अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गत आठवड्यात त्यांचे बहुप्रतीक्षित अफगाणिस्तान धोरण जाहीर केले. भारत आणि पाकिस्तानात आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. ट्रम्प यांच्या धोरणामुळे चिडलेल्या पाकिस्तानने अमेरिकेसोबतची द्विपक्षीय चर्चा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे भारताने ट्रम्प यांच्या धोरणाचे स्वागत केले आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानला बाजूला सारताना, भारताला अफगाणिस्तानात अधिक व्यापक भूमिका बजावण्यासाठी आमंत्रित केल्याने भारताची भूमिका स्वाभाविक म्हणता येईल; मात्र तसे करताना ट्रम्प यांनी भारताला अप्रत्यक्षरीत्या धमकावल्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापारातून भारत अब्जावधी डॉलर्स कमावत असल्याने भारताने अफगाणिस्तानात आर्थिक व विकासकामांच्या आघाडीवर जास्त व्यापक भूमिका अदा करायला हवी, असा ट्रम्प यांचा सूर होता. भारतासोबत व्यापार करून अमेरिका काही भारतावर उपकार करीत नाही. व्यापार उभय देशांची गरज आहे. दुसरी बाब म्हणजे सध्याच्या घडीलाही भारत अफगाणिस्तानला तब्बल दोन अब्ज डॉलर्सची मदत करीतच आहे आणि त्यामध्ये आणखी एक अब्ज डॉलर्सची वाढ करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. अफगाणिस्तानला कोणत्याही तिसºया देशातर्फे दिली जाणारी ही सर्वात मोठी मदत आहे. एकीकडे भारतीय शेतकरी सरसकट कर्जमाफीची मागणी करीत असताना अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती दाखवून ती दिल्या जात नाही आणि दुसरीकडे दुसºया एका देशाला सुमारे १३० अब्ज रुपयांची मदत दिल्या जात आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाची गरज म्हणून ते मान्य केले तरी भारतासारख्या विकसनशील देशासाठी ती रक्कम खचितच मोठी आहे! ट्रम्प म्हणतात म्हणून त्यामध्ये आणखी वाढ करणे भारताला परवडण्यासारखे नाही. याच ट्रम्प यांनी २०१२ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून बाहेर पडायला हवे, अशी भूमिका मांडली होती. आता तेच अफगाणिस्तानात आणखी सैन्य पाठविण्याची भाषा करीत आहेत. उद्या पुन्हा अफगाणिस्तानला वाºयावर सोडून त्यांनी आपले सैन्य माघारी बोलावले तर? त्या स्थितीत तालिबान व इसिससारख्या अतिरेकी संघटना अफगाणिस्तानातील सरकार उलथवून तो देश ताब्यात घेणार हे निश्चित आहे. त्या परिस्थितीत भारताने भविष्यकालाकडे नजर ठेवून अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी केलेली सर्व गुंतवणूक वायाच जाईल. ट्रम्प यांच्या भूमिकेचे स्वागत करणे ठीक आहे; पण अफगाणिस्तानमधील आर्थिक गुंतवणूक वाढविण्यापूर्वी त्यापासून दीर्घकालीन लाभ होणार आहे का, याचा सारासार विचार करणे अत्यावश्यक वाटते.
ट्रम्प यांनी भारताला अप्रत्यक्षरीत्या धमकावल्याकडे मात्र दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 3:09 AM