विजय दर्डा
जगातल्या कोणत्याही देशात अमेरिकेच्या मर्जीविरुद्ध काही घडले, एखादा निर्णय झाला, तर त्या देशात जणू काही लोकशाहीवर घाला पडला असावा, अशा आविर्भावात अमेरिका आरडओरडा करू लागते, हा अनुभव काही नवा नाही. या अवघ्या जगात लोकशाहीचे तारणहार काय ते आपणच आहोत, असा अमेरिकेचा अहंगंड! लोकशाही मूल्यांचे रक्षण या नावाखाली अनेक देशांना अमेरिकेने धुळीस मिळवले. हा देश सतत सर्वांना धमक्या देत असतो. जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाही देशाला, भारतालाही अमेरिकेने सोडलेले नाही. काय तर म्हणे, भारतातले नागरिक अशिक्षित आहेत. ‘भले आमचे लोक शिकलेले नसतील; पण त्यांना अधिक समज आहे.’ असे उत्तर मी त्यावेळी याच स्तंभामध्ये दिले होते. कोणाला केव्हा सत्तेत आणायचे आणि कोणाला केव्हा सत्तेच्या खुर्चीवरून खाली खेचायचे, हे हिंदुस्थानातल्या लोकांना बरोबर कळते. या देशात इतकी सत्तांतरे झाली; पण दरवेळी सारे सुरळीत पार पडले, त्याचे कारण भारतातल्या समंजस लोकांचे व्यावहारिक शहाणपण!
अमेरिकेत जे काही घडले ते लोकशाहीसाठी भयावह होते. तो काळा दिवस होता. निवडणुकीचा निकाल आणि पराभव स्वीकारायला ट्रम्प तयार नव्हते तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती की, हे महाशय नक्की काही तरी कुरापत काढतील! आपण सत्ता सोडणार नाही, असे त्यांनी जाहीरपणे म्हटलेही होते; पण त्यांचे समर्थक थेट संसदेवर चालून जातील, हल्ला करतील, कब्जा करतील; इथवर त्यांची मजल जाईल ही कल्पनाही कोणी केली नव्हती. सुरक्षा रक्षकांनी संसदेला हल्लेखोरांच्या ताब्यातून सोडवले तरी काळा डाग लागला तो लागलाच! बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बोलावलेल्या संसदेच्या बैठकीवर ट्रम्प समर्थकांनी ज्या प्रकारे हल्ला चढवला, तो पाहता हे स्पष्ट दिसते की हा हल्ला पूर्वनियोजित होता.
कॅपिटॉल या अमेरिकन संसद भवनात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटची बैठक होते. अमेरिकेच्या राजधानीने सुमारे २०० वर्षांनंतर उपद्रवाचे हे दृश्य पाहिले. १९१४ साली ब्रिटनने अमेरिकेवर हल्ला केला होता आणि अमेरिकन सैन्य हरल्यावर ब्रिटिश सैन्याने कॅपिटॉल इमारतीला आग लावली. त्यानंतर अमेरिकी संसदेवर कधी हल्ला झाला नाही. अचानक इतक्या संख्येने ट्रम्प समर्थक एकत्र कुठून झाले? ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या बोरोजगारांना पैसे वाटून गर्दी जमवली असणेही शक्य आहेच म्हणा! अर्थात, पराभवानंतर ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरून आपल्या समर्थकांना भडकावणे चालू ठेवले होते. याबाबतीत ट्रम्प यांच्या पक्षाच्या अनेक खासदारांनी त्यांच्यावर खुले आरोप केले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर मिट रोमनी यांनी म्हटले, ‘अध्यक्षांनी समर्थकाना संसदेत घुसण्यासाठी चिथावले याची मला शरम वाटते. माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांकडून अशी आशा बाळगतो की, ते लोकशाही वाचवण्यासाठी पुढे येतील.’ - ट्रम्प विरोधात अग्रणी असलेले हे त्यांचे सहकारी याआधी कुठे होते, कोण जाणे!
