तब्बल ७० वर्षे मराठी रंगभूमीवर हाताला रंग लावून ज्येष्ठ व श्रेष्ठ कलावंतांच्या चेहऱ्यांवर त्यांची पखरण करणे हे साधे काम खचितच नाही. कृष्णा बोरकर, अर्थात रंगभूमीचे लाडके बोरकरकाका यांनी मात्र ७० वर्षे अव्याहत हे काम मन लावून केले आणि कलावंतांच्या चेहऱ्यावरचा रंग त्यांच्या अंतर्मनात आपसूक उतरत गेला. त्याचे प्रतिबिंब कलावंतांच्या भूमिकेत पडले आणि बोरकरकाकांचे हात समाधानाने तृप्त होत राहिले. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी त्यांनी हातांना लावलेला रंग पुढची सात दशके तसाच टिकून राहिला आणि या काळात तो रंग अनेक विभूतींच्या चेहऱ्यांवरही अलगद विसावला. सौंदर्याचे वरदान लाभलेल्या डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्यापासून नवीन पिढीपर्यंतचे कलावंत या रंगाने धन्य झाले. बोरकरकाकांची खासियतच अशी होती की भल्याभल्यांचे चेहरे त्यांनी पार बदलून टाकले. भूमिकेत परकायाप्रवेश व्हावा, अशा पद्धतीने त्यांनी केलेली रंगभूषा हा थेट अभ्यासाचा विषय होऊन गेला. गुड बाय डॉक्टर, गगनभेदी, स्वामी, गरुडझेप, दीपस्तंभ, रणांगण अशा अनेक नाट्यकृती लोकप्रिय होण्यामागे बोरकरकाकांच्या रंगभूषेचा मोठा वाटा होता. गुड बाय डॉक्टर या नाटकातील मधुकर तोरडमल यांची रंगभूषा जशी लक्षवेधी ठरली, तसेच काम बोरकरकाकांच्या जादुई हातांनी दीपस्तंभ या नाटकात केले. रणांगण या नाटकात तर १७ कलाकारांना तब्बल ६५ प्रकारच्या रंगभूषेत सादर करण्याची किमया त्यांनी करून दाखवली. जुन्या पिढीतील श्रेष्ठ नट केशवराव दाते, नानासाहेब फाटक, बाबूराव पेंढारकर, मास्टर दत्ताराम यांच्यापासून नंतरच्या पिढीतले ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर, डॉ.काशीनाथ घाणेकर, यशवंत दत्त, सुधीर दळवी या आणि अशा अनेक दिग्गज रंगकर्मींची रंगभूषा करून बोरकरकाकांनी रंगभूषेच्या क्षेत्रात दोन पिढ्यांचा अनोखा बंध निर्माण केला. केवळ रंगभूमीच नव्हे, तर रूपेरी पडद्यासाठीही त्यांनी रंगभूषा केली. त्यांच्या उमेदवारीच्या काळात चित्रपती व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. राजकमलच्या दो आँखे बारह हाथ, नवरंग अशा चित्रपटांसाठी त्यांनी सहाय्यक रंगभूषाकार म्हणून काम केले आणि केवळ रंगभूमीच्या पडद्यामागेच नव्हे तर रूपेरी पडद्यावरही त्यांनी त्यांचे नाव शब्दश: रंगवले. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार असो किंवा राज्य शासन अथवा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार असो, सदैव नम्रतेत रमणारे बोरकरकाका त्या सगळ्याच्या पलीकडे केव्हाच जाऊन पोहोचले होते. सच्च्या रंगांचा रंगकर्मी असलेल्या बोरकरकाकांच्या एक्झिटमुळे आता रंगभूमीवरचे रंगच नि:शब्द झाले आहेत.
सच्च्या रंगांचा रंगकर्मी...
By admin | Published: May 17, 2017 4:29 AM