किरण अग्रवाल
मन चंचल असणे स्वाभाविक आहे, त्यामुळे ते वाऱ्यासारखे वेगाने इकडून तिकडे कुठेही वाहणारच; पण विवेकाचे भान असले की या भरकटणाऱ्या मनाला आवर घालणे शक्य होते. जीवनाचे वा जगण्यातले हे तसे साधे-सोपे अध्यात्मच आहे. पुस्तके वाचा, की कोणत्याही गुरुंचा हितोपदेश घ्या; त्यातही हेच सांगितले गेलेले आढळून येईल, पण अनेकांना ते उमजत नाही असेच म्हणायला हवे. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळातही तेच होताना दिसत आहे. कोरोनाने खूप नुकसान केले, जगणे मुश्कील होऊन बसले आहे असा विचार करून निराश मनाने अनेकजण जगण्यातील अडचणींकडे बोट करताना दिसून येतात; परंतु वेगळ्या अर्थाने बघितले तर या संकटानेही जगणे सुंदर करण्याचाच धडा घालून दिला आहे हेदेखील लक्षात येईल.कोरोनाच्या महामारीने प्रत्येकाच्याच जगण्याची परिमाणे बदलून ठेवली आहेत. लहान असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत; प्रत्येकालाच याची झळ बसली असून, नवीन आव्हाने सर्वांसमोरच उभी ठाकली आहेत. कोरोना कधी व कसा जाईल हे आज खात्रीने कोणालाही सांगता येणारे नाही, उलट तो दिवसेंदिवस कसा घातक ठरतोय हेच समोर येताना दिसत आहे. यापूर्वी कोरोनाचा विषाणू हा खोकल्याने, शिंकल्याने श्वासावाटे शरीरात प्रवेश करून त्रासदायक ठरत असल्याचे म्हटले जात होते, आता तो हवेतूनही प्रसारित होतो असे संशोधन पुढे आल्याने चिंता वाढून गेली आहे. यासंदर्भात नित्यनवे संशोधन पुढे येत असल्याने भयात भरच पडत चालली आहे; परंतु त्याने निराश व उदास होण्याचे कारण नाही. यापुढे कोरोनासोबतच जगणे निश्चित आहे, त्यामुळे त्याच्याशी ओळख करून घेऊनच जगावे लागणार आहे. एकदा ही ओळख झाली, की त्यातून भय वा भीतीचे वातावरण दूर होईल आणि आपसूकच जगणे सुलभ होऊ शकेल. यासंबंधीच्या भीतीने दूर पळणे किंवा घाबरून घरात बसणे हा त्यावरील उपाय होऊच शकत नाही. टाळता न येणा-या शत्रूशी वैर घेण्यापेक्षा त्याच्याशी हात मिळवणी करून राहण्यात जसा फायदा असतो तसेच हे आहे. कोरोनाला जाणून घेतले तर वैज्ञानिकदृष्ट्या त्याचे येण्याचे म्हणजे संसर्गाचे मार्ग आपल्याला लक्षात येतील व ते लक्षात आले म्हणजे सावधानता बाळगून त्यापासून दूर राहणे शक्य होईल इतका साधा हा मैत्रीचा मार्ग आहे. पण भीतीने मनात घर केले की आपल्याला सुटकेचे मार्ग सापडत नाहीत. कसल्याही बाबतीत असो, भीतीने डोळे मिटतात. खरे तर अशा काळात डोळे उघडे ठेवून वावरले व निर्णय घेतले तर भीतीला पळवून लावून संकटावर मात करणे सहज शक्य असते. कोरोनाच्या बाबतीतही हाच इलाज उपयोगी पडणारा आहे.
