मध्यपूर्वेतील अशांतता आणि हिंसाचार यात अनेक पटींनी वाढ होईल अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. तेल अविव हे इस्रायलच्या राजधानीचे शहर असताना ट्रम्प यांनी जेरुसलेमला या देशाची राजधानी म्हणून घोषित केले व त्याला अमेरिकेची मान्यता असल्याचे म्हटले आहे. जेरुसलेम हे ज्यू धर्माच्या लोकांचे पवित्र शहर असले तरी त्यात पॅलेस्टिनी मुसलमानांचे वास्तव्य मोठे आहे आणि त्यांनी त्या शहरावर आपला हक्क असल्याचे कित्येक दशकांपासून सांगितले आहे. त्यासाठी त्यांचा इस्रायलशी दैनिक पातळीवरील लढाही सुरू आहे. शिवाय येशूचे स्मरणस्थळ म्हणून त्या शहराला लाभलेली ख्रिश्चन धर्माची श्रद्धाही मोठी आहे. ख्रिश्चनांनी त्या शहरावर आपला हक्क कधी सांगितला नाही. मात्र जेरुसलेममध्ये त्यांना त्यांचे धर्मस्थळ म्हणून खुला व सदैव प्रवेश मिळावा अशी इच्छा त्यांनी दाखवली आहे. तो हक्क त्यांना सध्या आहेही. खरी लढत पॅलेस्टिनी मुसलमान व इस्रायली ज्यू यांच्यात आहे त्या दोन धर्मातले आताचे युद्ध ६० वर्षांएवढे जुने आहे. इस्रायलची स्थापना या क्षेत्रात १९४७ च्या सुमाराला झाली तेव्हा हा सारा प्रदेश इस्लामच्या ताब्यात होता. इस्रायलमध्ये आलेल्या ज्यूंनी तेल अविव ही आपली राजधानी बनवून आपल्या प्रदेशाचा विकास व विस्तार एकाचवेळी सुरू केला. त्यांची नजर जेरुसलेमवर अर्थातच होती. त्या शहरावरचा त्यांचा अधिकार पॅलेस्टिनी लोकांनी कधी मान्य केला नाही. त्यातूनच त्यांच्यात एवढी वर्षे युद्धे होत राहिली. त्यात ट्रम्प यांनी आता ही नवी भर घातली आहे. अमेरिकेच्या राजकारणाएवढाच तिच्या अर्थकारणावर ज्यू समाजाचा प्रभाव मोठा आहे. हा समाज आपल्या बाजूने राहावा यासाठी तेथील सगळेच पक्ष प्रयत्नशील राहिलेले दिसले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यातच जेरुसलेम शहराला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचे अभिवचन दिले आहे. ही घोषणा शक्यतो उशिरा व्हावी वा टाळली जावी असेच प्रयत्न जगातील प्रमुख देशांनी आजवर केले. अमेरिकेतील राजकारणी लोकही ती प्रलंबित राहावी याच मताचे राहिले आहेत. परंतु ट्रम्प हे कुणालाही विश्वास वाटावा असे व्यक्तिमत्त्व नाही. त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवावा अशी मागणी होण्याएवढे ते त्यांच्याच देशातील लोकांना ‘अविश्वसनीय’ व अप्रिय वाटू लागले आहेत. त्याहूनही त्यांच्या ताज्या घोषणेचा सर्वात मोठा व कदाचित भीषण परिणाम मध्यपूर्वेत होण्याची भीती आहे. इस्रायलने आपला प्रदेश जराही वाढविला की त्यासाठी तेथे युद्धे होतात. आता त्या देशाची राजधानीच त्यांच्या शत्रूंच्या ताब्यातील शहरात नेण्याचे प्रयत्न झाले तर त्या प्रदेशात युद्ध व हिंसाचार यांचा केवढा भडका उडेल याची कल्पनाच साºयांच्या अंगावर शहारे आणणारी आहे. इंग्लंडच्या पंतप्रधान तेरेसा मे यांनी आपण या घोषणेपासून दूर असल्याचे व तेल अविव या देशालाच इस्रायलची राजधानी मानणार असल्याचे जाहीर केले आहे. फ्रान्स, जर्मनी किंवा अन्य युरोपीय देशांची प्रतिक्रियाही याहून वेगळी असणार नाही. रशिया आणि चीन या दोन महासत्तांनी ट्रम्प यांच्या घोषणेला त्यांचा विरोध असल्याचे जाहीर केले आहे. जगाला शांतता हवी आहे. इस्लामवर राग धरणाºयांनाही मध्यपूर्वेला शांतता लाभावी असे वाटत आहे. पण ट्रम्प यांना आवरण्याची क्षमता यातल्या कुणात नाही. मध्यपूर्वेत तसाही कडव्या इस्लामपंथीयांचा हिंसाचार आहे आणि त्याने लक्षावधी लोकांना निर्वासित केले आहे. ट्रम्प यांचा आताचा उद्दामपणा या आगीत तेल ओतणारा आणि तो भडका वाढविणारा आहे. या स्थितीत जगाला जमले नाही तरी अमेरिकेतील शांतताप्रिय जनतेला ट्रम्प यांना आळा घालणे जमणारे आहे. त्यांच्या पक्षातली माणसेही त्यांच्यावर नाराज आहेत. या स्थितीत ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा खटला दाखल होणे हाच ही स्थिती सांभाळण्याचा खरा मार्ग आहे.
या ट्रम्पला आवरच हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:35 AM