- सुधीर महाजन
औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर, टापरगाव आणि जैतापूर या ग्रामपंचायतींनी आपल्या गावात वधू-वरांसाठी विवाहापूर्वी एच.आय.व्ही.ची चाचणी बंधनकारक करुन परिवर्तनाची चळवळ गतीमान केली आहे. फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारा, विधवा विवाह, स्त्री शिक्षण यासाठी कृती करून देशापुढे आदर्श ठेवण्याचा सुधारणावादी वारसा असणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात सध्या शिंगणापूरच्या शनीचे दर्शन घेण्याचा अधिकार महिलाना असावा का, या मुद्यावर गदारोळ उठला आहे. पुरोगामी विचारांची परंपरा असणाऱ्या राज्यात अशा मुद्यावरून गदारोळ उठणे ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह लावण्यासारखी बाब आहे. अशी परिस्थिती असतानाच एखादी कृती अशी घडते की, महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारा अव्याहत चालू राहील याची खात्री पटते. औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर, टापरगाव आणि जैतापूर या ग्रामपंचायतींनी आपल्या गावात वधू-वरांसाठी विवाहपूर्वी एच.आय.व्ही.ची चाचणी बंधनकारक केली आहे. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने एखाद्या खेड्याने असे पाऊल उचलणे हे पुरोगामित्वाचेच लक्षण आहे. कन्नड तालुक्यातील या तिन्ही गावांनी हा निर्णय गणतंत्रदिनानिमित्त बोलावलेल्या ग्रामसभेत घेतला आणि गावातील लोकानी ग्रामपंचायतींच्या या प्रस्तावाला मान्यता दिली.वेगाने बदलणाऱ्या समाजाच्या पावित्र्याच्या कल्पनाही बदलल्या आहेत. पूर्वीच्या रूढी, कल्पनांचा पगडा सैल झाला, त्याचा परिणाम सामाजिक आरोग्यावर झाला. मध्यंतरी एड्ससारख्या रोगाचा विळखा समाजाला पडतो काय अशी भीती निर्माण झाली होती; पण समाजजागृती आणि या रोगाचे भयावह परिणाम यामुळे काही बदल झाले. एड्स झाला असे इतराना समजले तर एड्सचा रुग्ण बहिष्कृत समजला जात असे. त्याच्याशी संपर्क सर्वच टाळत. मरणापेक्षा हे बहिष्कृत जगणे वाईट असते याचा प्रत्यय अनेकाना आला. या तीन गावांनी निर्णय घेतला; पण या निर्णयापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांचे मत परिवर्तन करण्याचे आव्हान ग्रामपंचायतींसमोर होते. अशा प्रक्रियेत एक नव्हे तर अनेक डोकी एकमेकांवर आपटतात. यापैकी हतनूरच्या सरपंच मंगला काळे तर महिला आहेत. त्यांनी या कामी पुढाकार घेणे ही महत्त्वाची घटना होती. गाव छोटे असेल तर असे गावासाठी निर्णय घेणे सोपे असते. कारण विरोधकांची संख्या मर्यादेत असते; पण हतनूर गावची लोकसंख्या बारा हजार आहे. मोठ्या गावात असे मतैक्य घडवून आणणे अवघड असते आणि त्यासाठी चिकाटीने प्रबोधनाचे काम करावे लागते. या तिन्ही गावात ही चाचणी होते. वर किंवा वधू बाहेरगावची असेल तर त्यांच्यासाठीसुद्धा ही चाचणी बंधनकारक आहे. येथे विवाहापूर्वी वधू-वरांना ग्रामपंचायत, वेगळे स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्र देते. काही वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील एड्सच्या रुग्णात १६ टक्क्यांवरून १.०१ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.परिवर्तनाची ही चळवळ चालू असताना सामाजिक बांधिलकीची भावनाही टिकून असल्याचे काही घटनांमधून जाणवते. दुष्काळामुळे मराठवाडा होरपळत आहे. सर्वत्र पाणीटंचाईने कहर केला. बदनापूर तालुक्यातील पाडळी हे खेडे इतर खेड्यांसारखे पाणीटंचाईने त्रस्त झालेले. शासनाकडून उपाययोजना नाही. अशावेळी डॉ. विवेक वडके या उद्योजकाने आपल्या मुलीचा विवाह साधेपणाने पार पाडला आणि पाडळीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मदत म्हणून तीन लाख रुपये दिले. वडकेंच्या कृतीने ग्रामस्थांमध्येही गावासाठी आपणच काही केले पाहिजे ही जबाबदारीची भावना निर्माण झाली आणि गावकऱ्यांनी चार लाख रुपये उभारण्याचा निर्णय घेतला. या पैशातून गावाजवळील नदीवर बंधारा बांधण्यात येईल. आपला मार्ग आपण शोधणारी, आपल्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढणारी ही या खेड्यांची कहाणी प्रातिनिधिक असली तरी महाराष्ट्रात सगळीकडे कमी अधिक प्रमाणात असे प्रयत्न सर्वत्र चालू आहेत. कधी कधी पुरोगामित्वावर शनीची छाया पडते; पण संक्रमण अटळ असते.