- संदीप प्रधान । वरिष्ठ सहायक संपादक
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे. देवाचं देवत्व नाही दगडात, देवाचं देवत्व नाही लाकडात, सोन्या-चांदीत नाही देवाची मात, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. याची आठवण होण्याचे कारण म्हणजे २१ सप्टेंबर १९९५ रोजी देशभरातीलच नव्हे तर लंडन-अमेरिकेतील गणेशमूर्ती दूध पीत असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. त्या घटनेला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आजच्या काळात अशा अंधश्रद्धांबाबत समाजात डोळसपण आले आहे की, आजही समाज तेवढाच भोळाभाबडा आहे, याचे सिंहावलोकन करण्याचे हे उत्तम निमित्त आहे.
ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस देशात राम रथयात्रा निघाली होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशिदीची कथित वास्तू कारसेवकांनी जमीनदोस्त केली. आता त्या ठिकाणी राम जन्मस्थान असल्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परिणामी तेथे भव्य राममंदिर उभारण्याचा पायाभरणी समारंभ अलीकडेच झाला. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत भीषण बॉम्बस्फोट झाले होते. या पार्श्वभूमीवर १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले होते. त्यामुळे समाजमन ज्वलंत हिंदुत्वाने चेतवलेले होते. अशावेळी २१ सप्टेंबर रोजी अचानक ठिकठिकाणच्या गणपतीच्या मूर्ती दूध पीत असल्याची अफवा पसरली. त्यावेळी नुकतीच देशभर एसटीडी सेवा सुरू झाली होती. दूरदर्शनखेरीज बातमीपत्रे देण्यास प्रारंभ झाला होता. अनेकांनी घरातील लॅण्डलाइनवरून फोन करून ही वार्ता आपले नातलग, मित्र यांना सांगितल्याने त्याचा प्रसार झाला.
महाराष्ट्रात १९८२ पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य सुरू होते. या चळवळीचे अध्वर्यू श्याम मानव यांना तत्कालीन पोलीस आयुक्तांनी दूरध्वनी करून ठिकठिकाणी गणपती दूध पीत असल्याची खबर दिली. दोन वर्षांपूर्वीच मुंबईत बॉम्बस्फोट झाले असल्याने गणपती दूध पीत असल्याची अफवा पसरल्याने लोक मंदिरात येतील व बॉम्बस्फोट घडवता येतील, असा दहशतवादी संघटनांचा कट असल्याची भीती पोलिसांना वाटत होती. त्यामुळे पोलिसांनी रेड अलर्ट घोषित केला होता. त्याचवेळी पोलीस दलातील काही अधिकारी हे आपण व आपल्या कुटुंबाने गणपतीला दूध पाजल्याचे दावे करीत होते. मानव यांनी गणपतीच्या गळ्यातील फुलांचे हार काढण्याची व गाभारा पाण्याने स्वच्छ धुऊन, पुसून घेण्याची व त्यानंतर गणेशभक्तांना चमचा तिरपा न करता दूध पाजण्याची सूचना केली. पाच-सहा भक्तांनी दूध पाजल्यावर मोठा स्पंज घेऊन मूर्तीच्या पायाकडील भाग पुसून एखाद्या भांड्यात स्पंज पिळून तो भक्तांना दाखवण्याची सूचना मानव यांनी केली. गणपती दूध पीत नसल्याचे भक्तांनाच दिसल्यावर मग आपोआप मंदिरातील रांगांना ओहोटी लागली.
एकीकडे पोलीस गणपती दूध पीत नसल्याचे लोकांना पटवून देण्याकरिता अंनिसची मदत घेत असताना दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आपण गणपतीला दूध पाजल्याचा दावा केल्याने पोलिसांची मोठी पंचाईत झाली. अखेरीस गृहखात्याचा कारभार पाहणारे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी गणपती दूध पीत नसल्याचे जाहीर करून त्या अफवांना पूर्णविराम दिला.त्यानंतर देशात फोफावलेल्या वृत्तवाहिन्यांनी व मुख्यत्वे हिंदी वाहिन्यांनी टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरिता अंधश्रद्धा पसरवणाºया बातम्यांचा पाऊस पाडलेला आहे. अमुक एक गणपती नवसाला पावतो हा जावईशोध अशाच वाहिन्यांनी लावला आहे. त्यामुळे अंनिससारख्या संघटनांचे कार्य तोकडे पडले.
राज्यातील आघाडी सरकारने जादूटोणाविरोधी कायदा केल्यानंतर शालेय स्तरावर विद्यार्थ्यांत जागृती करण्याकरिता १४ कोटींचा निधी मंजूर केला. २०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर ‘सनातनी’ मंडळींच्या दबावापोटी ही रक्कम सरकारने दिली नाही. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच अर्थमंत्री अजित पवार यांनी अंधश्रद्धाविरोधी जनजागृतीकरिता रोखलेला निधी दिला.
शरीर मानवाचे व शीर हत्तीचे हा प्राचीन काळात प्लॅस्टिक सर्जरी भारतात उपलब्ध असल्याचा पुरावा मानणारे नेतृत्व सध्या देशाला लाभले असल्याने सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून अंधश्रद्धा, अफवा पसरवण्यास सध्या सुपीक जमीन उपलब्ध आहे... एकूणात पाहता, ‘वेड लागले, वेड लागले या जनासी वेड लागले.’ या भारुडात वर्णन केल्यानुसार गेल्या २५ वर्षांत आपल्या अंधभक्तीत व पर्यायाने वेडाचारात फारसा फरक पडलेला नाही, हेच खरे.