श्रद्धांजली - निलंगेकर यांच्या सकारात्मक राजकारणाचा अंत!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 12:40 AM2020-08-07T00:40:44+5:302020-08-07T00:44:49+5:30
लोकांत मिसळा. त्यांच्या अडचणी, दु:ख समजून घ्या. माणसांना जपा. मात्र, त्यासाठी खोटी आश्वासने देऊ नका. जे शक्य आहे तेच बोला.
धर्मराज हल्लाळे ।
वयाच्या ९१व्या वर्षात एखाद्या जाहीर समारंभात अर्धा तास भाषण करायचे. जन्मदिनी दिवसभर लोकांच्या गाठीभेटी घ्यायच्या. इतकेच नव्हे, प्रकृती बरी नसताना आपल्या गावाची, गावातल्या जिवाभावाच्या लोकांची काळजी घ्यायची. अशी ऊर्जा कोठून येते, असे एकदा माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना विचारले होते. ते म्हणाले, ‘दृष्टी सकारात्मक हवी. जे डोक्यात आहे, ते ओठात आले पाहिजे. अर्थात जसा विचार करतो, तसे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण मनाविरुद्ध कृती करीत असलो की, मेंदूवर परिणाम होतो. स्वाभाविकच ऊर्जा कमी होते. हे झाले वैचारिक पातळीवर. शरीर शुद्ध राहण्यासाठी शुद्ध आहार हवा अन् अपेयपान नको.’ डॉ. निलंगेकर यांनी ही जीवनदृष्टी कायम जपली.
लोकांत मिसळा. त्यांच्या अडचणी, दु:ख समजून घ्या. माणसांना जपा. मात्र, त्यासाठी खोटी आश्वासने देऊ नका. जे शक्य आहे तेच बोला. काही काळ माणूस दुरावला तरी चालेल, असे परखड विचार मांडत आयुष्यभर मूल्यांची जपणूक करणाऱ्या डॉ. निलंगेकर यांची राजकीय कारकीर्द सहा दशकांची राहिली. ४१ वर्षे आमदारकी. प्रदीर्घ काळ मंत्रिपद आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. सत्तेत असताना आणि अगदी आयुष्याच्या अखेरपर्यंत ते सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिले. गेल्या फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी डॉ. निलंगेकर यांना मंचावर सर्वांनी पाहिले. गेल्या काही दिवसांत तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात दाखल केले होते. वाढलेले वय, स्वत: आजारी असतानाही त्यांनी नातू अरविंद निलंगेकर यांना उपविभागीय अधिकाऱ्यांना फोन लावायला सांगितला. त्यावेळी डॉ. निलंगेकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली होती. मला काहीही होणार नाही, मी पंधरा दिवसांत बरा होऊन घरी येईन. तुम्ही गावातील लोकांची काळजी घ्या. निर्जंतुकीकरण करा, असा सल्ला देऊन डॉ. निलंगेकर उपचारासाठी निघाले. १७ दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनाला हरविले; परंतु वार्धक्य व इतर आजारांमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नेतृत्व स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आलेले होते. विचारांवर निष्ठा होती. त्यामुळेच कसलाही स्वार्थ नसलेले असंख्य कार्यकर्ते कायम त्यांच्यासोबत राहिले. जशी नेत्याची पक्षनिष्ठा तशीच कार्यकर्त्यांची होती. आता निवडणुकीत मते मिळवावी लागतात. डॉ. निलंगेकर यांची मते ठरलेली होती. राजकारण म्हटले की, डावपेच, कुरघोड्या, आरोप, टीका हे एकामागून एक येत राहणार. त्याच्या पलीकडे जाऊन सकारात्मक राजकारणाची पायाभरणी करणाºया नेत्यांपैकी एक म्हणजे डॉ. निलंगेकर. ज्याची प्रचिती जिल्ह्याच्या राजकारणात सदैव आली. शिवराज पाटील-चाकूरकर, विलासराव देशमुख व डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर या तिन्ही नेत्यांनी उंचीचे राजकारण केले. व्यक्तिगत टीका कधीच केली नाही. प्रारंभापासूनच राजकीय सुसंस्कृतपणा होता आणि तो पुढे वृद्धिंगत होत गेला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली नाही असे नाही; परंतु भाषेची मर्यादा आणि भाषणाचे मुद्दे काय असावेत, हे डॉ. निलंगेकर यांच्यासारख्या नेत्यांकडून शिकले पाहिजे.
नेता तोच असतो, जो स्वत: घडत असताना इतरांनाही संधी उपलब्ध करतो. पाठीशी राहतो, योग्य व्यक्तीची निवड करणे आणि त्याला तशी संधी उपलब्ध करून देणे हेही मोठेपण असते. केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शिवराज पाटील-चाकूरकर यांची लोकसभा लढविण्याची इच्छा नव्हती. डॉ. निलंगेकर यांच्या आग्रहामुळेच चाकूरकर यांनी १९८० मध्ये पहिली लोकसभेची निवडणूक लढविली. त्यासाठी संपूर्ण पुढाकार डॉ. निलंगेकर यांचा राहिला. त्यावेळी डॉ. निलंगेकर यांनी दूरध्वनी करून चाकूरकरांना कळविले, तुम्ही दोन लाखांहून अधिक मतांनी निवडून आला आहात, निवडणूक लढविणार नव्हता, आता प्रमाणपत्र तरी घ्यायला या. असाच एक प्रसंग माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी लिहिला आहे. १९८५ मध्ये प्रतिभातार्इंना राज्यसभेचा अर्ज भरायला सांगितले. त्यांनाही दिल्लीला जाण्याची इच्छा नव्हती. तेव्हा डॉ. निलंगेकर यांनीच राजीव गांधी यांची इच्छा असल्याचे सांगून प्रतिभातार्इंना राज्यसभेचा अर्ज भरायला लावला. डॉ. निलंगेकर यांची पुढची पिढीही राजकारणात आपले स्थान बळकट करीत आहे. नातू संभाजी पाटील निलंगेकर कॅबिनेट मंत्री राहिले. मुलगा अशोकराव निलंगेकर पक्षीय राजकारणात सक्रिय आहेत. आजही मतदारसंघावर निलंगेकर हेच वलय टिकून आहे.
डॉ. निलंगेकर यांनी मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या विकासात दिलेले योगदान, सिंचन प्रकल्पांची उभारणी, शिक्षण संस्थांचे निर्माण केलेले जाळे अनेक पिढ्यांचे उत्कर्ष घडविणारे आहे. मुख्यमंत्री पदावर असताना प्रत्येक विभागाच्या विकासाचा कार्यक्रम आखला. मराठवाडा, विदर्भाबरोबर कोकण विकासाचा कृती आराखडा त्यांच्याच कार्यकाळात मांडण्यात आला. साधी राहणी, चारित्र्यसंपन्न नेतृत्व आणि शेवटच्या श्वासापर्यंत लोकाभिमुख कर्तृत्व असणाºया नेत्याचे कार्य पुढे नेणे हीच खरी आदरांजली !
(लेखक लोकमत लातूर आवृत्तीचे वृत्तसंपादक, आहेत)