- अझहर शेख(वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, नाशिक)
ग्रीष्म ऋतू संपायला आला की, वरुणराजाच्या जलाभिषेकाची चाहूल पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेला लागण्यास सुरुवात होते. या पर्वतरांगांच्या कुशीत बहरलेल्या देशी प्रजातीच्या झाडांवर कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भंडारदरा वनपरिक्षेत्रात दरवर्षी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून काजव्यांचा लयबद्ध लखलखाट सुरू होतो. काजव्यांच्या या अद्भुत दुनियेची मोहिनी प्रत्येकाला पडते अन् मग पर्यटकांचे लोंढे वीकेंडला अभयारण्याकडे येऊ लागतात.
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा वनपरिक्षेत्र निसर्गाने मुक्तहस्ताने भरभरून दान दिलेला हा भाग पश्चिम घाटात समाविष्ट होतो. या परिसरात दाट वृक्षराजी आजही अस्तित्वात आहे. जैवविविधतेने नटलेले हे अभयारण्य भंडारदरा व राजूर अशा दोन वनपरिक्षेत्रांत विस्तारलेले आहे. अभयारण्यात वसलेल्या आदिवासी गावातील लोकांचा मुख्य आधार भातशेती. तो फक्त पावसाळ्यातील चार महिन्यांपुरता. एरवी आठ महिने या भागातील लोक पर्यटनावरच उपजीविका करतात. या अभयारण्य क्षेत्रात प्रत्येक गावामध्ये ग्राम विकास समिती गठित करण्यात आली आहे. उन्हाळ्यात मंदावलेले पर्यटन पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा बहरण्यास सुरुवात होते. पहिले निमित्त असते, ते काजवा महोत्सवाचे.
काजवे बघण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक अभयारण्याला भेट देतात. वन्यजीव विभागाकडून मुतखेल व शेंडी या नाक्यांवर वाहनांची तपासणी होते. अभयारण्यातील सर्व नियमांचे पालन करण्याची सूचना देऊन सशुल्क प्रवेश दिला जातो. रात्री साडेनऊ वाजेनंतर पर्यटकांना अभयारण्यामध्ये प्रवेश बंद केला जातो. वनाधिकारी, कर्मचारी आत गेलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात करतात. अरुंद रस्ता, आजूबाजूला घनदाट वृक्षराजी, रातकिड्यांचा किर्रर्र आवाज अन् दाट अंधार अशा वातावरणात काजव्यांची चमचम आल्हाददायक आणि नेत्रसुखद असते.
कोरोनाची लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल झाले अन् पर्यटक मोठ्या संख्येने ‘लॉकडाऊन’चा शीण घालविण्यासाठी घराबाहेर पडू लागले, तेव्हापासून काजवा महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्येसुद्धा दरवर्षी वाढ होत आहे. पर्यटकांमुळे स्थानिकांच्या पदरात दोन पैसे जरूर पडतात. कॅम्पिंगची सोय, अस्सल घरगुती ग्रामीण चवीचे भोजन, रानमेवा विक्री अशा अनेक माध्यमांतून अभयारण्यातील गावांमध्ये लोक व्यवसाय करतात.
वन-वन्यजीव विभागाने मागील तीन वर्षांपासून काजवा महोत्सवाला नियम व निर्बंधांच्या चौकटीत बसविण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, मात्र काही पर्यटक रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत गैरवर्तन करताना नजरेस पडतात. या बेबंद गर्दीमुळे काजव्यांचा विणीचा हंगाम धोक्यात सापडतो की काय, अशी भीती आता जाणकार पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. वनरक्षक व जागोजागी तैनात असलेल्या वनसेवकांच्या नजरेत धूळफेक करून काही मद्यधुंद पर्यटक शांतपणे काजवे न बघता उन्मादाने वागतात. काही हौशी पर्यटकांना, तर काजवे चमचमत असतात, त्या झाडांजवळच जायचे असते. जिवंत चमचमते काजवे मुठीत पकडून बाटलीत भरून घरी आणण्याचा मूर्खपणाही करायचा असतो. या उन्मादाच्या भरात खाली जमिनीवर असणारे मादी काजवे पायदळी तुडवले जातात, याचे भान कुणालाच नसते, कारण मादी काजवे चमकत नाहीत. चमकतो तो नर. पर्यटकांना आवर घालणे मुश्कील होत असल्यामुळे हा काजवा महोत्सव बंद करण्याचा आग्रह पर्यावरण व निसर्ग अभ्यासकांकडून होऊ लागला आहे. त्याबाबत वन्यजीव विभागावर दरवर्षी दबावही असतो. हे आयोजन बंद केले, तर स्थानिकांच्या कमाईच्या संधी हिरावल्या जातात आणि सुरू ठेवले, तर बेजबाबदार पर्यटकांचे कान कोण धरणार हा प्रश्न! स्थानिक गावकऱ्यांच्या साथीने निसर्ग संवर्धनाचा प्रयत्न करत असताना, वन्यजीव विभागापुढेही मर्यादा असतात. निसर्गात येताना पर्यटकांनी स्वयंशिस्त लावून बेभान वर्तन टाळले, तरच पुढे जाऊन डोळ्यांपुढे काजवे चमकण्याची वेळ येणार नाही! ज्याच्या चमचमाटासाठी वाट वाकडी करून जंगलात जायचे, तो काजवाच या अभयारण्यातून लुप्त झाला, तर मग काय करणार...?