बाळासाहेब बोचरे, वरिष्ठ उपसंपादक -विद्यादान हे महत्त्वाचं दान आहे. म्हणून शिक्षक किंवा गुरूला समाजात आदराचं आणि उच्च स्थान दिलं जातं. लोकशाहीप्रधान असलेल्या आपल्या देशात राष्ट्रपतिपद हे घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च मानले जाते. या पदावर शिक्षकी पेशातील सर्वात प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे विराजमान झाले. त्यांच्यानंतर तब्बल ५५ वर्षांनी शिक्षकी पेशातील द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली आहे. या सर्वोच्च पदी शिक्षकांना बसविल्याने विद्यादानाचा खरा सन्मान झाला आहे.
एका गरीब कुटुंबातील एक हुशार मुलगा दहावीची परीक्षा देतो. परीक्षेचा उद्या निकाल असताना त्या मुलाची आई चिंतेत होती. अक्षरश: ती रडत होती. त्या मुलाने आईला विचारले, ‘आई का रडते.’ तेव्हा ती म्हणाली, ‘बाळा, उद्या तुझा दहावीच्या परीक्षेचा निकाल आहे. तू पास होणार याबद्दल मला शंका नाही. पण तू पास झालास तर तुला मी पुढे कशी शिकवू याची मला चिंता आहे. माझ्याकडे तुझ्या पुढील शिक्षणासाठी पैसे नाहीत.’ तेव्हा त्या मुलाने आईचे डोळे पुसले आणि म्हणाला, ‘आई, तू काळजी करू नकोस, मी नुसता पास होणार नाही तर, पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणार आहे. त्यामुळे मला बक्षीस मिळणार आहे. आणि ते पैसे मला शिक्षणासाठी पुरेसे आहेत.’ ते ऐकून आईला काहीसा दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष निकाल लागून बक्षीस मिळेपर्यंत तिच्या मनावरचे दडपण कमी झाले नव्हते. खरोखरच तो मुलगा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आणि त्याला बक्षीसही मिळाले तेव्हा आईला स्वर्ग दोन बोटे उरला होता. तिने मुलाला उराशी कवटाळले. मुलाच्या बुद्धिमत्तेचा आणि आत्मविश्वासाचा तिला विलक्षण अभिमान वाटला. या मुलाचे नाव होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉ. राधाकृष्णन हे उच्चविद्याविभूषित होतेच पण त्यांनी शिक्षकी पेशाला वाहून घेतलेले होते. अत्यंत सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेल्या शिक्षणासाठी पुरेसा पैसा नसतानाही डॉ. सर्वपल्ली यांनी शिक्षण क्षेत्रात आणि त्यानंतर राजकारणात घेतलेली झेप निश्चितच असामान्य अशीच आहे.
देशातील विविध विद्यापीठांसोबतच ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी विद्यादान केले. बनारस विश्वविद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. देशाचे पहिले उपराष्ट्रपती होण्याचा मान त्यांनी मिळविला. १९५२ ते १९६२ या काळात ते देशाचे उपराष्ट्रपती होते. तर १९६२ ते १९६७ या काळात ते देशाचे राष्ट्रपती होते.
असा सुरू झाला शिक्षकदिन... १९६२ साली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती झाले असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी काही मित्र आले होते. त्यावेळी त्यांनी आज माझा जन्मदिवस असला तरी केवळ माझा वाढदिवस साजरा न करता सर्व शिक्षकांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी शिक्षकांचा सन्मान करावा, अशी कल्पना खुद्द डॉ. राधाकृष्णन यांनी मांडली. आणि तेव्हापासून या महान विद्वान तत्त्ववेत्त्याचा जन्मदिवस हा ‘शिक्षक दिन’ म्हणून पाळला जातो.
पुन्हा एक शिक्षकच राष्ट्रपतिपदी डॉ. राधाकृष्णन यांच्यानंतर तब्बल ५५ वर्षांनी पुन्हा शिक्षकी पेशातील आदिवासी सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला तो सन्मान मिळाला आहे. ओडिशामधील आदिवासीबहुल मयूरभंज जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील शिक्षकी पेशातील द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्या आहेत. त्या देशाच्या १५व्या आणि शिक्षकी पेशातील दुसऱ्या राष्ट्रपती आहेत. प्रारंभी शिक्षकी पेशात असलेल्या मुर्मू यांनी काही काळ ओडिशा सरकारच्या पाटबंधारे खात्यात नोकरी केली. २००४ साली आमदार झालेल्या द्रौपदी मुर्मु यांना २००९ पर्यंत स्वत:च्या मालकीचे घरही नव्हते. २०१५ मध्ये त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या. त्यानंतर राष्ट्रपती भवनामध्ये जाईपर्यंत त्या आपल्या रायरंगपूर गावीच वास्तव्याला होत्या.