सच्चे कॉँग्रेसी, संसदीय कौशल्य आणि मुत्सद्देगिरी असलेले राजकारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 05:15 AM2020-09-01T05:15:25+5:302020-09-01T05:16:46+5:30
समकालीन भारतीय राजकारणात प्रणव मुखर्जी यांची ओळख जननेता यापेक्षा मुत्सद्दी अशीच होती. संसदीय कौशल्य आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर दिल्लीच्या राजकारणात त्यांनी स्वत:ची ताकद निर्माण केली.
- गौतम लाहिरी
ज्येष्ठ पत्रकार
प्रणव मुखर्जी यांची जीवनगाथा म्हणजे यश-अपयशाच्या हिंदोळ्यावरील जणू एक शर्यतच होती. एक सामान्य नागरिकही राजकीय स्वप्न पाहून सर्वोच्च पदापर्यंत प्रवास करू शकतो, हे प्रणव मुखर्जी यांनी दाखवून दिले. त्यांच्या या कामगिरीसाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
समकालीन भारतीय राजकारणात प्रणव मुखर्जी यांची ओळख जननेता यापेक्षा मुत्सद्दी अशीच होती. संसदीय कौशल्य आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर दिल्लीच्या राजकारणात त्यांनी स्वत:ची ताकद निर्माण केली. परंतु,त्यांना अनेकदा पक्षश्रेष्ठींच्या गैरसमजाचे बळीही व्हावे लागले. प्रणव मुखर्जी हे पक्के बंगाली होते. केवळ मनाने नव्हे तर पेहरावातही त्यांनी आपले बंगालीपण जपले होते. अखिल भारतीय कॉँग्रेस समितीच्या बैठकीत सच्च्या कॉँग्रेसजनाप्रमाणे ते नेहमी गांधी टोपी परिधान करत. मात्र, कार्यालयात पोहोचल्यावर ते आपला नेहमीचा बंद गळ्याचा सूट आणि बूट परिधान करत. सोन्याची साखळी असलेले एक घड्याळ त्यांच्या खिशाला नेहमीच लटकलेले असायचे. वडील कामदा किंकर मुखर्जी यांनी ते भेट दिले होते.
प्रणव मुखर्जी यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणजे बांगलादेशचा मुक्ती लढा. पूर्व पाकिस्तानमधून बंगाली नागरिकांचे होत असलेले स्थलांतर पाहून त्यांचे मन हेलावून गेले. १७ जून १९७१ रोजी खासदार म्हणून प्रणव मुखर्जी यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे विधेयक सादर केले. त्यांच्या सडेतोड युक्तिवादामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीही प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळेच युरोपीयन देशांमध्ये बांगलादेशाबाबतची भूमिका मांडण्यासाठी इंदिरा गांधींनी प्रणबदांनाच पाठविले. प्रणव मुखर्जी यांचे हेच योगदान लक्षात ठेवून ढाका येथील भेटीत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या हस्ते बांगलादेशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येने प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय आयुष्यात उलथापालथ घडविली. मुखर्जी यांचा पंतप्रधानपदावर डोळा असल्याचा गैरसमज पसरविण्यात आला. त्यामुळे राजीव गांधी यांच्या नजरेतून ते काही काळ उतरले होते. परंतु, त्याच राजीव गांधी यांनी पुन्हा एकदा प्रणव मुुखर्जी यांना सक्रिय राजकारणात आणले. एवढेच नव्हे तर आपले सल्लागार म्हणून नेमले. पक्षश्रेष्ठींचा पूर्ण विश्वास संपादन करूनही त्याचा राजकीय लाभ मात्र मुखर्जी यांना झाला नाही. २००४ साली कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पंतप्रधानपदी आपलीच निवड होईल, याची प्रणव मुखर्जी यांना पूर्ण खात्री होती. पण हे घडले नाही. २००७ मध्ये राष्टÑपतिपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. परंतु, राजकीय अपरिहार्यतेमुळे कॉँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्याला मान्यता दिली नाही. पुढे २०१२ सालीही त्यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राष्टÑपती करून पंतप्रधानपदाची जबाबदारी मुखर्जी यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, हे देखील घडू शकले नाही. हीच वेदना मनात ठेवून त्यांनी भारताचे १३ वे राष्टÑपतिपद स्वीकारले आणि सक्रिय राजकारणातून निवृत्ती
घेतली. सच्चे कॉँग्रेसी असलेल्या प्रणव मुखर्जी यांच्या मनात कायमच कॉँग्रेसबद्दल प्रेम होते. मला आठवते, एखाद्या पोटनिवडणुकीतही कॉँग्रेसचा विजय झाला तर ते साजरा करायचे. म्हणायचे आम्ही जिंकलो आहोत. अखेरच्या टप्प्यात राष्ट्रपती असल्याने ते उघडपणे हे म्हणू शकत नसत, एवढेच!
त्यांना नम्र श्रध्दांजली!