मिलिंद कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्टÑाची विधानसभा निवडणूक ही तिरंगी होणार असे चित्र दिसू लागले आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादीची आघाडी निश्चित झाली आहे. भाजप-शिवसेनेत जागावाटपावरुन वाद असले तरी युती होणार असे भाजपचे नेते ठामपणे सांगत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीत मिठाचा खडा पडला असला तरी सन्मानजनक तोडग्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते आशावादी दिसत आहे. या सगळ्याचा मथीतार्थ एकच दिसतो की, यंदाची निवडणूक ही तिरंगी किंवा बहुरंगी होणार आहे. आघाडी, युती आणि आणखी एक आघाडी असे चित्र असले तरी शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, संभाजी ब्रिगेड, मार्क्सवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, रिपब्लीकन पार्टीचे काही गट हे त्यांच्या प्रभावक्षेत्रात बळ अजमावणार आहेत. प्रमुख तीन युती-आघाडी असली तरी अपक्षांची संख्या देखील मोठी असण्याची शक्यता आहे. मतदारसंघाचे सामाजिक गणित लक्षात घेऊन कोणत्याही एका पक्षाची उमेदवारी घेण्यापेक्षा अपक्ष उमेदवारी घेऊन सर्वसमावेशक राहणे सोयीचे असते, असे गृहितक मांडून काहींनी तयारी चालविलेली आहे. स्वबळाचे आणि बहुमताचे दावे प्रत्येक पक्ष करीत असला तरी प्रत्येकाचे बळ, प्रभावक्षेत्र आणि मर्यादा ठाऊक असल्याने आणि २०१४ मध्ये ते अजमावून पाहिल्याने पुन्हा कोणीही असे धाडस करणार नाही. २८८ जागांवर उमेदवार देणे आणि त्यापैकी अधिकाधिक निवडून आणणे किती आव्हानात्मक असते, याचा अनुभव पाच वर्षांपूर्वी घेतल्याने यंदा आघाडीसोबत युतीदेखील होईल, हे निश्चित मानले जात आहे.खान्देशचा विचार केला तरी राज्यासारखीच स्थिती येथे दिसून येत आहे. आघाडीमध्ये जळगाव शहर आणि रावेर या जागा काँग्रेसकडे तर उर्वरित ९ जागा राष्टÑवादी आणि मित्र पक्षाकडे जातील, असे दिसते. युतीमध्ये विद्यमान आमदार असलेल्या जागा त्या पक्षाकडे राहतील, असे मानले तर भाजपकडे ७ तर सेनेकडे ३ जागा जातील. एरंडोलच्या जागेवर सेनेचा दावा प्रबळ ठरतो. जळगाव शहर मतदारसंघात भाजपचे सुरेश भोळे यांच्यापुढे काँग्रेसकडून उमेदवाराचा अद्याप शोध घेतला जात आहे. वंचितने उमेदवार जाहीर केला आहे. ग्रामीण मतदारसंघात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार अद्याप निश्चित होत नाही. एरंडोलमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा आमने सामने राहतील. तीच स्थिती अमळनेरात राहील, असे चित्र आहे. भाजपच्या उमेदवारीवरुन तेथे उत्सुकता आहे. रावेरमध्ये २०१४ चेच प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा रिंगणात उतरतील. भुसावळात आमदार संजय सावकारे यांच्यापुढे राष्टÑवादीने नवा उमेदवार आणला आहे. मुक्ताईनगरात ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या प्रतिस्पर्धीविषयी काथ्याकुट सुरु आहे. राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी उमेदवारीस नकार दिल्यानंतर अन्य चौघांनीही काढता पाय घेतला आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात पुन्हा एकदा संजय गरुड हे आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. चोपड्यात माजी आमदार जगदीश वळवी यांनी राष्टÑवादीत घरवापसी केली असून अनेकांची सेनेकडे उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. पाचोऱ्यात जुनेच प्रतिस्पर्धी पुन्हा नशिब अजमावत असले तरी तिसरा गडी कोण राहतो, याची उत्सुकता आहेच. चाळीसगावात भाजपकडे तब्बल ३६ इच्छुक असले तरी राष्टÑवादीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.धुळ्यात आघाडीत साक्री, शिरपूर व धुळे ग्रामीण हे काँग्रेसकडे तर धुळे शहर व शिंदखेडा हे राष्टÑवादीकडे जातील, असे मानले जात आहे. काँग्रेसचा एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात अनिश्चितीततेचे वातावरण आहे. साक्रीत जुनीच लढत होईल, असे चित्र असले तरी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. शिरपुरात जुना सामना रंगेल. शिंदखेड्यात त्याची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. धुळे शहरात भाजपकडे इच्छुकांचा ओघ असला तरी सेनेचा या जागेवर दावा आहे. माजी आमदार प्रा. शरद पाटील इच्छुक आहेत. ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना भाजपचे राम भदाणे लढत देतात की, दुसरा आणखी कोण रिंगणात उतरतो, हे पुढील आठवड्यात स्पष्ट होईल.नंदुरबारात चारही जागा काँग्रेस लढवणार हे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांच्या राजीनाम्यावरुन स्पष्ट झाले. नवापुरात काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या वारसदारांमध्ये लढत होत असताना भाजप नेते डॉ.विजयकुमार गावीत यांचे बंधू यंदाही रिंगणात उतरले आहेत. नंदुरबारात डॉ.गावीत यांच्याविरुध्द काँग्रेस कुणाला उतरवते याची उत्सुकता आहे. शहाद्यात काँग्रेसकडून माजी मंत्री पद्माकर वळवी यांची उमेदवारी निश्चित असून भाजपमध्ये आमदारांच्या कुटुंबात उमेदवारीवरुन कलह सुरु झाला आहे. राजेंद्र गावीत रिंगणात उतरल्यास तिरंगी लढत अटळ आहे. अक्कलकुव्यात काँग्रेसचे आमदार के.सी.पाडवी यांना यंदा भाजपतर्फे कडवे आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.तिरंगी, बहुरंगी लढतीचे चित्र पुढील आठवड्यात स्पष्ट होईल. त्यावरच समीकरणे अवलंबून राहतील.