आता तर सत्ता हस्तांतरणाआधीच ट्रम्प याना पदावरून हटवावे, अशी मागणी पुढे आली आहे. अमेरिका ट्रम्प याना काय शिक्षा देते याकडे आता सगळ्या जगाचे लक्ष असेल! अध्यक्षांना असलेले माफीचे अधिकार वापरून स्वतःच स्वतःला माफ करण्याची शक्कल ट्रम्प यांनी काढलेली आहेच!पहिल्या निवडणुकीच्या वेळेपासून, नंतर अध्यक्षपदावरूनही ट्रम्प सातत्याने खोटे बोलत राहिले. दुसऱ्याया निवडणुकीतही त्यांनी तेच केले. समाजमाध्यमात तर त्यांनी खोट्याचा पाऊस पाडला. ट्विटरने त्यांची अनेक ट्वीट एक तर ब्लॉक केली किंवा चुकीच्या, आक्षेपार्ह मजकुराबद्दल ट्रम्प यांना समज दिली. ट्रम्प यांचे काही ट्वीट रोखून ते रिट्वीट करता येणार नाहीत, अशी व्यवस्था केली गेली. शेवटी ट्विटरने त्यांचे खातेच कायमसाठी बंद केले. फेसबुक आणि इन्स्टाग्रामनेही त्यांच्यावर निर्बंध घातले. ट्रम्प यांच्या पत्रकारपरिषदेवर अमेरिकी माध्यमांनी बंदीच घातल्याची गोष्ट सर्वांना माहीत आहे. ‘अध्यक्ष चुकीची माहिती देत असल्याने पत्रपरिषदेचे प्रसारण होणार नाही.’- अशी भूमिका अमेरिकन माध्यमांनी घेतली.
जागतिक स्तरावर तर ट्रम्प यांनी अमेरिकेच्या धोरणांची ऐशी की तैसी केलेली दिसते. जे अमेरिकेचे मित्र होते त्यांना दूर सारले. अफगाणिस्तान, इराण आणि चीनच्या बाबतीत त्यांची धोरणे असफल ठरली. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन दिले नाही तर याद राखा, अशी धमकी त्यांनी ऐन कोरोना काळात भारतालाही दिली होतीच! देशातही ट्रम्प एक असफल अध्यक्ष ठरले; पण या सगळ्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून त्यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ची घोषणा करून खोट्या राष्ट्रवादाची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपण यात बरेचसे यशस्वी झालो, असा त्यांचा समज होता. राष्ट्रवादाची नीती चालवणाऱ्या राजनेत्यांना असा भ्रम होणे स्वाभाविकही असते. ते आपल्या संकुचित वैचारिक कोशातून बाहेर येऊ शकत नाहीत. बाहेरचे जग त्यांना समजत नाही. देशाबद्दल एक वर्ग सदैव सतर्क असतो हे त्यांना कळत नाही. अमेरिकेत हेच झाले. खूप मोठा वर्ग ट्रम्प काय आहेत, ते अमेरिकेला कसे चुकीच्या रस्त्याने नेत आहेत, हे जाणून होता. त्यामुळेच निवडणुकीत त्यांच्या वाट्याला पराजय आला. पोकळ राष्ट्रवादाच्या उन्मादाने आंधळे झालेले ट्रम्प समर्थक हे पचवायला अजूनही तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी हा राडा घातला. आता तर ट्रम्प बायडेन यांच्या शपथविधीलाही जाणार नाहीत, लोकशाही परंपरांचा याहून घोर अपमान दुसरा कुठला असेल? अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा ट्रम्प यांचे मनसुबे जाणून घेण्यात अपयशी ठरली याचे मात्र आश्चर्य वाटते. अमेरिकी लोकशाहीवर एक मोठा कलंक लागला आहे, तो पुसायला या देशाला बराच वेळ लागेल.
(लेखक लोकमत वृत्त समुहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)
vijaydarda@lokmat.com