महत्त्वाचे म्हणजे, कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या नुकसानीला व अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागले हे खरेच, अनेकांना रोजगार गमवावा लागला, अनेकांना पगार कपातीला सामोरे जावे लागत आहे. अन्यही अनेक बाबींचा पाढा येथे वाचता येऊ शकेल; परंतु त्यापलीकडे जाऊन विचार करता आतापर्यंत अशक्य वा अवघड वाटणारे अनेक मार्ग यानिमित्ताने अंगवळणी पडून जी सुविधा पर्याय म्हणून पुढे आली आहे त्याकडे ‘न्यू नॉर्मल’ म्हणून सकारात्मकतेने बघता यावे. काटकसर शिकवणारी, प्रत्येक बाबतीतली पारंपरिकता बदलणारी ही नवीन जीवनशैलीच आहे. उदाहरणच द्यायचे तर, प्रत्यक्षातील प्रवासाची कटकट टाळून आता नवीन प्रगत माध्यमाद्वारे मोबाइलवर होणा-या बैठका व भेटी या वेळेची व पैशाचीही बचत करणाºयाच ठरल्या आहेत की नाही? लग्नादी समारंभ म्हटले की त्यातील मानपान व खर्चाने अनेकांवर चक्कर येऊन पडण्याची वेळ येते; पण आता कोरोनामुळे घातल्या गेलेल्या निर्बंधातून ही बाबही अनेकांसाठी सोयीस्करच ठरली आहे.अनेकांनी आताच्या फावल्या काळात कुटुंबातील उपवर मुला-मुलींसाठी स्थळ संशोधनाचे कामही प्राधान्याने हाती घेतल्याचे दिसत आहे. अशा अन्यही अनेक मुद्द्यांचा येथे ऊहापोह करता येईल, की संकटातील संधी म्हणून त्याकडे पाहता यावे. कोरोनाने जे काही बदलून ठेवले आहे त्यात जी नावीन्यता लाभली आहे ती काळाची गरज म्हणून उपयोगाचीच असून, तीच आता सर्वमान्यही होऊ पाहत आहे.व्यवहाराच्या पलीकडे जाऊन मानवी संबंध व नात्याचे बंध या दृष्टिकोनातून कोरोनाकडे बघायचे तर हे नाते अधिक दृढ करण्याची संधीच कोरोनाने दिली आहे. कोणतीही व्यक्ती ही त्याच्या कामात व्यस्त राहणारी असो, की फालतू बसून राहणारी; प्रत्येकालाच असे वाटते की आपल्याकडे वेळच नाही. कोरोनाने सक्तीने घरात बसावयास भाग पाडल्यानंतर आता प्रत्येकालाच वेळ मिळाला असून, घरात मुलाबाळांसोबत वा कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यातील आनंद अनेकांना अनुभवयास मिळत आहे. अनेक आईबाबा आपल्या मुलांच्या अभ्यासात लक्ष घालू लागल्याने व त्यांच्या समवेत खेळूही लागल्याने त्या मुलांचा आनंद काय वर्णावा असाच आहे. एरवी घरात अडगळीत पडल्यासारखे झालेल्या ज्येष्ठांकडे आता अनेकजण लक्ष देताना दिसत आहेत. यातून त्या संबंधितांच्या चेह-यावर व त्यांच्या अंतरआत्म्यातून उमटणा-या समाधानाची तुलनाच कशाशी करता येऊ नये. पूर्वी आपापल्या कार्यालयीन व मुलाबाळांच्या शाळेच्या वेळा सांभाळून वेगवेगळ्या वेळी होणारी जेवणे आता घरात एकत्र बसून होऊ लागली आहेत, त्यानिमित्ताने सुखदु:खाच्या गोष्टी घडून येतात, मन हलके व्हायला मदत होते; नात्यांचे परस्परातील बंध घट्ट होऊन निराशावादी सूर दूर व्हायलाही आपसूकच मदत होते. जगणे सुंदर होण्यासाठीचे सहचर्य यातून घडून येते म्हटल्यास वावगे ठरू नये. या काळात अनेकांनी अनेकांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली, परस्परांना हिम्मत दिली. म्हटले तर संकटात बळ पुरविणारे, उभारी देणारे हे अध्यात्म आहे, ज्यातून लाभावी जगण्याची सोपी वाट. अर्थात या वाटेवरून चालताना निराशेचे सूर आळवायचे, की आनंदी-समाधानी मनाने आशेचे, नावीन्याच्या ऊर्जेचे सूर, हा ज्याचा त्याचा प्रश्न.