत्नच व्हायला हवेत. पूर्वीच्या काळी जगाच्या पाठीवर अनेक समूह संसर्गाचे रोग आले. तेव्हा त्यावर मात करण्यासाठी समाजव्यवस्थेच्या मुळाशी जाऊन अशा रोगांचे उच्चाटन केले गेले. आताही पोलिओसारख्या व्याधीवर मात करण्यासाठी समाजाच्या सर्वच स्तरांवर प्रयत्न केला जातो. २१व्या शतकात आलेला संसर्ग रोग कोरोना आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचे प्रयत्न जगभर युद्धपातळीवर सुरू आहेत. भारतासह काही देशांत अशी लस तयार करून त्याच्या चाचण्यादेखील चालू आहेत. त्याला यश येईपर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करायला हवे आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह आढळताच त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी अपरिहार्य आहे. किमान २० जणांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा आहे.सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, मृत्यू आणि नव्या रुग्णांचा शोध लागतो आहे. परवा (३ सप्टेंबर) ची आकडेवारी पाहिली, तर येत्या २ दिवसांत ३ लाख ६२ हजार १०० जणांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घ्यावा लागणार आहे. कारण त्या दिवशी १८,१०५ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र शासनाकडे सध्या कोरोनासंबंधीचे एकूण २ लाख ४६ हजार ४४१ कर्मचारी काम करतात. त्यात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आदींचा समावेश आहे. यापैकी केवळ ६५,२१९ आशा स्वयंसेविकाच ट्रेसिंगचे काम करीत आहेत. दररोज साडेतीन लाखांपेक्षा अधिक संपर्कातील लोकांचा शोध घेणे शक्य होणार आहे का?
प्रतिरुग्ण किमान २० जणांचा शोध घ्यायचा आहे. महाराष्ट्रात केवळ नागपूर आणि बीड जिल्ह्यांतच असा शोध घेण्यात आला आहे. याचाच अर्थ कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले असंख्य जण (काही लाखांत) मुक्तपणे समाजात वावरत आहेत. परिणामी, कोरोनाचा संसर्ग वाढतच राहणार आहे आणि सध्या तेच घडते आहे. देशात परवा (३ सप्टेंबर) ८३ हजार ८८३ जण बाधित आढळले. त्यांच्या संपर्कात प्रत्येकी २० जणांचा शोध घ्यायचा असेल, तर १६ लाख ७७ हजार ६६० जणांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही संख्या एका दिवसाची आहे. गेली पाच महिने कोरोनाबाधितांची संख्या एका दिवशीही आदल्या दिवशीच्या तुलनेने कमी आलेली नाही. ती वाढत जाऊन सध्या ८३ हजारांवर गेली आहे.मास्क लावूनच वावरावे लागेल, समाजात न वावरले तर अतिउत्तम; पण गर्दी टाळली पाहिजे. सामाजिक अंतर राखून व्यवहार केले पाहिजेत. आजारपणाची लक्षणे जाणवताच तातडीने रुग्णालय गाठले पाहिजे. आपल्या समाजाचे जगण्याचे व्यवहार गुंतागुंतीचे आहेत. प्रशासकीय व्यवस्था कमकुवत आहे. आरोग्य यंत्रणा कुचकामी आहे. ती सार्वजनिक (शासकीय) ठेवायची की, खासगी क्षेत्राकडे सोपवायची आदी गोंधळाचे वातावरण आहे. अशा अवस्थेत लढावे लागणार आहे. सध्या महाराष्ट्रात २ लाख ४६ हजार ४४१ कर्मचारी कोरोनायोद्धे होऊन लढताहेत. ते पुरेसे नाहीत. मानवाच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे मान्य करून प्रत्येकाने योद्धा होण्याची आणि कोरोनाविरुद्ध लढाईत भागीदारी करण्याची गरज आहे. सर्व शासकीय यंत्रणा व समाजाने कोरोनाचा धोका ओळखून आपले वर्तन ठेवले पाहिजे. ट्रेसिंग करण्यासाठी मदत केली पाहिजे.एखाद्या शेतकऱ्याच्या घरातील सर्व सदस्य बाधित झाले तर गावकऱ्यांना त्याच्या घराची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. गाय-म्हैस, शेळी-मेंढीसह शेतकरी जगत असतो. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी शेजारधर्म म्हणून अंगावर घेतली पाहिजे. सध्यातरी संसर्ग रोखण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. आवश्यक असेल तर संपूर्ण व्यवहार बंद करण्याचा लॉकडाऊनचा उपायही पुन्हा पूर्णत: स्वीकारावा लागेल. ‘चेस द व्हायरस’ हीच संकल्पना घराघरांत राबविली तरच आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ शकू. सध्याची पद्धत अपुरी आहे. आपण पूर्णत: काळजी घेत नाही आणि शासकीय यंत्रणा पुरेशी नाही, हे मान्यच करावे लागेल.