पाकिस्तानला जायचं हे कुणाचं स्वप्न असू शकतं का? बुधवारी रात्री अफगाणिस्तानच्या भयानक गारठ्यात तीन हजार माणसं हे स्वप्न घेऊन जलालाबादला पोहोचले. तिथं मोठं फुटबॉल स्टेडियम आहे. त्याच्या जवळच पाकिस्तानी दूतावास आहे. नेमकी त्याच दिवशी अफवा पसरली होती की पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात (म्हणजे नेहमीपेक्षा जास्त) व्हिसा देण्यात येणार आहेत.
त्या अफवेवर भरवसा ठेवून नांगरहार प्रांतासह जवळपासचे तीन हजार लोक जलालाबादला पोहोचले. साधारण सात महिने कोरोनामुळे पाकिस्तान दूतावास बंद होता. कुणालाही व्हिसा दिला जात नव्हता. त्यामुळे दूतावास कार्यालय उघडल्याबरोबर व्हिसासाठी माणसांची झुंबड उडाली. गर्दी इतकी जास्त की शेवटी जवळच्या स्टेडियममध्ये लोकांना रांगा करा असं सांगण्यात आलं. व्हिसाचे अर्ज देण्यासाठी फक्त टोकन देण्यात येणार होते. ते टोकन घेण्यासाठी लोक रात्र रात्र जागत भल्यामोठ्या लांबलचक रांगांमध्ये उभे राहिले, त्यात स्त्रिया आणि वृद्धांची संख्या जास्त होती.
मात्र सकाळ होता होता लोकांचा संयम सुटला. पाकिस्तानी दूतावासात गर्दी अशी काही उसळली की रेटारेटी झाली. आणि चेंगराचेंगरीत १५ लोकांचा बळी गेला. त्यात ११ महिला आहेत. पाकिस्तानचे अफगाणिस्तानातील राजदूत मन्सूर अहमद खान यांनी झाल्या घटनेबद्दल दु:ख तर व्यक्त केलंच मात्र अफगाण सरकारलाही चार शब्द सुनावले. ते म्हणतात, अफगाण सरकारची जबाबदारी आहे की, त्यांनी व्हिसा मागण्यासाठी येणाऱ्या माणसांसाठी अधिक उत्तम सुविधा द्यायला हव्यात!’ थोडक्यात घटनेची जबाबदारी अफगाण अव्यवस्थेवर ढकलून पाकिस्तानी दूतावासाचे अधिकारी मोकळे झाले. हजारो माणसं धास्तावून आपापल्या घरी परत गेली. म्हातारी माणसं हिरमुसली, जायबंदीही झाली. व्हिसा तर मिळाला नाहीच; पण निराशा मात्र वाढली.
पण मुळात हे सारं का झालं? एवढ्या लोकांना कशासाठी पाकिस्तानला जायचं होतं? पाकिस्तानला जाणं हे आयुष्याचं इप्सित असू शकतं का? - या प्रश्नाचं उत्तर आहे, हतबलता. अनेक अफगाणी नागरिक दुर्धर आजारांवर उपचार करून घेण्यासाठी पाकिस्तानात जातात कारण अफगणिस्तानात उपचारांची सोयच नाही. याशिवाय शिक्षण, कामधंदा यासाठीही पाकिस्तानचं दार ठोठावणारे हजारो आहोत. आपल्या भवतालची असुरक्षितता आणि दैन्य, तालिबानने पुन्हा डोकं वर काढणं या सगळ्या अवस्थेत आपल्या देशातल्या अस्थिर जगण्यापेक्षा अफगाणी माणसांना पाकिस्तान बरा असं वाटू लागलं आहे. ३० लाख अफगाण निर्वासित सध्या पाकिस्तानात राहतात. गेली १९ वर्षे अफगणिस्तान युद्धात होरपळला, त्यामुळे निर्वासितांचे लोंढे पाकिस्तानात आले. आता हे लोंढे आवरा, आपलीच अन्नान्न दशा असताना अफगाणिस्तानातून येणारे हे लोंढे कसे आणि का पोसायचे असा स्थानिकांचा सवाल आहे.
अर्थात, अमेरिका-तालिबान-अफगाण चर्चेत आपलं स्थान आणि महत्त्व टिकून राहावं, आर्थिक रसद सुरू रहावी म्हणून कुटनैतिक आघाडीवर तरी पाकिस्तानला अफगाणी लोकांसाठी आपले दरवाजे बंद करता येत नाहीत. त्यामुळे कमी प्रमाणात का होईना व्हिसा द्यावाच लागतो. आणि अफगाणी माणसांचं दुर्दैव म्हणजे जगात फार थोडे देश त्यांना पटकन व्हिसा देतात, त्यापैकी पाकिस्तान हा त्यांचा हक्काचा सहारा आहे. इथल्यापेक्षा तिथे बरं असं म्हणत, लोक पाकिस्तानात जायला निघतात. तिथं गुराढोरांसारखे जगतात, पण देश सोडतात. मात्र देश सोडून जाण्याचा विचार करण्याच्या दारातच असं चेंगराचेंगरीत मरण आणि मरणांतिक यातना देणारी निराशा अफगाण लोकांच्या वाट्याला आली. आता अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यात शांतिवार्ता सुरू आहे. पण म्हणून काही तालिबान हल्ले थांबले नाहीत, परवाच झालेल्या एका तालिबानी हल्ल्यात ३५ लोक मारले गेले. मृत्यूचा भयाण खेळ सुरूच आहे. अफगाणिस्तान नावाच्या देशाची ही अशी धुळधाण आहे.