भल्यामोठ्या मंडपातल्या रिकाम्या खुर्च्या, ‘समीक्षेची समीक्षा’ असल्या किचकट विषयांवरल्या चर्चांच्या रतिबाने आणलेल्या कंटाळ्याचा तवंग, विक्रमी विक्रीचे आकडे गाठू न शकलेले पुस्तक प्रदर्शन आणि वेळ काढून साहित्याच्या अंगणी आलेले; पण व्यासपीठावर काय चालले आहे त्यापेक्षा मंडपाबाहेर पुलं आणि बहिणाबार्इंच्या पुतळ्यांबरोबर सेल्फी काढण्यात रमलेले रसिक हे यावर्षीच्या साहित्य संमेलनाचे एकूण फलित !! समारोपाचे सूप एरवी साहित्यिक खडाखडीत वाजते, यावर्षी ते निवडणुकांच्या गदारोळात यथास्थित राडा घालून वाजले एवढेच ! पण एरवी साहित्यबाह्य उद्देशांपोटी हा पसारा मांडणारे स्थानिक आयोजक आणि वादांचे रण लढवून निवडून आलेले अध्यक्ष वगळता ‘साहित्य संमेलन’ या एकेकाळी साहित्यिक-सांस्कृतिक आब असलेल्या आयोजनाबद्दलचा एकूण मराठी कळवळा दरवर्षी उणावतच चाललेला दिसतो.
असे का झाले असावे? एरवी मराठीच्या नावाने सोयीसोयीने कढ काढणे घडत असले आणि शासकीय दुर्लक्षाची रड कायम असली तरी या भाषेच्या व्यवहाराचे फार वाईट चाललेले नाही. पुस्तके खपतात, गाणी वाजतात, नाटके चालतात, सिनेमे धावतात... मराठी प्रकाशकांनीही कधी नव्हे ते एकत्र येऊन ‘रीडर अॅप’ वगैरे ‘लॉँच’ करणे हे ‘भावने’ला अत्यावश्यक व्यवहाराचे कालानुरूप कोंदण मिळत असल्याचे आणखी एक ताजे उदाहरण ! पण साहित्य संमेलनाचा चेहरा मात्र हिरमुसलेला आणि कावलेला !! का? कालबाह्यता हे त्याचे एक महत्त्वाचे कारण ! हे संमेलन ज्या पद्धतीने आखले जाते, त्यातले मुख्य व्यासपीठ जुनाट चर्चांची जी गुऱ्हाळे दरवर्षी लावते, त्यातले तेच तेच लोक ज्या भाषेत जे बोलतात; यातल्या कशाचाही नव्या मराठी वाचकांशी, रसिकांशी कसला म्हणून धागा असेल तर शपथ !! एका बाजूला देशभरात ‘कार्पोरेट’ पद्धतीने आयोजित केलेल्या, साहित्य-संगीत-चित्र-शिल्प-संगीताची मनोज्ञ सांगड घालणाऱ्या ‘लिट-फेस्ट’ना सुगीचे दिवस आलेले असताना मराठी साहित्य संमेलनाचे हे असे जुनाट होत जाणे क्लेशदायी आहे.
अनेकानेक कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या आजी-माजी अध्यक्षांनी या साहित्य संंमेलनात ‘सूत्रा’ऐवजी ‘सत्या’च्या देवघेवीचा नवा पायंडा पाडला. हा नुसता शब्दखेळ न राहील तर बरे! रसिक-वाचकांच्या वर्तमान गरजा आणि मनोवस्थेशी साहित्य संमेलनाच्या कालबाह्य झालेल्या आराखड्याचे नाते उरलेले नाही या ‘सत्या’चा निदान ‘स्वीकार’ करणे या अध्यक्षद्वयांनी साहित्य-संस्थांना भाग पाडावे. इतपत सत्य पेलायला तशीही फार मोठ्या प्रज्ञेची गरज पडू नये!