कोणत्याही युद्धाचा पहिला नियम म्हणजे युद्ध कुठेही सुरू असो, कोणत्याही देशामध्ये असो, त्यांच्यामध्ये हाडवैर का असेना, पण या युद्धाची झळ सर्वसामान्य निरपराध माणसांना बसता कामा नये. त्यांचा कुठल्याही कारणानं छळ होऊ नये, युद्धात त्यांना त्रास दिला जाऊ नये वा ते जखमी वा मृत्युमुखी पडू नयेत... पण हा नियम आज पाळला जातोय का, याविषयी शंकाच आहे. युद्धात सर्वात पहिला फटका बसतो तो सर्वसामान्य नागरिकांनाच आणि त्यांच्या छळाला पारावार उरत नाही. सध्या हमास आणि इस्त्रायल, त्याचबरोबर रशिया आणि युक्रेन यांच्यात जी दोन युद्धे सुरू आहेत, त्यात आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांचा अनन्वित छळ झाला आणि त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आलं, हा इतिहास आहे. त्यासंदर्भातल्या असंख्य बातम्या आजवर प्रसिद्ध झाल्या आहेत. पण, रशिया आणि युक्रेन युद्धातील बातम्यांच्या संदर्भात जी नवी वृत्ते सध्या प्रकाशित होत आहेत आणि ज्या ‘खबरी’ बाहेर येत आहेत, त्यानं संपूर्ण जगच हादरलं आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाला आता जवळपास अडीच वर्षे होत आली आहेत, हे युद्ध थांबण्याचं अजून नाव नाही, पण सामान्यांचा जितका म्हणून छळ करता येईल तितका तो केला जातोय. बरं हा छळ केवळ जिवंतपणीच नाही, तर लोकांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मृतदेहांची विटंबना केली जात आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात दोन्ही बाजूंनी अनेक सैनिक आणि काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या युद्धात दोन्ही बाजूंचे हजारो सैनिक कामी आले आहेत. रशियानं यातल्या काही सैनिकांचे मृतदेह नुकतेच युक्रेनला परत पाठवले, पण हे मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर त्या मृत सैनिकांच्या नातेवाइकांना मोठा धक्काच बसला. कारण त्यांच्या ताब्यात जे मृतदेह मिळाले, त्यातील अनेक मृतदेहांतील महत्त्वाचे अवयवच काढून घेण्यात आलेले होते.
डेलीमेलच्या एका वृत्तानुसार या मृत सैनिकांचे महत्त्वाचे अवयव काढून घेतले जात असून, त्यांचा काळाबाजार होत आहे. हे अवयव मोठ्या रकमेला विकले जात असून, त्यातून काळ्या पैशांचा एक नवाच गोरखधंदा सुरू झाला आहे. युक्रेनच्या एका ‘प्रिझनर ऑफ वॉर’ (युद्धबंदी)च्या पत्नीच्या म्हणण्यानुसार तिच्या पतीचं शव जेव्हा तिच्या ताब्यात मिळालं, ते पाहून तिला प्रचंड धक्का बसला. कारण ,त्याच्या शरीरातले अनेक अवयव काढून घेतले होते. त्याच्या मृतदेहाची मोठ्या प्रमाणात विटंबना करण्यात आली होती. मृत्यू होण्यापूर्वी त्याचे अनन्वित हाल करण्यात आल्याचे, त्याचा छळ करण्यात आल्याचे पुरावेही त्या मृतदेहाच्या अवस्थेवरून लक्षात येत होतं.
‘फ्रीडम टू डिफेंडर्स ऑफ मारियूपोल’ या संघटनेच्या अध्यक्ष लेरिसा सलाएवा या स्वत:ही ‘प्रिझनर ऑफ वॉर’च्या पत्नी आहेत. या विषयावरून त्यांनी तर रान उठवलं आहे. युद्धातील सैनिक ताब्यात सापडल्यानंतर त्यांचा कसा छळ केला जातो, जिवतंपणी आणि मृत्यूनंतरही त्यांचे कसे हालहाल केले जातात आणि त्यांना मारून टाकल्यानंतर त्यांच्या शरीराचे अवयव काढले जाऊन ते कसे विकले जातात, याचे पुरावेच त्यांना जगासमोर मांडायला सुरुवात केली आहे.
त्यांनी जगाला यासंदर्भात सजग करताना विविध ठिकाणी भाषणं आणि पुरावे द्यायला सुरुवात केली आहे. त्यांचं म्हणणं आहे, ‘बॉडी एक्स्चेंज’च्या दरम्यान सैनिकांचे जे मृतदेह आम्हाला मिळाले, त्यांचा मृत्यूपूर्वी अतिशय छळ करण्यात आला होता आणि त्यांचे अवयवही काढून घेण्यात आले होते. रशियामध्ये ‘ऑर्गन ट्रान्सप्लान्टेशन’चं ब्लॅक मार्केट किती जोरात आहे आणि त्यामाध्यमातून किती पैसे कमावले जातात, हे छुपं सिक्रेट आहे,
पण युद्धबंदी आणि सैनिकांच्या बाबतीतही हे व्हावं हे अतिशय दुर्दैवी आहे. ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी रक्त सांडलं, आपल्या घरादारावर पाणी सोडलं, ज्यांच्याविषयी देशवासीयांमध्ये सर्वोच्च आदराची भावना असते, अशा सैनिकांचीही विटंबना होणं ही माणुसकीला न शोभणारी गोष्ट आहे. नुकत्याच झालेल्या एका अंतरराष्ट्रीय बैठकीतही याविषयी लेरिसा यांनी खेद व्यक्त केला आणि सामान्य नागरिकांनीही सजग राहण्याचं आवाहन केलं.
तटस्थ देशांनी मध्यस्थी करावी...
लेरिसा यांनी तुर्कीच्या सरकारलाही नुकतंच आवाहन केलं की, युक्रेन आणि रशियात सध्या जे युद्ध सुरू आहे आणि दोन्ही देशांच्या ताब्यात जे युद्धबंदी आहेत, त्यांच्या आरोग्याची तपासणी एक तटस्थ देश म्हणून तुर्कीनं करायला हवी. मध्यस्थ म्हणून तुर्की आणि इतरही अनेक देशांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरू शकते. रशियानं मात्र आमच्याकडे असं काही झालं आणि सैनिकांचे अवयव काढलेत यासंदर्भात कानावर हात ठेवले आहेत. आम्ही असं काहीही केलेलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.